Friday, September 4, 2026

सायाळ येथे दहा दिवसीय रेशीम प्रशिक्षणातील शेतकऱ्यांना वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; रेशीमपासून पैठणी निर्मितीसह मूल्यवर्धनावर भर

 शेतकऱ्यांनी उत्पादकाबरोबर उद्योजकही बनावे


शेतकऱ्यांनी केवळ शेतीतून उत्पादन घेण्यापुरते मर्यादित न राहता उत्पादित मालावर प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि थेट विक्री करून उद्योजक बनण्याची गरज आहे. शेतकरी व महिला शेतकरी गटांनी एकत्रित येऊन रेशीम शेतीला उद्योगाची जोड द्यावी. मराठवाड्यातील रेशीम कोष एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग उभारावेत आणि रेशीमपासून पैठणीसारखी दर्जेदार वस्त्रे तयार करावीत. या संपूर्ण प्रक्रियेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे प्रतिपादन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

सायाळ (ता. लोहा, जि. नांदेड) येथील ढगे पाटील फार्म हाऊस येथे सुरू असलेल्या दहा दिवसीय रेशीम प्रशिक्षण कार्यक्रमाला दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महिला शेतकरी गट, शेतकरी गट तसेच प्रशिक्षणार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) कृषि व जलसंसाधन विभागातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवकुमार व्यास उपस्थित होते.

पुढे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, आपल्याला उद्योजक बनायचे असेल, तर शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन ते केवळ बाजारात विकण्याऐवजी त्यापासून धागा, वस्त्रे आणि विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली पाहिजेत. संपूर्ण मराठवाड्यातील रेशीम उत्पादन एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग उभारण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे.

विशेषतः महिला शेतकऱ्यांनी रेशीमपासून पैठणीसारखी पारंपरिक आणि उच्च मूल्याची वस्त्रे तयार करण्याच्या दिशेने पुढे यावे. यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी धान्य, भाजीपाला आणि विविध पिकांचे उत्पादन घेतो; मात्र त्याला समाधानकारक भाव मिळत नाही. दुसरीकडे ग्राहकांनाही तोच माल अधिक किमतीत खरेदी करावा लागतो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही समाधान होत नाही. यामागे बाजारपेठेतील मध्यस्थांची साखळी हे प्रमुख कारण असल्याचे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल शक्य तितका थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यासाठी शेतकरी गट, महिला गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सायाळ हे प्रगतिशील गाव असून लोहा तालुका लोहासारखाच मजबूत आहे. मी सायाळ येथे आतापर्यंत तीन वेळा आलो असून प्रत्येक वेळी शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागात येऊन शेतकऱ्यांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे मला विशेष आवडते. मराठवाड्यातील शेतकरी एकमेकांना सोबत घेऊन पुढे जातात, याचा मला मनापासून अभिमान आहे, असे गौरवोद्गार माननीय कुलागुरुनी काढले.

शेतकऱ्यांना एकत्रित करून प्रशिक्षण देणे, त्यांना विद्यापीठाशी जोडणे तसेच कृषी विभाग आणि विद्यापीठातील उपलब्ध तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे - पाटील  यांच्यासारख्या प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांची जिल्ह्याला आणि तालुक्याला गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘‘तू आणि ती’’ दोघेही एकत्र आले, तर कोणतीही क्रांती घडवून आणता येते. महिला शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास रेशीम शेतीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणता येईल. मराठवाड्यातील महिलांनी स्वतः उत्पादित केलेल्या रेशमापासून स्वतःची साडी तयार करावी, ही संकल्पना मला विशेष आवडेल, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

यासाठी मराठवाड्यातील महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करून रेशीमपासून वस्त्रनिर्मिती, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ या विषयांवर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता नवनवीन तंत्रज्ञान, नवीन पिके तसेच अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये विविधता आणणे आणि उत्पादनाबरोबरच बाजारपेठेचाही विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू यांचे ढगे पाटील फार्म हाऊस येथे आगमन झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा, सायाळ येथील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून त्यांचे उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या या उत्स्फूर्त स्वागताचे माननीय कुलगुरूंनी कौतुक केले. पूर्वी महिलांना शिक्षणाच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होत्या; मात्र आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सुमारे ६० टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. हे बदलत्या भारताचे सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

यावेळी रेशीम कार्यालयाचे श्री. अभय कुलकर्णी, परिसरातील प्रगतिशील शेतकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी महिला गट, कृषीप्रधान ऑर्गेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक, प्रशिक्षक शिवप्रसाद माळवटकर, व्यंकटराव ढगे, संभाजी ढगे, सुदाम पाटील ढगे, मदन पाटील ढगे, ज्ञानोबा हौसाजी जामगे, डी. जी. जामगे, बालाजी जामगे, चांदोजी जामगे, ज्ञानोबा येवले, पवन किरवले, मनोज जाधव, अर्जुन पवार, काशिनाथ जामगे, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.