Tuesday, September 1, 2026

मराठवाड्यात पावसाच्या खंडाचा खरीप पिकांवर परिणाम; वनामकृवि आणि कृषि विभागाद्वारे उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न

हलक्या जमिनीतील पिकांवर विपरीत परिणाम व उत्पादनात घट येण्याची  शक्यता ; सोयाबीन, तूर व कापूस पिकांना पावसाची प्रतीक्षा

मराठवाडा विभागात सर्वसाधारणपणे मागील सुमारे २० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. विशेषतः हलक्या जमिनीवरील पिकांमध्ये जमिनीतील ओलावा कमी होऊन आर्द्रता ताणाची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील सर्व तालुक्यांतील खरीप पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकनिहाय परिस्थिती तसेच उत्पादनातील संभाव्य घट कमी करण्यासाठी आवश्यक तातडीच्या पीक व्यवस्थापन उपाययोजनांचा सविस्तर आढावा दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आभासी माध्यमाद्वारे घेण्यात आला.

हलक्या जमिनीतील सोयाबीन, मूग व उडीद या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्या भागांत मागील सुमारे २० दिवसांपासून पावसाचा खंड आहे, त्या ठिकाणी मध्यम जमिनीवरील पिकांच्या वाढीवरही प्रतिकूल परिणाम दिसून येत असून, परिस्थिती कायम राहिल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीतील पावसाचा खंड लक्षात घेऊन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी तसेच विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर आणि विभागीय कृषी सहसंचालक, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन बैठकीद्वारे पावसाच्या खंडकाळातील पिकांची स्थिती, पुढील उपाययोजना व पीक व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीस विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर), श्री. महेश तीर्थकर (लातूर), सहयोगी संशोधन संचालक डॉ सुर्यकांत पवार, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. पापिता गौरखेडे, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, प्रा. अरुण गुट्टे तसेच विविध कृषी विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, डॉ. सचिन सूर्यवंशी, डॉ. वासरे, डॉ. राजेश भालेराव, डॉ. निठरवाल, डॉ. संजूला भावर यांच्यासह सर्व जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुनील वानखेडे व श्री. महेश तीर्थकर यांनी विभागातील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय पिकांची सद्यस्थिती, पाण्याचा ताण, संभाव्य नुकसानाची पातळी, सर्वाधिक प्रभावित पिके तसेच पुढील काळातील पीकस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली. यामुळे विभागातील विविध भागांतील पिकांच्या परिस्थितीचे क्षेत्रीय चित्र स्पष्ट झाले असून, त्यानुसार तातडीच्या व्यवस्थापन उपाययोजनांचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. जमिनीचा प्रकार आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन श्री. सुनील वानखेडे यांनी केले.

सोयाबीन, मूग व उडीदावर अधिक परिणाम

आढाव्यातून असे निदर्शनास आले की, सोयाबीन, मूग व उडीद या पिकांवर पावसाच्या खंडाचा तुलनेने अधिक परिणाम दिसून येत आहे. हलक्या जमिनीमध्ये विविध ठिकाणी सलग सुमारे २० ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्यामुळे जमिनीतील उपलब्ध ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटणे, कोमेजणे व फुलगळ होणे यांसारखे परिणाम दिसून येत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

मध्यम जमिनीमध्ये उपलब्ध ओलावा तुलनेने अधिक असल्याने परिस्थिती काही प्रमाणात समाधानकारक असली तरी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांची वाढ आणि उत्पादनावर अधिक प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय आढाव्यात जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण व वितरण तसेच पावसाच्या खंडाचा कालावधी यानुसार पिकांवरील परिणामाची तीव्रता वेगवेगळी असल्याचे स्पष्ट झाले.

तूर व कापूस पिकांना पुनर्वाढीची संधी

तूर व कापूस या प्रमुख खरीप पिकांच्या वाढीवर व विकासावरही पावसाच्या खंडाचा परिणाम झाला आहे. मात्र, या पिकांना अद्याप पुनर्वाढीची संधी असून, येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा वाढून पिकांची वाढ व उत्पादन क्षमता काही प्रमाणात पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतील पर्जन्यमान तूर व कापूस पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

कापूस व तूर पिकांमध्ये उपलब्धतेनुसार संरक्षित सिंचन, हलकी कोळपणी, जलसंधारण सऱ्या काढणे, आच्छादन करणे, आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेटची फवारणी तसेच जैविक निविष्ठांचा वापर करण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली.

एकूणच, हलक्या जमिनीवरील पिके सध्या मोठ्या प्रमाणात आर्द्रता ताणाखाली आहेत. मध्यम ते भारी जमिनीवरील पिकांची स्थिती तुलनेने समाधानकारक असली तरी पुढील सात ते आठ दिवसांत पुरेसा पाऊस होणे अथवा जमिनीतील ओलाव्याचे पुनर्भरण होणे अत्यंत आवश्यक आहे. या कालावधीत पाऊस न झाल्यास पिकांची वाढ, फुलोरा, शेंगा व बोंडधारणा तसेच अंतिम उत्पादनावर अधिक विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांकडून पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

यावेळी विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेट, जैविक निविष्ठा व तण व्यवस्थापनावर भर द्यावा, असे मार्गदर्शन केले. प्रा. अरुण गुट्टे यांनी पोटॅशियम नायट्रेटचा योग्य वापर तसेच जलसंवर्धनासाठी जलसंधारण सऱ्या काढण्याबाबत मार्गदर्शन केले.

कृषिविद्यावेत्ता डॉ. राजेश भालेराव, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर यांनी जैविक निविष्ठांच्या वापरावर भर दिला. सहयोगी संचालक संशोधन श्री. एस. बी. पवार यांनी आच्छादन व जलसंधारण सऱ्या या उपायांचा व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये प्रसार करून त्यांची प्रात्यक्षिके आयोजित करण्याची गरज व्यक्त केली.

तसेच डॉ. संजूला भावर, कृषी विज्ञान केंद्र, संभाजीनगर; डॉ. सचिन सोमवंशी, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर; डॉ. निठरवाल, कृषी विज्ञान केंद्र, परभणी आणि डॉ. सचिन सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांनीही सद्यस्थितीतील पीक परिस्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

पावसाच्या खंडकाळात महत्त्वपूर्ण पीक व्यवस्थापन उपाययोजना

पावसाच्या खंडकाळातील परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एकात्मिक व शास्त्रीय पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी सांगितले.

त्यांनी पुढील महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविल्या :

१) पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे.

२) उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संवेदनशील अवस्थेतील पिकांना संरक्षित सिंचन द्यावे.

३) कापूस व तूर पिकांमध्ये जलसंधारण सऱ्या काढून पुढे पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे शेतात जलसंधारण करावे.

४) तण नियंत्रणाला प्राधान्य द्यावे, कारण तण पिकांशी उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतात.

५) पिकांच्या अवस्थेनुसार योग्य आंतरमशागतीद्वारे जमिनीतील भेगा बुजवून ओलावा टिकवून ठेवावा.

६) पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करावे. जैविक निविष्ठांचा वापर वाढवावा आणि आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

७) आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा संरक्षित करावा.

८) पिकांच्या अवस्थेनुसार कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पोटॅशियम नायट्रेट (१ ते २ टक्के) किंवा ००:५०:३४ (१ टक्का) यांसारख्या अन्नद्रव्यांची फवारणी साधारणतः ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी, जेणेकरून पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होईल.

९) बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांना जैविक व अजैविक ताण सहन करण्यास मदत होऊ शकते.

१०) पावसाच्या खंडकाळात अन्नद्रव्यांची फवारणी करताना पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच उपाययोजना कराव्यात.

११) संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करावा. तसेच पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविण्यासाठी उपलब्ध जलसंधारण उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

या आढावा बैठकीमुळे लातूर व छत्रपती संभाजीनगर विभागांतील तालुकानिहाय पीकस्थिती, संभाव्य नुकसानाची पातळी तसेच सर्वाधिक प्रभावित पिकांची सविस्तर व वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध झाली आहे. त्याआधारे शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार तातडीचा तांत्रिक सल्ला देणे शक्य होणार आहे.

पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पिकांचे नुकसान कमीत कमी करण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करून आवश्यक उपाययोजना राबविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

समारोपात विभागीय कृषी सहसंचालक, लातूर श्री. महेश तीर्थकर यांनी हवामानाचा अंदाज व सद्यस्थिती लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले. तसेच आपत्कालीन पीक व्यवस्थापन व उपलब्ध तंत्रज्ञानविषयक उपाययोजनांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

आगामी सात ते आठ दिवसांतील पाऊस हा मराठवाड्यातील खरीप पिकांच्या पुढील स्थितीसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करून स्थानिक परिस्थितीनुसार योग्य पीक व्यवस्थापन उपाययोजनांचा अवलंब करावा, उपलब्ध पाणी व जमिनीतील ओलाव्याचे योग्य नियोजन करावे आणि कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार तातडीच्या व्यवस्थापन उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

या आढावा बैठकीचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सुरेश खटिंग यांनी केले, तर आभार प्रदर्शनही डॉ. आनंद गोरे यांनी केले. सदर आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी डॉ. एम. आर. मोरे, श्री. सुरेश खटिंग व श्री. अमर राऊत यांनी परिश्रम घेतले.