शाश्वत शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील कर्बाचे संवर्धन व शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा लाभ देण्याचा प्रयत्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
आणि ग्लोबार्क सोल्युशन्स लिमिटेड यांच्यामध्ये कार्बन क्रेडिट निर्मितीसाठी
आवश्यक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी व शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याबाबत दिनांक
२ ऑक्टोबर २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला.
हा सामंजस्य करार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची अंमलबजावणी
करण्यात येणार असून, या उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत
शेती पद्धतींचा अवलंब, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संवर्धन
तसेच शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या
दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या सामंजस्य करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने संशोधन
संचालक डॉ. भगवान आसेवार आणि ग्लोबार्क सोल्युशन्स लिमिटेडच्या वतीने श्री. वत्सल अग्रवाल
यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे घटते प्रमाण ही शेतीसमोरील महत्त्वाची समस्या
असून, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी
शेती व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. या
उपक्रमांतर्गत मशागतीच्या पद्धतींमध्ये आवश्यक बदल, आधुनिक सिंचन
पद्धतींचा वापर, पिकांच्या अवशेषांचे आच्छादन, डाळवर्गीय पिकांचे आंतरपीक तसेच कर्ब संवर्धनासाठी बायोचारसारख्या तंत्रज्ञानाचा
वापर यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
शाश्वत शेती तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींच्या अवलंबातून
शेतजमिनीतील कर्बाचे संवर्धन करण्यास तसेच मृदा आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.
निर्धारित निकषांनुसार कार्बन क्रेडिट निर्मिती, त्याचे प्रमाणीकरण आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या
प्रक्रियेत ग्लोबार्क सोल्युशन्स लिमिटेड कार्य करणार आहे. यासाठी आवश्यक कृषि
तंत्रज्ञान, संशोधनाधारित मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून कर्ब संवर्धन, हवामान-सक्षम शेती, मृदा आरोग्य सुधारणा
आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्यास चालना मिळणार आहे.
विद्यापीठातील संशोधन, तंत्रज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान
शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम
महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, परभणी कृषि महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख
डॉ. हिराकांत काळपांडे, एकात्मिक शेती पद्धतीचे प्रभारी अधिकारी
तथा विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) के. टी. जाधव, मृदाशास्त्र विभाग
प्रमुख डॉ. हरिहर कोसडीकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.
प्रशांत देशमुख, उपसंचालक संशोधन डॉ. रणजीत चव्हाण, कापूस विशेषज्ञ डॉ. चिंचाणे, प्रभारी अधिकारी डॉ. मेघा
जगताप, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे आणि डॉ. कैलास डाखोरे
यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ व इतर मान्यवर
उपस्थित होते.


.jpeg)