महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा संदेश; परिसराची स्वच्छता करून जनजागृती
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
‘सेवा संकल्प अभियान’ आणि राष्ट्रीय
सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्वच्छता
अभियान दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात राबविण्यात आले. हे अभियान माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब
ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुनाथ
जायभाये पुढाकारातून राबविण्यात आले. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता
ती दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी
अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभियानाच्या प्रारंभी महाविद्यालयीन परिसरातून
पदयात्रा काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयक
घोषणांच्या माध्यमातून परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला.
यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्वच्छतेचे
महत्त्व अधोरेखित करताना महाविद्यालयीन परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक
जबाबदारी असल्याचे सांगितले. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार
करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सातत्याने सकारात्मक
योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छतेचे कार्य
केवळ अभियानापुरते मर्यादित न ठेवता ते नियमितपणे राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी
नमूद केले.
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व
विशद करून सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय
सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,
असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.
सुभाष विखे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश, कार्यपद्धती तसेच समाजाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका
याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविली.
परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
तसेच महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सह्याद्री वसतिगृह परिसर, अपघात प्रक्षेत्र तसेच इतर परिसरांमध्येही स्वच्छता करण्यात
आली.
या कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. मधुकर
मोरे, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. संदीपान
पायाळ, डॉ. विशाल इंगळे, इंजि.
लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. अनिकेत वईकर तसेच महाविद्यालयातील
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी गणेश बोराडे, स्वराज ठाकरे, संकेत पवार, वास्को टप्पे, सारंग गमे, राध्येशाम
खंटींग, कुणाल गडेक, सुचिता देशमुख,
सृष्टी गायकवाड, पायल सावंत तसेच विद्यार्थी आणि
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच जितेंद्र
खिल्लारे, श्रीमती सुनीता तळेकर, प्रमोद
राठोड, रमेश मोहिटे, भारत कुऱ्हे,
मुरली शिंदे आदींनी अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जबाबदारी, समाजसेवेची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधिक दृढ
झाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छता अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त
झाले. ‘स्वच्छ परिसर – निरोगी समाज – विकसित भारत’ या संकल्पनेला
प्रत्यक्ष कृतीची जोड देत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने स्वच्छतेचा
प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले.


.jpeg)



.jpeg)