वनामकृविच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञांचे आवाहन
मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे.
पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड आणि बदलत्या
हवामान परिस्थितीमुळे पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन त्याचा पिकांच्या वाढीवर,
उत्पादनावर तसेच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर परिणाम होऊ
शकतो. पावसाच्या खंड काळात उपलब्ध जमिनीतील ओलावा, पाणी,
अन्नद्रव्ये आणि चारा यांचे काटकसरीने व कार्यक्षम व्यवस्थापन करणे
अत्यंत आवश्यक आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची अवस्था, जमिनीतील
ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पुढील उपाययोजनांचा सल्ला परभणी येथील
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्यरत असलेले अखिल भारतीय कोरडवाहू प्रकल्पाचे प्रभारी
अधिकारी डॉ. आनंद गोरे, डॉ. मधुकर मोरे, डॉ . गणेश गायकवाड, डॉ. पपीता गौरखेडे यांनी दिला आहे.
१. पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील
ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे
पिकांची वाढीची अवस्था, पानांची
स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा, पिकांमध्ये
पाण्याच्या ताणाची लक्षणे यांचे नियमित निरीक्षण करावे.
हलकी जमीन, मध्यम जमीन
आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण वेगवेगळे असल्याने सर्व शेतांसाठी
एकच उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार व पिकाची अवस्था विचारात घ्यावी. पिकांमध्ये
सकाळच्या वेळी पाने कोमेजणे, पानांचा रंग बदलणे किंवा वाढ
मंदावणे यासारखी लक्षणे दिसल्यास ओलावा संवर्धन, संरक्षित सिंचन, आच्छादन, हलक्या कोळपण्या,
अन्नद्रव्याची फवारणी, साध्या पाण्याची फवारणी, जल संधारण सारी काढणे यापैकी
शक्य असेल अशा आवश्यक उपाययोजना कराव्यात.
२. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून
संरक्षित सिंचन द्यावे
सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा
कार्यक्षम व काटकसरीने वापर करावा. उपलब्ध पाणी संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात
देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य
द्यावे.
विशेषतः फुलोरा, शेंगा/बोंडांची
निर्मिती, दाणे भरणे किंवा फळवाढ यांसारख्या संवेदनशील
अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून
संरक्षण मिळण्यास मदत होते.
ठिबक व तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतींचा
वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी कार्यक्षम वापर करावा.
सकाळी किंवा सायंकाळी सिंचन पाणी द्यावे याचा प्रयत्न करावा.
३. पावसाचे प्रत्येक थेंब शेतात अडवून
जमिनीत मुरवावा
पावसाच्या खंडानंतर पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो.
त्यामुळे पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून न जाता शेतात जास्तीत जास्त मुरेल, यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात.
विशेषतः कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारण सऱ्या काढून
पावसाचे पाणी मुराविण्याचा उपाय करावा आणि
पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त मुरेल किंवा अडवावे अशा सऱ्या काढाव्यात.
उपलब्ध परिस्थितीनुसार सरी-वरंबा, कंटूर सऱ्या, बांधबंदिस्ती, इत्यादी उपायांचा अवलंब करावा.
शेततळे, नाला बांध, पाझर तलाव, विहिरी, कूप नलिका, येथील उपलब्ध पाणी आधुनिक सिंचन
पद्धतीचा वापर करून काटकसरीने वापरावे.
“पावसाचा प्रत्येक थेंब – शेताच्या बांधात व जमिनीच्या पोटात” या
दृष्टिकोनातून जलसंधारण करावे.
४. तण नियंत्रणाला प्राधान्य द्यावे
पावसाच्या खंड काळात पिकांबरोबर तणेही जमिनीतील उपलब्ध
पाणी व अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणाला विशेष महत्त्व
आहे.
पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचे वेळीच नियंत्रण
केल्यास उपलब्ध जमिनीतील ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते. जिथे
शक्य आहे तिथे उपट तण करावे.
५. पिकांच्या अवस्थेनुसार आंतरमशागत करून
ओलावा टिकवावा
पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी आंतरमशागत
करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या भेगा बुजविल्यास बाष्पीभवनाद्वारे
होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते.आंतरमशागत करताना पिकांच्या मुळांना
इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीची परिस्थिती व पीक अवस्था लक्षात घेऊन
योग्य वेळी कोळपणी किंवा इतर आंतरमशागतीची साधने वापरावीत. फळबागेत यावर भर
द्यावा.
६. कीड व रोगांचे नियमित निरीक्षण व
एकात्मिक व्यवस्थापन करावे
पावसाच्या खंड काळात पिकांवरील कीड व रोगांचे नियमित
निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नियमित पिकांची पाहणी करून किडींचा
प्रादुर्भाव, किडीची संख्या, रोगांची
लक्षणे आणि प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. शक्य तेथे जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षीथांबे, चिकट
सापळे, फेरोमोन सापळे इत्यादींचा वापर करावा. कीड आर्थिक
नुकसान पातळीच्या पुढे गेल्यानंतरच संबंधित पिकासाठी शिफारशीत रासायनिक
कीटकनाशकाचा वापर करावा. अनावश्यक व अवाजवी कीटकनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात.
७. आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा
संरक्षित करावा
पिकांच्या ओळींमध्ये उपलब्ध पीक अवशेष, गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केल्यास जमिनीच्या
पृष्ठभागावरील बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. आच्छादनामुळे
जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास, तणांची वाढ कमी होण्यास
आणि कालांतराने सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्धतेनुसार
सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर करावा.
८. पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य
व्यवस्थापन करावे
पावसाच्या खंड काळात जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळे
मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाची वाढीची
अवस्था,
जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन
पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पोटॅशियम
नायट्रेट (१ ते २ टक्के) किंवा ००:५०:३४ (१ टक्का) यांची फवारणी ८ ते १०
दिवसांच्या अंतराने करता येते. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ
शकते. मात्र फवारणी करताना पिकाची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि
स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच अन्नद्रव्यांची निवड,
मात्रा व फवारणीची वेळ निश्चित करावी. याशिवाय साध्या पाण्याची
फवारणी करता येते. यामुळे ३ते ४ दिवस पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.
९. जैविक निविष्ठांचा वापर करावा
पावसाच्या खंड काळात पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण
कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर उपयुक्त ठरतो. उपलब्धतेनुसार व शिफारशीनुसार
बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा
इत्यादींचा वापर करावा. तसेच पिअक्न्च्य अवस्थेनुसार आणि विशेषकरून फळ पिकात शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक स्थिती,
सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता
सुधारण्यास मदत होते.
१०. पशुधनासाठी चारा पिकांचे नियोजन करावे
पावसाच्या खंड काळाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे तर
पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी
उपलब्ध पाणी व क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचे नियोजन करावे. शक्य
असल्यास ज्वारी, मका, बाजरी,
चारा गवत, बरसीम/लुसर्नसारखी योग्य हंगामी
चारा पिके तसेच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची
निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि
पशुधनाची संख्या विचारात घ्यावी.
उपलब्ध हिरवा चारा योग्य अवस्थेत कापून वाळवून hay
(हे ) तयार करणे किंवा योग्य पद्धतीने silage
मुरघास तयार करून साठवणे उपयुक्त ठरते.
यामुळे पुढील पावसाच्या खंड काळात चाऱ्याची उपलब्धता राखता येते.
११. उपलब्ध चाऱ्याचे पौष्टिक मूल्य व
उपयोगिता वाढवावी
चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्यास उपलब्ध
चाऱ्याचा अपव्यय टाळून त्याचा पौष्टिक व कार्यक्षम वापर करावा. कडबा किंवा
वाळलेल्या चाऱ्याचे योग्य आकारात चाफिंग (कुट्टी) केल्यास त्याचा अपव्यय कमी होऊन
पशुधनाला चारा खाणे सुलभ होते. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला
चारा आणि कडधान्यवर्गीय चारा यांचे संतुलित मिश्रण करावे.
गरजेनुसार पशुवैद्यकीय/पशुपोषण तज्ज्ञांच्या
मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण व आवश्यक पूरक खाद्य द्यावे. कमी पौष्टिक कडब्याची
पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धती
वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
चारा साठवताना तो पावसापासून सुरक्षित, कोरड्या व हवेशीर ठिकाणी साठवावा, जेणेकरून बुरशी
वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही.
१२. फळबागेत विशेष पीक व्यवस्थापन करावे
पावसाच्या खंड काळात फळबागेतील झाडांवर पाण्याचा ताण येण्याची
शक्यता अधिक असते. त्यामुळे फळबागेतील झाडांचे व जमिनीतील ओलाव्याचे नियमित
निरीक्षण करावे.
ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर
फळबागेत उपलब्ध असल्यास ठिबक सिंचनास प्राधान्य द्यावे.
झाडांच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. उपलब्ध पाण्यानुसार
सिंचनाचे नियोजन करून अनावश्यक पाणी वापर टाळावा.
सकाळी किंवा सायंकाळी सिंचन करावे
पावसाच्या खंड काळात शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी
सिंचन करावे. या वेळेत तापमान तुलनेने कमी असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी
होण्यास मदत होते. तीव्र उष्णतेच्या वेळी सिंचन टाळणे योग्य ठरते.
फळझाडांच्या आळ्यात आच्छादन करावे
झाडांच्या बुंध्याभोवती व मुळांच्या परिसरात सेंद्रिय
आच्छादन करावे. यासाठी उपलब्ध पीक अवशेष, वाळलेले
गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थ वापरता येतात. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यास, जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास आणि तणांची वाढ
कमी होण्यास मदत होते. मात्र आच्छादन थेट झाडाच्या बुंध्याला चिकटून ठेवू नये,
कारण त्यामुळे बुंध्याजवळ जास्त आर्द्रता निर्माण होऊन रोगांचा
प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
फळबागेत रोग व्यवस्थापन
पावसातील खंडानंतर आर्द्रता व तापमानातील बदलांमुळे काही
रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे फळझाडांची नियमित पाहणी करावी. सुकलेल्या, रोगग्रस्त फांद्या व पाने काढून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावी. बोर्डोपेस्टचा
वापर विशेषतः छाटणीच्या जखमा, खोडावरील जखमा किंवा संबंधित
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या भागावर संबंधित फळपिकासाठी शिफारशीत
पद्धतीने करावा. बोर्डोपेस्ट तयार करण्याची पद्धत व प्रमाण पिकानुसार बदलू शकते;
त्यामुळे कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणातच वापर
करावा. फळबागेत अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळून एकात्मिक रोग व्यवस्थापनाला
प्राधान्य द्यावे.
१३. फळबागेत अन्नद्रव्य व्यवस्थापन व
झाडांवरील ताण कमी करावा
पाण्याचा ताण असताना जास्त प्रमाणात रासायनिक खते जमिनीत
देणे टाळावे. झाडांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि
अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
आवश्यकतेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्णीय
अन्नद्रव्य फवारणी करता येते. मात्र पाण्याचा तीव्र ताण असताना किंवा
अतिउष्णतेच्या परिस्थितीत फवारणी न करता योग्य वेळ निवडावी.
१४. पुढील पावसासाठी शेत तयार ठेवावे
पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या
प्रमाणात पडण्याची शक्यता असल्याने शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणे
आवश्यक आहे.
शेतातील बांध मजबूत करणे, जलसंधारणाच्या
सऱ्या, चर, शेततळे आणि इतर
जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त
जमिनीत मुरेल यासाठी योग्य नियोजन करावे.
१५. शेततळे बशिभावान कमी करण्याचे उपाय;
तापमान वाढल्यावर (ऑक्टोबर महिन्यापासून) किंवा उन्हाच्या
लाटा असल्यास शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी सीटायल अल्कोहोल २०
मिलीग्राम प्रती चौरस मीटर यानुसार दर १० दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर
वापरावे.
महत्त्वाचे आवाहन
पावसाच्या खंड काळात कोणतीही उपाययोजना सर्व पिकांसाठी
किंवा सर्व शेतांसाठी एकसारखी लागू होत नाही. पिकाची वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, सिंचनाची उपलब्धता, पिकाची सद्यस्थिती आणि स्थानिक
हवामान परिस्थिती यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.
विशेषतः अन्नद्रव्यांची फवारणी, कीटकनाशके, बुरशीनाशके, जैविक
निविष्ठा, बोर्डोपेस्ट तसेच चारा प्रक्रिया यांचा वापर
संबंधित पिकासाठी शिफारशीत पद्धतीने आणि कृषी/पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या
मार्गदर्शनानुसार करावा.
पावसाचा खंड म्हणजे केवळ संकट नव्हे; योग्य नियोजन, उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन, काटकसरीचे सिंचन, जलसंधारण, पीक
संरक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पशुधनासाठी चारा नियोजन
यांच्या माध्यमातून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करा, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा आणि पिके व पशुधनाचे शाश्वत
व्यवस्थापन करावे असे शेतकरी बांधवांना आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पा तर्फे करण्यात आले आहे.
.jpeg)


