Friday, October 2, 2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या ९० विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त श्रमदान

‘स्वच्छता ही केवळ मजुरांची जबाबदारी नसून प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी’ — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि





राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी महाविद्यालय आणि विद्यापीठातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  हे अभियान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या अभियानात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि सुमारे ९० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.

यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे तसेच वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी केली.

यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला केवळ सामाजिक उपक्रम न मानता ती जीवनपद्धती म्हणून स्वीकारण्याचा संदेश दिला आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरासोबतच आपले कार्यालय आणि मनही स्वच्छ ठेवले पाहिजे. अस्वच्छतेमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते आणि रोगराई कोणतेही पद किंवा व्यक्ती पाहून येत नाही. त्यामुळे स्वच्छतेला प्रत्येकाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. स्वच्छता ही केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांची किंवा मजुरांची जबाबदारी आहे, अशी भावना न ठेवता प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्याने स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या दिवसापुरते मर्यादित न राहता स्वच्छतेचे कार्य सातत्याने सुरू ठेवून आपले महाविद्यालय तसेच संपूर्ण विद्यापीठ परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात विशेष स्वच्छता अभियान

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तद्नंतर अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयालगतच्या तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा, खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे रॅपर्स, विविध प्रकारचा कचरा तसेच गाजर गवत यांचे निर्मूलन करून परिसर स्वच्छ केला. संकलित केलेला कचरा योग्य पद्धतीने एकत्रित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता ही सेवा’, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणाऱ्या घोषणा देत परिसरात स्वच्छतेविषयी जनजागृती केली.

या स्वच्छता अभियानातून विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला. गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे विद्यापीठ परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.