Tuesday, September 1, 2026

वनामकृविच्या कृषि वनस्पतीशास्त्र विभागात डॉ. प्रताप देशमुख यांचे हवामान बदल आणि कडधान्यांवर मार्गदर्शन

 वनस्पती शरीरक्रियाशास्त्रातील आधुनिक संशोधनाचा कृषि विकासासाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने हवामानातील बदल आणि कडधान्ये” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. कृषि अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेले हे व्याख्यान ऑनलाइन माध्यमातून विद्यापीठांतर्गत इतर महाविद्यालये व संशोधन केंद्रांसाठीही उपलब्ध करून देण्यात आले.

या विशेष व्याख्यानासाठी भारतीय कृषि अनुसंधान संस्था (आयएआरआय), नवी दिल्ली येथील वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख तथा प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. प्रताप देशमुख यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना मार्गदर्शन केले. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषि संशोधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व हवामान-अनुकूल कृषि पद्धती विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभागप्रमुख प्रा. पी. एस. नेहरकर, डॉ. सचिन मोरे, माजी विभागप्रमुख डॉ. खंडागळे, डॉ. कुलकर्णी आणि डॉ. गित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रताप देशमुख यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कडधान्य पिकांपुढील विविध आव्हाने तसेच वनस्पती शरीरक्रियाशास्त्राचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. आधुनिक शेतीमध्ये वनस्पतींची वाढ, विकास, उत्पादनक्षमता आणि विविध प्रतिकूल परिस्थितींमध्ये तग धरण्याची क्षमता वाढविण्यामध्ये वनस्पती शरीरक्रियाशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करून आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषि संशोधनामध्ये प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावपूर्ण परिस्थितीत कडधान्य पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक संशोधन, योग्य वाणांची निवड आणि वनस्पती शरीरक्रियाशास्त्रावर आधारित अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रताप देशमुख यांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रासह अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील विविध उपक्रमांना भेट दिली. त्यांनी बायोमिक्स युनिट, सुदूर संवेदन प्रयोगशाळा, मृदाशास्त्र विभाग, महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र तसेच मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील बियाणे उत्पादन युनिटची पाहणी केली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमालाही त्यांनी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कृषि वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जयकुमार देशमुख, डॉ. गजानन नाईक, डॉ. पवन ठोंबरे तसेच कृषि वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या विशेष अतिथी व्याख्यानामुळे विद्यार्थी व संशोधकांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कडधान्य पिकांचे व्यवस्थापन, वनस्पती शरीरक्रियाशास्त्रातील आधुनिक संकल्पना तसेच कृषि संशोधनातील विविध संधींबाबत मौल्यवान मार्गदर्शन मिळाले.