शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या शुभहस्ते उपकरणाचे उद्घाटन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) प्रकल्पांतर्गत
मृद विज्ञान विभागामध्ये अत्याधुनिक अणु शोषण वर्णपटमापक (Atomic
Absorption Spectrophotometer – AAS 900S) हे उपकरण नव्याने उपलब्ध
करण्यात आले आहे. या उपकरणाचे उद्घाटन विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब
ठोंबरे यांच्या शुभहस्ते दिनांक ३ जुलै २०२६ रोजी संपन्न झाले.
हे अत्याधुनिक उपकरण
माती, पाणी, रासायनिक खते, सेंद्रिय
खते तसेच वनस्पती ऊती यांच्या नमुन्यांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अचूक विश्लेषण
करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, विविध नमुन्यांतील जड
धातूंचे (Heavy Metals) अचूक विश्लेषणही या उपकरणाद्वारे
करता येते. त्यामुळे मृदा, पाणी, खते
आणि वनस्पती ऊती यांच्या परीक्षणाची अचूकता वाढण्याबरोबरच संशोधन कार्याला नवी
दिशा मिळणार आहे. तसेच शेतकरी, संशोधक, कृषि उद्योजक आणि विविध खत उत्पादक कंपन्यांना या अत्याधुनिक परीक्षण
सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी कृषि
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण पी. वैद्य, मृद विज्ञान विभागाचे
विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर तसेच विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. भाग्यरेषा गजभिये,
प्रयोगशाळा प्रभारी डॉ. स्वाती झाडे, संशोधन
सहायक डॉ. स्नेहल शिलेवंत, विभागातील कर्मचारी तसेच
पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विभागप्रमुख
डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सांगितले की, या अत्याधुनिक उपकरणाच्या
साहाय्याने माती, पाणी, रासायनिक व
सेंद्रिय खते तसेच वनस्पती ऊतींमधील सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जड धातूंचे अत्यंत
अचूक विश्लेषण करणे शक्य होणार आहे. या सुविधेमुळे संशोधन कार्य अधिक सक्षम होईल,
तसेच शेतकरी, कृषि उद्योजक आणि विविध खत
उत्पादक कंपन्यांना गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह परीक्षण सेवा उपलब्ध होईल. या
आधुनिक परीक्षण सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन
त्यांनी यावेळी केले.
यावेळी PerkinElmer Pvt.
Ltd. (USA) चे टेरिटरी मॅनेजर श्री. अनिल पेठे यांनी उपस्थित राहून
त्यांनी विभागातील प्राध्यापक, संशोधक आणि पदव्युत्तर
विद्यार्थ्यांसाठी उपकरणाच्या कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक सादर केले.




