Friday, November 16, 2018

वनामकृवित व महा अॅग्रो, औरंगाबाद यांच्या सामंजस्य करार

कृषि विद्यापीठाचा कृषि विस्तार कार्याचा भाग म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महा अॅग्रो, औरंगाबाद यांच्यात दिनांक 15 नोव्हेबर रोजी सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्वावर सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थिती होती. करारावर विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले व महा अॅग्रोचे मुख्‍य समन्वयक अॅड वसंत देशमुख यांनी स्‍वाक्षरी केल्‍या तर यावेळी महाअॅग्रोचे समन्‍वयक श्री टी टी पाथरीकर, श्री प्रकाश उगले, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, उपकुलसचिव श्री रविंद्र जुक्टे, डॉ एस बी पवार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, डॉ के टि जाधव, डॉ दिप्ती पाटगांवकर आदींची उपस्थिती होती. करारानुसार विद्यापीठ विकसित व शिफारसीत कृषि तंत्रज्ञान तसेच विविध खाजगी कंपन्‍याच्‍या पिकांचे जातीचा समावेश असलेले कृषि प्रदर्शनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र व कृषी विद्यालय परिसरातील पाच एकर प्रक्षेत्रावर विकसित करण्‍यात येऊन पाहण्‍यासाठी शेतक-यांना उपलब्‍ध होणार आहे. सदरिल प्रात्‍यक्षिके विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या सल्‍ल्‍यानुसार विकसित करण्‍यात येणार आहे.

Thursday, November 15, 2018

माननीय पद्मश्री अॅड उज्‍वलजी निकम साधणार कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांशी संवाद



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषिच्‍या विद्यार्थ्‍यीशी दिनांक 17 नोव्‍हेबर रोजी दुपारी 3.00 वाजता महाराष्‍ट्र राज्‍याचे विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री अॅड उज्‍वलजी निकम हे युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्‍यातील आव्‍हाने या विषयावर कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात संवाद साधणार असुन संवाद कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार आहे. तसेच शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजीत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल संवाद कार्यक्रमाचा लाभ विद्यापीठातील विद्यार्थ्‍यीनी घ्‍यावा असे आवाहन आयोजक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे.

मराठी विश्‍वकोश निर्मितीसाठी नोंद लेखन ही कृषि शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारी.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृवित मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्‍या कृषिविज्ञान ज्ञानमंडळाची नोंद लेखन कार्यशाळा संपन्‍न
राज्‍यातील शेतीच्‍या विकासात कृषिशास्‍त्रांचे मोठे योगदान असुन मराठी विश्‍वकोशात कृषिशास्‍त्रांशी निगडीत अनेक माहितीचा अभाव आहे. यासाठी कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांनी आपआपल्‍या विषयातील मा‍हितीचे नोंद लेखन करून मराठी विश्‍वकोश अद्ययावत करावा, ही एक कृषी शास्‍त्रज्ञांची ऐतिहासिक जबाबदारीच आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोशाच्‍या कृषिविज्ञान ज्ञान मंडळाच्‍या वतीने दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी लेखकांच्‍या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, मंडळाचे सचिव श्री श्‍यामकांत देवरे, कृषिविज्ञान ज्ञान मंडळाचे समन्‍वयक प्राचार्य डॉ प्रमोद रसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, मराठी विश्‍वकोशातील कृषिशास्‍त्राच्‍या माहितीचा शेतकरी, विद्यार्थ्‍यी, शास्‍त्रज्ञ, सामान्‍य नागरीक यांना मोठा उपयोग होणार आहे. त्‍याकरिता बिनचुक, अद्ययावत, नेमकी माहितीची नोंद लेखकांनी करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठी भाषेत कृषिशी निगडीत शास्‍त्रशुध्‍द, नेमकी व सोपी माहिती इंटरनेटवर मर्यादीतच उपलब्‍ध असुन मराठी विश्‍वकोशाच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञानाबाबत अधिकृत व योग्‍य मराठी ज्ञान उपलब्‍ध होणार आहे. समन्‍वयक डॉ प्रमोद रसाळ आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषी तंत्रज्ञानाबाबत शास्‍त्रशुध्‍द माहिती इंग्रजी माध्‍यमात मोठया प्रमाणात असुन त्‍या तुलनेत मराठीत फारच कमी आहे. हे ज्ञान पुर्णपणे मराठीत उपलब्‍ध झाले तर या माहितीच्‍या आधारे शेतीत क्रांती होईल.
कार्यशाळेत श्री श्‍यामकांत देवरे, डॉ प्रमोद रसाळ, डॉ रविंद्र गोडराज आदींनी मराठी विश्‍वकोशामध्‍ये नोंद लेखन करतांना लेखकांना आवश्‍यक मुद्दयांबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ सुभाष शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ संतोष कदम यांनी केले तर आभार डॉ सचिन मोरे यांनी मानले. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला होता.
महाराष्‍ट्र राज्‍य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्‍या वतीने मराठी विश्‍वकोशाचे वीस संहिता खंड मुद्रित स्‍वरूपात प्रकाशित करण्‍यात आले असुन हे सर्व खंड मराठी विश्‍वकोशाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. तसेच खंडातील माहिती कार्ड पेनड्राईव्‍ह व मोबाईल अॅपच्‍या स्‍वरूपात देखिल आहे. कृषिशी निगडीत माहितीच्‍या अद्ययावतीकरण राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाच्‍या मदतीने कृषिविज्ञान ज्ञान मंडळाच्‍या माध्‍यमातुन सुरू आहे.

दुष्‍काळात पशुधन व फळबाग वाचविण्‍यासाठीचे कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवा ..... कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर कृषी विस्‍तार कार्यक्रमांचा कृ‍ती आराखडा बैठक संपन्‍न
मराठवाडयातील आठही जिल्‍हयात कमी पर्जन्‍यामुळे दुष्‍काळाची परिस्थिती निर्माण झाली असुन पाण्या अभावी कमी क्षेत्रावर रबी पिकांची लागवड झालेली आहे. परंतु ज्‍या शेतक-यांकडे फळबागा आहेत, ते वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडील उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी कृषि विभागाच्‍या सहकार्याने फळबाग वाचविण्‍याचे अभियान हाती घ्‍यावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. मराठवाडयातील दुष्‍काळ परिस्थितीत शेतीत करावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाय योजना व उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा कृषि विस्‍तार कार्यक्रमाचा कृ‍ती आराखडा निश्चित करण्‍यासाठी दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते, या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. बैठकीस शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, खरिप हंगामात कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात आलेला विस्‍तार कार्यक्रमामुळे ब-याच अंशी गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण मिळविण्‍यात यश आले. याच प्रकारे दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर पुढील काळात पशुधन वाचविणे व चारा व्‍यवस्‍थापन यावर देखिल तंत्रज्ञान विस्‍ताराची मोहिम विद्यापीठ हाती घेणार आहे. या परिस्थितीत फळबागा वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडे कमी खर्चिक तंत्रज्ञान उपलब्‍ध आहे. तसेच उपलब्‍ध सोयाबीन किंवा इतर पिकांच्‍या अवशेषांपासुन पोषक चारा निर्मितीचे तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्‍स, अझोला निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार शेतक-यांमध्‍ये विविध माध्‍यमामार्फत शास्‍त्रज्ञांनी करावा, असा सल्‍ला देऊन विद्यापीठातील शंभर हेक्‍टर प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवड करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी अधिका-यांना दिले.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या विविध घटक व संलग्‍न महाविद्यालयात जेथे पाणी उपलब्‍ध आहे तेथील प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवडीसाठी निश्चित असे उदिदष्‍ट देण्‍यात येईल असे सांगितले. तसेच विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, दुष्‍काळ परिस्थितीत शेतीतील प्रतिबंधात्‍मक उपायाबाबत आकाशवाणी, दुरदर्शन, इलेक्‍ट्रॉनीक व छापील माध्‍यमे, समाज माध्‍यमांचा वापर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शनाकरिता वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.  
सदरिल बैठकीस विद्यापीठांतर्गत असलेले मराठवाडातील विविध संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, विभागीय कृषिविद्यावेत्‍ता, विविध महाविद्यालये येथील शास्त्रज्ञ, विषय तज्ञ, कृषि विस्‍तारक, अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. बैठकीत करण्‍यात आलेल्‍या चर्चाच्‍या आधारे दुष्‍काळ परिस्थिती उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी विद्यापीठ लवकरच धडक कृती कार्यक्रम राबविणार असल्‍याचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले.

Friday, November 2, 2018

मौजे रायपुर येथे कृषि संवाद कार्यक्रम संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे रायपुर येथे दिनांक 1 नोंव्‍हेंबर रोजी कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु एम खोडके, सरपंच दत्‍ताबुवा गिरी महाराज, प्रगतशील शेतकरी बी एन मस्‍के, डॉ ए टी शिंदे, डॉ ए जी बडगुजर, डॉ आर जी भाग्‍यवंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ यु एम खोडके यांनी उपलब्‍ध पाण्‍याचे कार्यक्षम व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच पशुसंवर्धनावर डॉ ए टी शिंदे व किड व्‍यवस्‍थापनावर डॉ ए जी बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. सरपंच दत्‍ताबुवा गिरी महाराज यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर जी भाग्‍यवंत यांनी केले. सुत्रसंचालन विनोद ओसावार यानी केले तर आभार राहुल कन्‍हेरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषीदुत व गांवक-यांनी परिश्रम घेतले.

मौजे असोला येथे कृषि संवाद कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन केंद्र याच्‍या सयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे असोला येथे दुष्‍काळी परिस्थितीत चा-याचे व पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन यावर दिनांक 31 ऑक्‍टोबर रोजी कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी दत्‍ताराव जावळे, कृषि विभागाचे माजी संचालक अनंतराव जावळे, विभाग प्रमुख डॉ आर डी आहिरे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ यु एम खोडके, डॉ एस पी म्‍हेत्रे, डॉ ए जी बडगुजर, डॉ ए टी शिंदे, लक्ष्‍मणराव जावळे, व्‍यंकटी जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ बी एम ठोंबरे यांनी दुष्‍काळ परिस्थितीत पशुसंवर्धन व पशुखाद्य व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ आर डी आहिरे यांनी शेतीपुरक जोड व्‍यवसयावर तर उपलब्‍ध पाण्‍याचे कार्यक्षम व्‍यवस्‍थापन यावर डॉ यु एम खोडके, किड व्‍यवस्‍थापनावर डॉ ए जी बडगुजर यांनी तर रबी पिक व्‍यवस्‍थापनावर डॉ एस पी म्‍हेत्रे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ ए टी शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन पल्‍लवी कांबळे व मोहिनी तिथे हिने केले तर आभार पुजा काळबांडे हिने मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषीकन्‍या व गांवक-यांनी परिश्रम घेतले.

Thursday, November 1, 2018

हवामान बदल व पावसावर आधारित शेती विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने हवामान बदल व पावसावर आधारीत शेती या विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 23 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान करण्‍यात आले होते, या प्रशिक्षणाच्‍या समारोप कार्यक्रम दिनांक 30 ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, हैद्राबाद येथील केद्रीय कोरडवाहू संस्थेचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ के अे गोपीनाथ, प्रशिक्षण संयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, दरवर्षी पडणा-या पावसाच्या विषमतेमुळे कोरडवाहू शेतीवर पावसाच्या पाण्याचा ताण पडत आहे. परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कृषि तंत्रज्ञान कोरडवाहु शेतीच्‍या दृष्टीने उपयुक्त आहे, त्याचा अवलंब केल्यास ब-याच अंशी दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करता येईल.  तर प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ के अे गोपीनाथ आपल्‍या मनोगतात म्हणाले की, कोरडवाहू तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत कृषी अधिका-यांच्या मार्फत गेले पाहिजे, या तंत्रज्ञानांचा वापर करतांना शेतक-यांना येणा-या अडचणींचा अभ्‍यास करून तंत्रज्ञानात सुधारणा करता येईल. अनियमित पाऊसाच्‍या परिस्थितीत रूंद वरंबा व सरी पध्‍दती तंत्रज्ञान सोयाबीन उत्‍पादकांसाठी उपयुक्त आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रत्येक शेतक-यांनी शेततळे, तसेच विहीर व कुपनलिका पुनर्भरण करण्याची गरज आहे. तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शेतक-यांनी सुधारित पाणी साठवण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कोरडवाहू उत्पादनात स्थिरता आणणे शक्य होईल असे सांगितले.
कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रास्ताविक मुख्यशास्त्रज्ञ डॉ भगवान आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ मदन पेंडके यांनी तर आभार डॉ हनवते यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमास तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातील एकूण 20 कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ ए. एस. जाधव, डॉ लोखंडे, परिहार, तुरे, श्रीमती सारीका नारळे, गणेश भोसले, सयद महेबूब, दिपक भूमरे आदींनी पुढाकार घेतला.