शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘परभणी ब्रँड’ म्हणून घडविण्यासाठी योगदान द्यावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत त्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि
व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. शिक्षक हे
केवळ ज्ञानदानाचे कार्य न करता विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, आत्मविश्वास,
सर्जनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य
करतात, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून
दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शिक्षण
संचालनालयाच्या वतीने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत
होते.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे संशोधन संचालक डॉ.
भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे उपस्थित होते.
कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक
तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व गुरुजनांना
गुलाबपुष्प देऊन आदर व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यापीठातील सर्व
शिक्षकवृंदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शिक्षकांची भूमिका
अत्यंत व्यापक आहे. ‘टीचर’, ‘लेक्चरर’ आणि ‘प्रोफेसर’ ही
शिक्षकांची विविध रूपे असली तरी त्या सर्वांचे मूलभूत कार्य ज्ञानदान आणि व्यक्तिमत्त्व
विकास हेच आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान तत्त्वज्ञ आणि प्राध्यापक
होते. त्यांच्या जन्मदिनाचे शिक्षक दिन म्हणून स्मरण केले जाते, ही शिक्षक व्यवसायाच्या गौरवाची बाब आहे.
शिक्षण हे केवळ पुस्तके व पदव्यांपुरते मर्यादित नसते. जीवनातील विविध घटना, परिस्थिती,
अनुभव आणि व्यक्ती यांच्याकडूनही माणूस सातत्याने शिकत असतो. शिक्षक
ही केवळ एखादी व्यक्ती नसून एखादे बालक, घटना, परिस्थिती अथवा जीवनातील अनुभवदेखील शिक्षकाची भूमिका बजावू शकतात,
असे त्यांनी सांगितले. भारताच्या परंपरेत औपचारिक शिक्षण न घेतलेले
अनेक संत आणि गुरु होऊन गेले असून, कबीरदास यांचे उदाहरण
यासाठी देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षणातून ज्ञान प्राप्त होते, ज्ञानातून विनम्रता येते आणि
विनम्रतेतून पात्रता निर्माण होते. पात्रतेच्या बळावर यश, समृद्धी
आणि उत्तम कर्म साध्य करता येते व त्यातून जीवनात समाधान प्राप्त होते, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.
प्रत्येक व्यक्तीमध्ये सतत शिकण्याची आणि पुढे जाण्याची भूक असणे आवश्यक
आहे. ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला ‘मला सर्व काही येते’ असे वाटते, त्या दिवसापासून
त्याची प्रगती थांबते. धन म्हणजे केवळ पैसा नसून यश, गौरव
आणि पद यांचाही त्यामध्ये समावेश होतो. मात्र, पद आणि
प्रतिष्ठेमुळे स्वभावात बदल होऊ न देता त्याचा उपयोग लोकहितासाठी केला पाहिजे.
आपल्यापेक्षा पद मोठे समजू नये, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षक कसा राहतो, कसा बोलतो आणि कसा वागतो, याचे अनुकरण विद्यार्थी
करीत असतात. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःच्या आचरणातून उच्च आदर्श निर्माण करणे
आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून चारित्र्यवान बनावे आणि ‘परभणी
ब्रँड’ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, यासाठी
प्रत्येक शिक्षकाने योगदान द्यावे, असे माननीय कुलगुरूंनी
सांगितले.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बाल्य, शिक्षकत्व आणि
पालकत्व असे तीन गुण आढळून येतात. बाल्यगुणामध्ये हट्टाची प्रवृत्ती असते, शिक्षकत्वामध्ये चुका शोधून त्यात सुधारणा करण्याची वृत्ती असते, तर पालकत्वामध्ये सतत मार्गदर्शन व काळजी करण्याचा गुण असतो. या सर्व
गुणांमध्ये योग्य संतुलन राखल्यास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो आणि
यशस्वी जीवन जगता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्याच्या दुःखात आनंद न मानता दुसऱ्याच्या दुःखात दुःखी आणि सुखात आनंदी
होण्याची वृत्ती जोपासणे, हीच खरी शिक्षणाची शिकवण आहे. मनात द्वेष न ठेवता सद्भावना आणि सांघिक
वृत्तीने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुरतीच शिक्षकांची जबाबदारी मर्यादित नसून, शेतकरीदेखील आपले
विद्यार्थी आहेत, या भावनेतून कृषि ज्ञान आणि तंत्रज्ञान
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सर्वांनी करावे, असे
आवाहन माननीय कुलगुरूंनी केले.
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी शिक्षक दिन हा शिक्षकांचा सन्मान
आणि गौरव करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात
घरातून आई-वडिलांकडून होते. शालेय शिक्षण शिक्षकांकडून मिळते; मात्र जीवन कसे
जगावे, याचे मार्गदर्शनही शिक्षकच करतात. ज्ञान महत्त्वाचे
असले तरी त्याचा योग्य उपयोग करण्याचे शहाणपण त्याहून अधिक महत्त्वाचे आहे,
असे त्यांनी नमूद केले.
संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शिक्षक हा उत्साही, प्रेरणादायी आणि
विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा असावा, असे सांगितले. कृषि
क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी असून, ती सोडविण्यासाठी
गुरुजनांकडून मिळालेले ज्ञान आणि तंत्रज्ञान कृषि विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि समाजापर्यंत
पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. नवीन शैक्षणिक
धोरणानुसार विद्यापीठामध्ये कौशल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धतीचा
अवलंब करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मागणारे न बनता
रोजगारनिर्मिती करणारे बनावे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकांनी आपल्या व्यवसायाशी पूर्ण समर्पण ठेवून विद्यार्थ्यांना योग्य
मार्गदर्शन करावे आणि सतत नावीन्याशी जोडलेले राहावे, असेही
त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे यश हीच शिक्षकांना मिळणारी सर्वांत मोठी पावती
असल्याचे त्यांनी सांगितले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त
करण्याचे महत्त्व विशद केले. व्यक्तीची जडणघडण आई-वडिलांपासून सुरू होते आणि पुढील
औपचारिक शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान असते.
केवळ शिक्षकच नव्हे, तर पालक, वरिष्ठ आणि जीवनात मार्गदर्शन करणारी
प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरु असते. त्यामुळे सर्वांप्रती आदरभाव ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी शिक्षक दिनाच्या महत्त्वावर मार्गदर्शन
करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या सान्निध्यातून मिळालेल्या
ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा उल्लेख केला.
डॉ. प्रवीण कापसे यांनी आदर्श शिक्षकाची संकल्पना स्पष्ट करताना माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मागील
चार वर्षांत विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचा आणि विविध क्षेत्रांतील यशाचा आढावा
घेतला. माननीय कुलगुरू हे राष्ट्रीय पातळीवरील उच्च दर्जाचे मार्गदर्शक असून
त्यांच्या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
माननीय कुलगुरू यांचे विद्यार्थी तथा कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयातील डॉ. विशाल इंगळे यांनी माननीय कुलगुरूंकडून मिळालेल्या
ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
माननीय कुलगुरू यांचे स्वीय सचिव श्री. बालाजी डोईजड यांनी गुरुजनांप्रती
आदर व्यक्त करणारे गीत सादर केले. विद्यार्थिनी शुभांगी शुक्ला यांनी प्रसिद्ध
गायक मन्ना डे यांच्या ‘तू प्यार का सागर है’ या गीताच्या सादरीकरणातून गुरुजनांप्रती आदरभाव
व्यक्त केला. विद्यार्थी शुभम कुमार, शिवम राज आणि वैष्णवी
बांगर यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या
मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य आणि विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी
केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कृषि महाविद्यालयाच्या चौथ्या
वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी आराध्या सिंग आणि शुभांगी शुक्ला यांनी
केले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन, ज्ञान आणि प्रेरणा ही समाजाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले. कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, संवेदनशील आणि ज्ञानसमृद्ध विद्यार्थी घडविणाऱ्या विद्यापीठातील सर्व शिक्षकांना यावेळी शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)





