Monday, October 5, 2026

वनामकृविच्या परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाचे खो-खो व कबड्डीमध्ये उत्तुंग यश

 आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत दोन्ही संघांना सुवर्णपदक; कबड्डी संघाला रोख पारितोषिक


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत खो-खो व कबड्डी या दोन्ही क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठ स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा महात्मा गांधी मिशन, गांधेली, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण २३ संघांनी सहभाग घेतला. अन्नतंत्र महाविद्यालय, परभणीच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक व सुवर्णपदक पटकावले.

तसेच विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा बद्रीनारायण बारवाले कृषि महाविद्यालय, खरपुडी, जालना येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यापीठाच्या शासकीय व संलग्न महाविद्यालयांतील एकूण ३६ संघांनी सहभाग घेतला. अन्नतंत्र महाविद्यालय, परभणीच्या संघाने दमदार खेळ करत प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल कबड्डी संघाला कृषिभूषण मा. विजयअण्णा बोराडे यांच्यातर्फे रु. १०,०००/- रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

अन्नतंत्र महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विजया पवार, डॉ. कैलास गाढे, डॉ. भारत आगरकर, डॉ. गिरीश माचेवाड, डॉ. सुरेंद्र सदावर्ते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

या यशासाठी महाविद्यालयातील खो-खोचे प्रभारी अधिकारी प्रा. शिवकुमार सोनकांबळे तसेच कबड्डीचे प्रभारी अधिकारी डॉ. भानुदास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि सांघिक प्रयत्नांचे हे फलित असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.