वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत डीएफएसआरडीए (DFSRDA) सेंटर ऑफ एक्सलन्स येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषि
वनस्पतीशास्त्र विभागातील एम.एस्सी. द्वितीय वर्षाचे
विद्यार्थी श्री. सुभाष कुमार आणि कु. वैष्णवी राजाराम नाकतोडे यांनी राष्ट्रीय
स्तरावरील ‘AGGNITE 6.0’ या
उद्योजकता स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
ही राष्ट्रीय
स्तरावरील स्पर्धा भाकृअप–नॅशनल अकॅडमी ऑफ
ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (ICAR-NAARM), हैदराबाद येथे
आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे आयोजन a-IDEA, ICAR-NAARM यांच्या वतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेत
वनामकृवि संघामध्ये अनिश शहाणे, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी आणि विशाल कालबाडे, पीएच.डी.
कृषी अभियांत्रिकी यांचाही सहभाग होता. या संघाला प्रा. डॉ. गोपाल शिंदे आणि डॉ.
हिराकांत कालपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
देशभरातून या
स्पर्धेसाठी तब्बल ३४५ अर्ज प्राप्त झाले होते.
त्यानंतर तीन टप्प्यांत कठोर निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या
प्रक्रियेतून देशातील केवळ १० उत्कृष्ट संघांची अंतिम निवड करण्यात आली. निवड
झालेल्या संघांसाठी दि. २५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ICAR-NAARM, हैदराबाद येथे एक आठवड्याचा उद्योजकता विकास बूटकॅम्प आयोजित करण्यात आला
होता.
या
बूटकॅम्पदरम्यान संघांच्या कल्पना,
तंत्रज्ञान, व्यवसाय क्षमता, नवोन्मेष, व्यवहार्यता आणि सादरीकरणाचे विविध
टप्प्यांवर मूल्यमापन करण्यात आले. बूटकॅम्पनंतर झालेल्या चौथ्या व अंतिम
मूल्यमापन फेरीत सुभाष कुमार आणि वैष्णवी नाकतोडे यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी
करत देशातील अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळविले आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
पटकावला.
दिनांक १
सप्टेंबर २०२६ रोजी ICAR-NAARMच्या ५१व्या
स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात
आले. या कार्यक्रमास पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा तसेच डॉ. एम. एल. जाट, महासंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांची प्रमुख उपस्थिती होती. सुभाष कुमार आणि वैष्णवी नाकतोडे यांनी
त्यांचे मार्गदर्शक डॉ. गोपाल शिंदे यांच्यासमवेत हा पुरस्कार स्वीकारला.
या उल्लेखनीय यशामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच उद्योजकता क्षेत्रातील योगदानाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठातील अधिकारी, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पालकांनी सुभाष कुमार, वैष्णवी नाकतोडे आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. जी. यू. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

