Friday, October 2, 2026

वनामकृवित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण; विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अभिवादन



राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच कुलसचिव श्री. पुरभा काळे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, कृषि रसायन आणि मृदा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ हरिहर कौसडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची व देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचे मूल्य समाजजीवनात रुजविण्यासाठी या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.