Friday, September 4, 2026

वनामकृवितर्फे संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीकडे ४२ तंत्रज्ञान शिफारशी सादर

 दापोली येथे ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान ‘५४ वी जॉइंट ॲग्रेस्को’; कृषि संशोधन व नवीन तंत्रज्ञानावर होणार मंथन

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दि. ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये विकसित झालेल्या विविध संशोधन निष्कर्षांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व शिफारशींवर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

या बैठकीचा उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील सर विश्वेश्वरराव सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठांचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे हे राहणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीसाठी विविध पिकांचे वाण, पीक उत्पादन तंत्रज्ञान, कृषि अवजारे तसेच कृषि क्षेत्राशी संबंधित अन्य विषयांवरील एकूण ४२ तंत्रज्ञान शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे सादर करण्यात येणाऱ्या शिफारशींमध्ये वाण प्रसारणासंदर्भात सोयाबीनची एक, आंब्याची एक आणि भाजीपाला पिकांच्या तीन अशा एकूण पाच शिफारशींचा समावेश आहे. तसेच कृषि अवजारांशी संबंधित चार शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

विविध तंत्रज्ञानविषयक शिफारशींमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या पाच, पशुविज्ञान व दुग्धशास्त्राच्या सात, सामाजिक शास्त्राच्या आठ, पीक संरक्षणाच्या सात, कृषि अभियांत्रिकीच्या दोन, मूलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र व जैवतंत्रज्ञानाच्या बारा तसेच डिजिटल कृषि क्षेत्रातील एका शिफारशीचा समावेश आहे.

मराठवाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विषयांवरील संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञान शिफारशी आधुनिक, उपयुक्त आणि शाश्वत कृषि पद्धतींच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

दरम्यान, दापोली येथे होणाऱ्या जॉइंट ॲग्रेस्को बैठकीत विविध पिकांवरील संशोधन, नवीन व सुधारित वाण, पीक व्यवस्थापन पद्धती, कृषि यांत्रिकीकरण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत कृषि तंत्रज्ञानावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यातील कृषि क्षेत्रासमोरील हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच बदलती बाजारपेठ या आव्हानांचा विचार करून कृषि संशोधन अधिक शेतकरीकेंद्रित करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत.

राज्यातील कृषि संशोधनाला अधिक परिणामकारक दिशा देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधनाधारित उपाययोजना विकसित करण्यासाठी ही संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची बैठक अर्थात जॉइंट ॲग्रेस्को–२०२६’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.