हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती अधिक
सक्षम, शाश्वत आणि हवामानास अनुकूल करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा
कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती
संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप उपक्रमाच्या
माध्यमातून परभणी तालुक्यातील उजळंबा येथील अनुसूचित प्रवर्गातील निवड झालेल्या
शेतकरी प्रतिनिधींना तुषार सिंचन संचांचे दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी वितरण
करण्यात आले.
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ.
भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तुषार सिंचन
संचांचे वितरण अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य
शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाभुळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री.
ज्ञानोबा पारधे उपस्थित होते. कार्यक्रमास अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन
प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे, तसेच इंजी.
विकास सांगळे, शास्त्रज्ञ, अधिकारी,
कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत श्री. उमाजी कांबळे, श्री. केरबा कांबळे, श्री. जनाजी कांबळे आणि श्रीमती सुलवंती साबळे या शेतकऱ्यांना तुषार सिंचन
संचांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हरीश आवारी यांनी हवामान बदलाच्या परिस्थितीत
कमी खर्चिक व स्थानिक परिस्थितीला अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन
केले. विहीर, कूपनलिका किंवा शेततळे यांसारख्या उपलब्ध जलस्रोतांमधील पाण्याचा
कार्यक्षम व काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनासारख्या आधुनिक सिंचन
पद्धतींचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले. शक्यतो सिंचन
सकाळी किंवा सायंकाळी करावे, असेही त्यांनी नमूद केले.
तुषार सिंचन संचाचा कार्यक्षम वापर व दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित
करण्यासाठी नियमित देखभाल आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक सिंचनानंतर
पाईप, जॉइंट, व्हॉल्व्ह व तुषारकांची तपासणी करावी,
गळती असल्यास त्वरित दुरुस्ती करावी तसेच नोजलमध्ये माती, वाळू किंवा कचरा साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे
मार्गदर्शन केले. फिल्टर नियमित स्वच्छ करावा. वापरानंतर पाईपमधील पाणी काढून ते
सावलीच्या ठिकाणी व्यवस्थित गुंडाळून ठेवावेत व संच दीर्घकाळ उन्हात उघडा ठेवू नये,
असेही त्यांनी सांगितले.
श्री. ज्ञानोबा पारधे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा
अवलंब केल्यास उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून कमी खर्चात उत्पादनवाढ साध्य
करता येते, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी हवामान बदलानुरूप
उपक्रमाची उद्दिष्टे, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाच्या
प्रात्यक्षिकाधारित प्रसाराबाबत माहिती दिली.
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे
नियमित निरीक्षण करावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील
अवस्थेत संरक्षित सिंचन द्यावे. कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणासाठी सऱ्या काढून
पावसाच्या प्रत्येक थेंबाचे शेतात संवर्धन करावे. तण नियंत्रणाला प्राधान्य देऊन
आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीतील भेगा बुजवून ओलावा टिकवून ठेवावा. तसेच कीड व
रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा, असे त्यांनी
सांगितले.
जैविक निविष्ठांचा वापर करावा आणि आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच
रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा संरक्षित
करावा. पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने
करावी. पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के किंवा ००:५०:३४ हे जलविद्राव्य खत १ टक्के
प्रमाणात योग्य परिस्थितीत वापरल्यास पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ
शकते. बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर
केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते,
असेही त्यांनी नमूद केले.
पावसाच्या खंडाच्या काळात अन्नद्रव्यांची फवारणी करताना पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना कराव्यात. संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर करावा तसेच पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात शेतात मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पापिता गोरखेडे यांनी केले.
कार्यक्रमानंतर शेतकरी प्रतिनिधींनी अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती
संशोधन प्रक्षेत्रास भेट देऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी पावसाच्या
खंडाच्या काळात पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, पिकांची पाण्याची
गरज, उपलब्ध ओलाव्याचे व्यवस्थापन, तुषार
सिंचनाचा कार्यक्षम वापर, मृदा व जलसंधारण तसेच हवामान
बदलाच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. आनंद गोरे, डॉ.
मधुकर मोरे, डॉ. पापिता गोरखेडे, श्री.
सुरेश खटिंग व श्री. विलास रिठे यांनी मार्गदर्शन केले.
“पाणी वाचवा, संसाधने जपा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा
अवलंब करा” या त्रिसूत्रीच्या माध्यमातून हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जात
कोरडवाहू शेती अधिक सक्षम व शाश्वत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

.jpeg)


