Friday, October 2, 2026

उद्यानविद्या महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

 स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विद्यार्थ्यांना संदेश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छता ही केवळ परिसरापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. स्वच्छ आणि निरोगी वातावरणासाठी प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करून ती सातत्याने जपली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुढे सांगितले की, सध्या मृदा संवर्धनासोबतच हवेतील प्रदूषणाची समस्याही गंभीर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन तसेच वनक्षेत्राचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आगामी पिढ्यांना भोगावे लागू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जाणीव अंगीकारून समाजातही त्याबाबत जागृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते. तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. बी. एम. कलालबंडी, प्राध्यापक डॉ. ए. टी. दोंडे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. एस. जी. खंडागळे, एस. सी. पठाण यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.