महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या
कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांना विविध
शासकीय योजना, सेवा व माहिती प्रभावीपणे उपलब्ध करून देणे, कृषी
तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे,
सामाजिक सहभाग वाढविणे तसेच जलसंधारण, स्वच्छता
आणि शाश्वत शेतीबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे हे अभियान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
राबविण्यात येत आहे.
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
मौजे पेडगाव, ता. जि. परभणी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी शेतकरी
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात
घेऊन हळद व कापूस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, अन्नद्रव्य
व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापनाबाबत
तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. गजानन गडदे यांनी हळद लागवडीपासून काढणीपर्यंत घ्यावयाच्या
काळजीबाबत मार्गदर्शन केले. हळदीची लागवड करताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार
शास्त्रीय पद्धतीने योग्य आकाराचे बेड तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य
बेडमुळे हळदीच्या कंदांना वाढ व पोषणासाठी पुरेशी जागा मिळते आणि उत्पादनवाढीस मदत
होते, असे त्यांनी सांगितले.
हळद हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्यास अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात
आवश्यकता असते. त्यामुळे विद्यापीठाच्या शिफारशीनुसार बेसल खत मात्रा देऊन
त्यानंतर युरियाचा वापर योग्य प्रमाणात व विभागून करावा. तसेच दुसऱ्या व चौथ्या
महिन्यात ००:५२:३४ व ००:००:५० यांसारख्या खतांचा शिफारशीनुसार वापर करावा. पिकाची
गरज लक्षात घेऊन सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणेही आवश्यक असल्याचे डॉ. गडदे
यांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत काही हळद उत्पादक शेतांमध्ये पाने करपण्याची लक्षणे दिसून येत
असल्याने तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. यावेळी जस्त, लोह (फेरस) व
पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली. त्यामुळे पिकाची अवस्था व गरज लक्षात
घेऊन अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. गडदे यांनी ठिबक व तुषार
सिंचनाचे महत्त्व अधोरेखित केले. सध्याच्या आवर्षणसदृश परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा
कार्यक्षम वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत
होण्याबरोबरच खतांचा कार्यक्षम वापर करता येतो. विशेषतः हळद पिकामध्ये ठिबक
सिंचनाद्वारे पिकाच्या गरजेनुसार पाणी व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन अधिक
प्रभावीपणे करता येते. योग्य पिके व परिस्थितीनुसार तुषार सिंचनाचाही वापर करून
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम उपयोग करता येतो, असे त्यांनी सांगितले.
कापूस पिकाबाबत मार्गदर्शन करताना घन लागवड पद्धतीचा अवलंब करून
उत्पादनवाढीच्या दृष्टीने योग्य पीक नियोजन करावे, असे डॉ. गडदे यांनी सांगितले. घन
लागवडीसाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या योग्य वाणांची निवड करून लागवड अंतर,
अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच
कीड व रोग व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी हळद पिकावरील कंदमाशीच्या
व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कंदमाशीची अळी जमिनीत व कंदामध्ये राहून नुकसान
करत असल्याने सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही.
प्रादुर्भाव लक्षात येईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असते. त्यामुळे नंतर
केलेल्या उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम मिळणे कठीण होते. यासाठी ऑगस्ट
महिन्यापासूनच कंदमाशीच्या एकात्मिक व्यवस्थापनास सुरुवात करणे आवश्यक आहे, असे डॉ. पटाईत
यांनी सांगितले.
कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी व आळवणी
वेळेवर करावी. शेतामध्ये उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत तसेच योग्य वेळी
मातीची भर द्यावी. यामुळे कंदमाशीच्या प्रौढ माशीला कंदावर अंडी घालण्यास अडथळा
निर्माण होऊन प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. तसेच शेतामध्ये ठिकठिकाणी
एरंडीच्या बियांचे आंबवून तयार केलेले आमिष ठेवावे. या आमिषाकडे कंदमाशीचे प्रौढ
आकर्षित होऊन त्यात पडल्यामुळे त्यांची संख्या कमी करण्यास मदत होते, असे त्यांनी
सांगितले.
कंदमाशीबरोबरच हळदीवरील पानावरील ठिपके व करपा रोगांच्या व्यवस्थापनासाठी
विद्यापीठाने शिफारस केलेल्या जैविक घटकांचा आळवणी व फवारणीद्वारे वापर करावा.
आवश्यकता भासल्यास योग्य बुरशीनाशकासोबत स्टिकरचा वापर करून फवारणी करावी, जेणेकरून रोगाचा
प्रादुर्भाव व प्रसार कमी करण्यास मदत होईल, असे डॉ. पटाईत
यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञांनी श्री. चांदखान पठाण यांच्या हळद व कापूस
प्रक्षेत्रास प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली आणि पीक परिस्थितीनुसार
आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी शेख खदिर चांदखान पठाण, संतोष सुरवसे, शंतनु
देशमुख, शेख अमीन, शेरखान व श्री.
कुलदीप देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागातर्फे सहाय्यक
कृषी अधिकारी श्री. प्रसन्नजीत हनवते व उपकृषी अधिकारी श्री. अविनाश खिल्लारे
उपस्थित होते.
पेडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच हळद पिकाची लागवड केली असून, या पिकाच्या
तंत्रज्ञानाबाबत ते नवीन आहेत. त्यामुळे हळद लागवड, अन्नद्रव्य
व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कंदमाशी
तसेच रोग व्यवस्थापनाबाबत मिळालेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरल्याचे
शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी हळद लागवडीसंदर्भात विविध प्रश्न विचारून
आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच आगामी हंगामात शिफारशीत तंत्रज्ञानाची
अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त केला.
आगामी रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करून
कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करणे तसेच हळद व तुरीसारख्या दीर्घ कालावधीच्या
पिकांसाठी पाणी व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे शेतकऱ्यांनी
यावेळी सांगितले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाचे शिफारशीत तंत्रज्ञान स्थानिक गरजांनुसार थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शेतकरी-केंद्रित मार्गदर्शन, कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार, जलसंधारण आणि शाश्वत शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने पेडगाव येथील हा उपक्रम उपयुक्त ठरला.

.jpeg)
