Thursday, October 1, 2026

वनामकृवि आणि बायोचार बाईट एजीटेक प्रा. लि. मध्ये कृषी अवशेषांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी सामंजस्य करार

बायोचार निर्मिती, मृदा आरोग्य संवर्धन आणि कार्बन रिमूव्हलसाठी एफपीओ -केंद्रित मूल्यसाखळी विकसित करण्याचा प्रयत्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि बायोचार बाईट एजीटेक प्रा. लि. (Biochar Byte AgTech Pvt. Ltd.) यांच्यामध्ये कृषी अवशेषांचे शाश्वत व्यवस्थापन, बायोचार निर्मिती, मृदा आरोग्य संवर्धन तसेच कार्बन रिमूव्हलच्या दृष्टीने तंत्रज्ञानाधारित उपक्रम राबविण्यासाठी दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा सामंजस्य करार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

या सामंजस्य करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार आणि बायोचार बाईट एजीटेक प्रा. लि. वतीने कंपनीचे संचालक श्री. विनायक पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, परभणी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिहर कोसडीकर, उपसंचालक संशोधन डॉ. रणजीत चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कृषी अवशेषांचे नियंत्रित पायरोलिसिस (Controlled Pyrolysis) तंत्रज्ञानाद्वारे उच्च-गुणवत्तेच्या बायोचारमध्ये रूपांतर करून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन करण्यावर या सामंजस्य कराराचा भर आहे. ‘Waste-to-Wealth’ संकल्पनेच्या माध्यमातून कृषी अवशेषांना आर्थिक मूल्य प्राप्त करून देण्याबरोबरच अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी करणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या सहकार्यांतर्गत कृषी अवशेषांचे संकलन व व्यवस्थापन, बायोचार निर्मिती, गुणवत्ता नियंत्रण, बायोचारचा शेतजमिनीत वापर, शेतकरी सहभाग तसेच कार्बन रिमूव्हलशी संबंधित नोंदी व दस्तऐवजीकरण यावर काम करण्यात येणार आहे. बायोचारचा मृदा सुधारक म्हणून वापर केल्यामुळे मातीची रचना, ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आणि पोषक तत्त्वांच्या कार्यक्षम वापरास मदत होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीकडून बायोमास मॅपिंग, उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण, ट्रेसिबिलिटी, शेतकरी नोंदी आणि MRV (Monitoring, Reporting & Verification) यासाठी डिजिटल प्रणाली विकसित केली जात आहे. या प्रणालीच्या माध्यमातून बायोचार निर्मितीपासून त्याचा शेतजमिनीतील वापर आणि कार्बन रिमूव्हलशी संबंधित प्रक्रियेपर्यंत पारदर्शक नोंद व मागोवा घेण्याची व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या निमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, एफपीओ च्या माध्यमातून कृषी अवशेषांचे संकलन, बायोचार निर्मिती, स्थानिक रोजगारनिर्मिती, मृदा आरोग्य संवर्धन, शेतकरी सहभाग आणि संभाव्य कार्बन अर्थव्यवस्था यांना जोडणारी एकात्मिक मूल्यसाखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण होण्यास तसेच कृषी अवशेष व्यवस्थापनाला व्यावसायिक स्वरूप देण्यास मदत होऊ शकते. शेतातील कचरा ही समस्या नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक मौल्यवान संसाधन आहे. FPOच्या माध्यमातून त्याचे मूल्यवर्धन करून कचऱ्यातून आर्थिक क्रांती घडविणे हे या करारामागचे ध्येय आहे, असे माननीय कुलगुरू यांनी नमूद केले.

या प्रसंगी कंपनीचे संचालक विनायक पाटील (CBO) यांनी एफपीओ (FPO)-केंद्रित बायोचार मॉडेल विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. स्थानिक पातळीवर उपलब्ध कृषी अवशेषांना कचरा न मानता त्यांचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर करून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण करण्यावर या मॉडेलचा भर राहणार आहे, असे सांगितले.

या सामंजस्य करारामुळे शाश्वत शेती, कृषी अवशेषांचे प्रभावी व्यवस्थापन, बायोचार तंत्रज्ञान, मृदा आरोग्य संवर्धन, कार्बन व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील मूल्यवर्धित उद्योग यांना एकत्रित चालना मिळण्यास मदत होणार आहे.