Friday, September 4, 2026

कापूस संशोधन केंद्राच्या विविध उपक्रमांची माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून पाहणी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध संशोधन व विकासात्मक उपक्रमांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) कृषि व जलसंसाधन विभागातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवकुमार व्यास उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कापूस संशोधन केंद्रामध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन कार्याची पाहणी करून केंद्राच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली. कापूस पिकावरील संशोधन, विविध प्रात्यक्षिके तसेच केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

या भेटीदरम्यान केंद्राच्या नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाचीही माननीय कुलगुरूंनी प्रत्यक्ष पाहणी केली. बांधकामाचे काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित कालावधीत पूर्ण करण्याबाबत त्यांनी विद्यापीठाच्या अभियंत्यांना आवश्यक सूचना दिल्या.

कापूस संशोधन केंद्राच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून संशोधन व विस्तार कार्याला चालना देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. केंद्राच्या भविष्यातील विकासात्मक कामांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी कापूस विशेषज्ञ डॉ. विजयकुमार चिंचाणे तसेच कापूस संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.