विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि संयमाने शैक्षणिक वाटचाल करावी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, परभणी येथे शैक्षणिक
वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम
व पालक मेळावा दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी, फळाची अपेक्षा न करता
सातत्याने आपले कार्य करत राहावे. ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक
दृष्टिकोनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील संधींचा योग्य प्रकारे
उपयोग करून घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश दिला.
प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी ‘शिस्त आणि संयम’ या
विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थीदशेत शिस्त, वेळेचे नियोजन, सातत्य आणि संयम या गुणांचे महत्त्व त्यांनी
स्पष्ट केले. महाविद्यालयीन जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व
विकासासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी विद्यार्थ्यांनी
नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहून अभ्यासात सातत्य ठेवावे, विषयाचे सखोल ज्ञान
मिळवावे तसेच उपलब्ध शैक्षणिक व प्रात्यक्षिक संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले ए. बी. काळुंखे यांनी विद्यार्थ्यांना
नर्सरी उद्योगातील संधी व व्यवसायाच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन केले. आधुनिक काळात
उद्यानविद्या क्षेत्रात रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात
आले. यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील
शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रम, विविध उपक्रम तसेच उपलब्ध सुविधांची माहिती
देण्यात आली. पालक मेळाव्याच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात
आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. जी. खंडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.
ए. टी. दोंडे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, पालक,
विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांचे आभार
मानले. यावेळी डॉ. बी. एम. कलालबंदी, डॉ. व्ही. एस. मनवर,
डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. ऋचा जाधव, पठाण मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दीक्षारंभ कार्यक्रमामुळे
नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख झाली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी आणि सकारात्मक सुरुवात मिळाली.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)