विद्यार्थ्यांना
नवीन ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील
असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या
व्याख्यानासाठी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) कृषि व जलसंसाधन विभागातील
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवकुमार व्यास हे
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी
महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधत कृषि अभियंत्यांसाठी
उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक, संशोधन व व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. व्यास
यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त
विद्यापीठामध्ये (इग्नू) उच्च शिक्षण,
संशोधन, कौशल्यविकास आणि प्रेरणादायी
संवादाच्या उपलब्ध संधींची माहिती दिली.
यावेळी डॉ.
शिवकुमार व्यास यांनी महाविद्यालयातील विविध प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील सुविधा
व उपलब्ध पायाभूत सुविधांची पाहणी केली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कृषि
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील अद्ययावत पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक वातावरणाचे कौतुक
केले.
त्यानंतर
त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी आणि टीएएफई, चेन्नई यांच्या संयुक्त
विद्यमाने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटरला भेट देऊन तेथील कृषि
यांत्रिकीकरणाशी संबंधित विविध उपक्रम व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांशी
संवाद साधताना डॉ. शिवकुमार व्यास म्हणाले की,
शिक्षण म्हणजे केवळ पदवी संपादन करणे किंवा परीक्षेत चांगले गुण
मिळविण्याचे साधन नसून, ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातील
समस्या सोडविण्यासाठी करण्याची क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया आहे. कृषि
अभियांत्रिकी, मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी, औष्णिक अभियांत्रिकी तसेच शिक्षण व शैक्षणिक प्रशासन या विविध क्षेत्रांत
काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांनी
नेहमी ‘का?’, ‘कसे?’ आणि ‘यापेक्षा
अधिक चांगले काय करता येईल?’ असे प्रश्न स्वतःला विचारले
पाहिजेत.
नवीन गोष्टी
शिकण्याची जिज्ञासा, आव्हाने
स्वीकारण्याची तयारी आणि समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय ही
यशाची महत्त्वाची सूत्रे आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात
केवळ आपल्या विषयाचे ज्ञान पुरेसे नाही. त्यासोबतच बहुविषयक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संवादकौशल्य, तंत्रज्ञानाचा
योग्य वापर आणि समाजाच्या गरजा समजून घेण्याची क्षमता आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी
आपल्या शिक्षणाचा संबंध समाज, उद्योग, शेती आणि राष्ट्राच्या विकासाशी जोडला
पाहिजे. अपयशाला घाबरू नका; प्रत्येक अडचण ही शिकण्याची आणि
स्वतःला अधिक सक्षम बनविण्याची संधी असते. शिक्षकांकडून केवळ माहिती घेण्याऐवजी
त्यांच्याशी संवाद साधा, प्रश्न विचारा, चर्चा करा आणि स्वतःच्या कल्पना मांडण्याचे धाडस करा, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या
करिअरबरोबरच समाजासाठी उपयुक्त असे काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. ज्ञान, प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी
आणि आव्हानात्मक काम स्वीकारण्याची तयारी असेल तर कोणतीही समस्या असाध्य नाही.
प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते; ती ओळखून
विकसित करावी आणि देशाच्या प्रगतीसाठी तिचा उपयोग करावा, असे
डॉ. व्यास यांनी नमूद केले.
तसेच, इग्नूच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध
मुक्त, लवचिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या संधींचा
विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘आयुष्यभर शिकत राहणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया
आहे’ या दृष्टिकोनातून आजीवन शिक्षणाची वृत्ती विकसित करणे आवश्यक असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या
प्रस्तावनेत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब
भाग्यवंत यांनी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता,
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत
असलेल्या माजी विद्यार्थ्यांविषयी माहिती दिली. राष्ट्राच्या विकासामध्ये कृषि
अभियांत्रिकीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कृषि यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, अचूक शेती आणि शाश्वत कृषि
विकासामध्ये कृषि अभियंत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. दत्तात्रय पाटील आणि डॉ. अनिल हरकळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण लाभले.


.jpeg)
.jpeg)

