वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्रात दोन दिवसीय मशरूम उत्पादन प्रशिक्षण व १२६ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न
शेतीमध्ये वाढता उत्पादन खर्च, मर्यादित उपलब्ध
जमीन आणि बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांनी शेतीला पूरक
व्यवसायांची जोड देणे आवश्यक आहे. मशरूम (आळिंबी) उत्पादन हा कमी जागेत, शास्त्रीय पद्धतीने आणि योग्य नियोजनातून करता येणारा व्यवसाय असून,
त्यातून शेतकरी, महिला व युवकांना रोजगार आणि
अतिरिक्त उत्पन्नाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे
प्रतिपादन सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या वतीने
दि. १ व २ सप्टेंबर २०२६ रोजी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड,
छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय मशरूम उत्पादन तंत्रज्ञान
प्रशिक्षण तसेच १२६ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला
होता. यावेळी डॉ. सूर्यकांत पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमामध्ये मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, यशस्वी मशरूम
उत्पादकांची यशोगाथा, मशरूमचे आरोग्यदायी महत्त्व, मशरूमपासून तयार होणारे प्रक्रिया पदार्थ व प्रक्रिया उद्योग, मशरूम विपणन तसेच जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर या विषयांवर
प्रशिक्षणार्थी व शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती
संभाजीनगर-१ यांच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर होत्या. यावेळी
छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती अश्विनी पठारे तसेच
सावित्रीबाई फुले महिला समाज एकात्म मंडळाचे व्यवस्थापक श्री. कैलास राठोड यांची
उपस्थिती होती.
तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप हिंगोले, यशस्वी मशरूम
उत्पादक श्री. ज्ञानेश्वर यशवंत सांगळे (मु. पो. बाग पिंपळगाव, ता. गेवराई), विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे,
डॉ. संजुला भावर आणि डॉ. अनिता जिंतूरकर यांचीही उपस्थिती होती.
प्रशिक्षणामध्ये डॉ. दिलीप हिंगोले यांनी मशरूम
उत्पादनाचे शास्त्र व उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. मशरूम
उत्पादनासाठी आवश्यक बाबी, उत्पादनाची शास्त्रीय पद्धत, योग्य वातावरणाची
निर्मिती, स्वच्छता, उत्पादन
व्यवस्थापन तसेच उत्पादन प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी
प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
मशरूम उत्पादनामध्ये केवळ उत्पादन घेणे महत्त्वाचे
नसून गुणवत्तापूर्ण व सातत्यपूर्ण उत्पादनासह बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनाचे
नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य
वापर करून मशरूम उत्पादनाकडे लघुउद्योग म्हणून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी
सांगितले.
यशस्वी मशरूम उत्पादक श्री. ज्ञानेश्वर यशवंत सांगळे
यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून उभारलेल्या मशरूम उत्पादन व्यवसायाची यशोगाथा
प्रशिक्षणार्थींना सांगितली. मशरूम उत्पादन व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी, उत्पादनातील अनुभव,
व्यवस्थापन, बाजारपेठेचा शोध आणि उत्पादन
विक्री याबाबत त्यांनी आपले अनुभव कथन केले.
मशरूम उत्पादन व्यवसायामध्ये शास्त्रीय ज्ञानासोबतच
चिकाटी, योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि गुणवत्तापूर्ण
उत्पादन यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी मशरूमचे आरोग्यासाठी
असलेले फायदे, पौष्टिक मूल्य, मशरूमपासून तयार करता येणारे विविध
प्रक्रिया पदार्थ तसेच प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयी मार्गदर्शन केले.
मशरूमची केवळ ताज्या स्वरूपात विक्री करण्याऐवजी त्यापासून विविध मूल्यवर्धित
पदार्थ तयार केल्यास उत्पादनाला अधिक बाजारमूल्य मिळू शकते, असे
त्यांनी सांगितले.
महिला बचत गट, युवक आणि लघुउद्योजकांसाठी मशरूम
प्रक्रिया हा स्वतंत्र व्यवसायाचा मार्ग ठरू शकतो, असेही
त्यांनी स्पष्ट केले. मशरूमच्या पौष्टिक गुणधर्मांची माहिती ग्राहकांपर्यंत
पोहोचविणे आणि त्याच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. बसवराज पिसुरे यांनी मशरूम उत्पादनातील
महत्त्वाचा घटक असलेल्या विपणन व बाजारपेठ व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. उत्पादन
घेण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करणे, ग्राहकांची मागणी जाणून घेणे,
विक्रीसाठी उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे, थेट
ग्राहकांशी संपर्क साधणे तसेच मूल्यवर्धित उत्पादनांच्या विक्रीचे नियोजन करणे
याबाबत त्यांनी माहिती दिली.
तसेच जैविक निविष्ठांची ओळख, निर्मिती आणि वापर
याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. शेती व पूरक व्यवसायांमध्ये उपलब्ध संसाधनांचा
शाश्वत आणि योग्य पद्धतीने वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत
व्यक्त केले. प्रशिक्षणादरम्यान मिळालेले शास्त्रीय ज्ञान, तज्ज्ञांचे
मार्गदर्शन, यशस्वी मशरूम उत्पादकाचा प्रत्यक्ष अनुभव तसेच
मशरूम प्रक्रिया व विपणनाबाबत मिळालेली माहिती अत्यंत उपयुक्त ठरल्याचे
प्रशिक्षणार्थींनी सांगितले. या प्रशिक्षणामुळे मशरूम उत्पादनाकडे व्यवसायाच्या
दृष्टिकोनातून पाहण्याची नवी दिशा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ. संजुला भावर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सतीश कदम, श्री. जयदेव सिंगल, श्री. जयदीप बनसोडे तसेच कृषि विज्ञान केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

