Thursday, September 3, 2026

डॉ. राहुल ताराचंद रामटेके यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांकडून कार्याचा गौरव



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणीचे अधिष्ठाता डॉ. राहुल ताराचंद रामटेके यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळा दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. सुरेश सोनी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. स्मिता सोळंकी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणी यांनी डॉ. राहुल रामटेके यांच्या दीर्घ व उल्लेखनीय सेवाकाळाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यापीठ आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासासाठी डॉ. रामटेके यांनी दिलेल्या शैक्षणिक, प्रशासकीय व संशोधनात्मक योगदानाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी झालेल्या प्रयत्नांचे कौतुक करून कुलगुरूंनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित सर्व संचालकांनी आपल्या मनोगतातून डॉ. राहुल रामटेके यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यापीठाच्या प्रगतीसाठी तसेच कृषि अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. राहुल रामटेके यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील विविध अनुभवांना उजाळा दिला. विद्यापीठात कार्यरत असताना सहकारी अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विकासासाठी तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आपण यापुढेही आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करीत राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी आभासी माध्यमाद्वारे डॉ. राहुल रामटेके यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांच्या पुढाकारातून या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. राहुल रामटेके यांच्या कार्यकाळातील विविध आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयीच्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. विविध वक्त्यांनी डॉ. रामटेके यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. सुरेश सोनी यांनीही आपल्या भाषणातून डॉ. रामटेके यांच्या कार्यशैलीचे आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमात डॉ. राहुल रामटेके यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर, सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रवी शिंदे यांनी केले तर आभार जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी मानले. सेवापूर्ती सत्कार सोहळा अत्यंत भावपूर्ण, आपुलकीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









मराठवाड्यातील हवामान बदल व जल-कार्बन प्रवाहांच्या अभ्यासाला मिळणार नवी दिशा

 वनामकृवि, परभणी येथे इस्रो पुरस्कृत अत्याधुनिक ‘एडी-कोव्हेरिएन्स स्टेशन’चे उद्घाटन

 हवामान जोखीम व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक सुविधा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुरस्कृत अत्याधुनिक एडी-कोव्हेरिएन्स स्टेशन’ (Eddy-Covariance Station) उभारण्यात आले आहे. या स्टेशनचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते आज, दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.

यावेळी अहमदाबाद येथील एसएसी-इस्रोचे ग्रुप डायरेक्टर डॉ. बिमल के. भट्टाचार्य, शास्त्रज्ञ-एसजी डॉ. राहुल निगम, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, कृषि हवामानशास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉ. के. टी. जाधव, प्रकल्प समन्वयक तथा कृषि हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध संशोधन प्रकल्पांतील शास्त्रज्ञ तसेच कृषि हवामानशास्त्र विभागातील पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि हवामानशास्त्राचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. हवामानातील वाढती अनिश्चितता, तापमानातील चढ-उतार, पर्जन्यमानातील बदल आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे कृषि क्षेत्रासमोर निर्माण होणाऱ्या समस्यांचे शास्त्रोक्त आकलन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या हवामान बदलाच्या परिस्थितीत हवामान जोखीम व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक उपकरणांवर आधारित अचूक निरीक्षणे अत्यंत आवश्यक आहेत. एसएसी-इस्रो यांच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास अशी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बिमल के. भट्टाचार्य यांनी सांगितले की, भारतातील निम-शुष्क प्रदेशांमध्ये पाणी (HO) आणि कार्बन डायऑक्साइड (CO) यांच्या प्रवाहांचे मापन, विश्लेषण व प्रारुपण (मॉडेलिंग) करण्याच्या दृष्टीने हे संशोधन केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासारख्या अवर्षणप्रवण प्रदेशातील वातावरण, जमीन आणि पिके यांच्यातील परस्परसंवाद समजून घेण्यासाठी या अत्याधुनिक प्रणालीचा मोठा उपयोग होणार आहे. एडी-कोव्हेरिएन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमीन-पृष्ठभाग आणि वातावरण यांच्यामधील ऊर्जा, जलवाष्प आणि कार्बन डायऑक्साइडच्या देवाणघेवाणीचे उच्च कालिक वारंवारतेने मापन करणे शक्य होते. त्यामुळे केवळ पिकांचे स्वतंत्र निरीक्षण न करता संपूर्ण पीक-जमीन-वातावरण परिसंस्थेचा एकात्मिक अभ्यास करता येणार आहे.

डॉ. राहुल निगम यांनी एडी-कोव्हेरिएन्स प्रणालीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मराठवाड्यातील बदलते हवामान, निम-शुष्क प्रदेशाची वैशिष्ट्ये आणि कृषि क्षेत्राची हवामानविषयक असुरक्षितता लक्षात घेऊन या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीतून प्राप्त होणारा सूक्ष्म हवामानविषयक व परिसंस्थात्मक डेटा राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कृषि हवामानशास्त्रातील सूक्ष्म हवामान मापन, जलवापर, ऊर्जा संतुलन आणि कार्बन प्रवाह यांसारख्या बाबींचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी डॉ. कैलास डाखोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संशोधन कार्याला या सुविधेमुळे महत्त्वपूर्ण बळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, एडी-कोव्हेरिएन्स स्टेशन हे आधुनिक सूक्ष्म हवामानशास्त्रीय उपकरण असून, जमीन-पृष्ठभाग आणि वातावरण यांच्यातील विविध घटकांच्या देवाणघेवाणीचे सातत्यपूर्ण मापन करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या प्रणालीतून उपलब्ध होणाऱ्या प्रत्यक्ष जमिनीवरील निरीक्षणांच्या आधारे बाष्पीभवन-वाष्पोत्सर्जन (Evapotranspiration), जलवापर, कार्बन संतुलन, पीक उत्पादकता आणि ऊर्जा संतुलन यांचा सखोल अभ्यास करता येणार आहे.

डॉ. कैलास डाखोरे यांनी प्रास्ताविकात एडी-कोव्हेरिएन्स तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. या प्रणालीद्वारे जमीन-पृष्ठभाग आणि वातावरण यांच्यातील ऊर्जा, जलवाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या देवाणघेवाणीचे सातत्यपूर्ण व अचूक मापन करता येते. पिकांच्या बाष्पोत्सर्जनाचा अचूक अंदाज, पिकांचा जलवापर व जलवापर कार्यक्षमता तसेच कार्बन शोषण आणि उत्सर्जन यांचा अभ्यास करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या प्रणालीमधून उपलब्ध होणाऱ्या प्रत्यक्ष जमिनीवरील निरीक्षणांचा उपयोग बाष्पीभवन-वाष्पोत्सर्जन, जलवापर, कार्बन संतुलन, पीक उत्पादकता आणि ऊर्जा संतुलन यांच्या अभ्यासासाठी करता येणार आहे. या संशोधनाच्या आधारे भविष्यात सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, दुष्काळ व्यवस्थापन, हवामान-लवचिक पीक व्यवस्थापन तसेच अचूक कृषि हवामान सल्ला विकसित करण्यास मदत होणार आहे. तसेच, उपग्रहाद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीची प्रत्यक्ष जमिनीवरील निरीक्षणांशी तुलना करून उपग्रहाधारित हवामान व कृषिविषयक माहितीचे प्रमाणीकरण (व्हॅलिडेशन) करण्यासाठीही हे स्टेशन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या स्टेशनमधून प्राप्त होणारी दीर्घकालीन निरीक्षणे हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम समजून घेणे, हवामान-लवचिक पीक व्यवस्थापन विकसित करणे, जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करणे आणि अचूक कृषि नियोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या अत्याधुनिक सुविधेमुळे मराठवाड्यातील कृषि हवामानशास्त्रीय संशोधनाला राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.









वनामकृविद्वारा हवामान बदलानुरूप उपक्रमांतर्गत उजळंबा येथील शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वितरण

 

हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामानास अनुकूल करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप उपक्रमाच्या माध्यमातून परभणी तालुक्यातील उजळंबा येथील अनुसूचित प्रवर्गातील निवड झालेल्या शेतकरी प्रतिनिधींना तुषार सिंचन संचांचे दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी वितरण करण्यात आले.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तुषार सिंचन संचांचे वितरण अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाभुळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे उपस्थित होते. कार्यक्रमास अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे, तसेच इंजी. विकास सांगळे, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत श्री. उमाजी कांबळे, श्री. केरबा कांबळे, श्री. जनाजी कांबळे आणि श्रीमती सुलवंती साबळे या शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वितरण करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हरीश आवारी यांनी हवामान बदलाच्या परिस्थितीत कमी खर्चिक व स्थानिक परिस्थितीला अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. विहीर, कूपनलिका किंवा शेततळे यांसारख्या उपलब्ध जलस्रोतांमधील पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले. शक्यतो सिंचन सकाळी किंवा सायंकाळी करावे, असेही त्यांनी नमूद केले.

तुषार सिंचन संचाचा कार्यक्षम वापर व दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी नियमित देखभाल आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक सिंचनानंतर पाईप, जॉइंट, व्हॉल्व्ह व तुषारकांची तपासणी करावी, गळती असल्यास त्वरित दुरुस्ती करावी तसेच नोजलमध्ये माती, वाळू किंवा कचरा साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन केले. फिल्टर नियमित स्वच्छ करावा. वापरानंतर पाईपमधील पाणी काढून ते सावलीच्या ठिकाणी व्यवस्थित गुंडाळून ठेवावेत व संच दीर्घकाळ उन्हात उघडा ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.

श्री. ज्ञानोबा पारधे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून कमी खर्चात उत्पादनवाढ साध्य करता येते, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी हवामान बदलानुरूप उपक्रमाची उद्दिष्टे, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाधारित प्रसाराबाबत माहिती दिली.

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन द्यावे. कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणासाठी सऱ्या काढून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे शेतात संवर्धन करावे. तण नियंत्रणाला प्राधान्य देऊन आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीतील भेगा बुजवून ओलावा टिकवून ठेवावा. तसेच कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.

जैविक निविष्ठांचा वापर करावा आणि आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा संरक्षित करावा. पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के किंवा ००:५०:३४ हे जलविद्राव्य खत १ टक्के प्रमाणात योग्य परिस्थितीत वापरल्यास पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते. बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

पावसाच्या खंडाच्या काळात अन्नद्रव्यांची फवारणी करताना पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना कराव्यात. संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर करावा तसेच पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात शेतात मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पापिता गोरखेडे यांनी केले.

कार्यक्रमानंतर शेतकरी प्रतिनिधींनी अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रक्षेत्रास भेट देऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी पावसाच्या खंडाच्या काळात पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, पिकांची पाण्याची गरज, उपलब्ध ओलाव्याचे व्यवस्थापन, तुषार सिंचनाचा कार्यक्षम वापर, मृदा व जलसंधारण तसेच हवामान बदलाच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. आनंद गोरे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. पापिता गोरखेडे, श्री. सुरेश खटिंग व श्री. विलास रिठे यांनी मार्गदर्शन केले.

पाणी वाचवा, संसाधने जपा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा” या त्रिसूत्रीच्या माध्यमातून हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जात कोरडवाहू शेती अधिक सक्षम व शाश्वत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.











Wednesday, September 2, 2026

गुलाबी बोंडअळीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी शास्त्रीय प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाचा अवलंब आवश्यक

 वनामकृवित संशोधन संचालनालय व क्रॉपलाइफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या संशोधन संचालनालय आणि क्रॉपलाइफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानेकापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी सहयोगात्मक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (RM)’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजियम हॉलमध्ये करण्यात आले. कार्यशाळेस मराठवाड्यातील कापूस उत्पादक प्रगतिशील शेतकरी, कृषि संशोधक तसेच कृषि विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणी यांनी आभासी माध्यमाद्वारे भाषणात सांगितले की, कापूस हे मराठवाड्यातील प्रमुख नगदी पीक असून, गुलाबी बोंडअळीसारख्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, योग्य वेळी कीड व्यवस्थापन आणि प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी कापूस पिकावरील किडींमध्ये कीटकनाशकांविरुद्ध निर्माण होणारी प्रतिकारशक्ती रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापूस उत्पादन खर्चात बचत करावी तसेच शाश्वत शेती पद्धतींचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी प्रास्ताविकातून कापूस पिकातील कीड व्यवस्थापनाची सद्यस्थिती तसेच या संदर्भातील विद्यापीठाच्या संशोधनाची भूमिका स्पष्ट केली. परभणी येथील कृषि विभागाचे कृषी उपसंचालक श्री स्वप्निल जाधवर यांनी शासकीय योजना आणि त्यांची शेतकरी स्तरावर प्रभावी अंमलबजावणी याविषयी विशेष मनोगत व्यक्त केले.

क्रॉपलाइफ इंडियाचे स्टीवर्डशिप मॅनेजर डॉ. सुरेंद्र कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यशाळेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन ज्वार कीटकशास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी केले.

तांत्रिक सत्रात सविस्तर मार्गदर्शन

तांत्रिक सत्रामध्ये विविध तज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीच्या शाश्वत व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.

ज्वार कीटकशास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीची सद्यस्थिती, बदलत्या हवामानामुळे निर्माण होणारी आव्हाने तसेच भविष्यातील संभाव्य परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण केले.

कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी गुलाबी बोंडअळीच्या विविध अवस्थांची ओळख, कामगंध सापळ्यांचा (फेरोमोन ट्रॅप्स) वापर, जैविक नियंत्रण उपाययोजना तसेच रासायनिक कीड व्यवस्थापनाचे योग्य नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.

कीटकशास्त्र विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनी एकात्मिक प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाच्या (IRM) मूलभूत तत्त्वांची माहिती दिली. कीटकांमध्ये कीटकनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये, यासाठी विविध व्यवस्थापन पद्धतींचा एकात्मिक अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

क्रॉपलाइफ इंडियाचे को-लीड, आयआरएसी (IRAC) तथा कोर्टेवा ॲग्रीसायन्सेसचे स्टीवर्डशिप लीड डॉ. बसवेश्वर घोडकी यांनी प्रभावी प्रतिकारशक्ती व्यवस्थापन धोरणे, कीटकनाशकांच्या कार्यपद्धतीमध्ये (MoA) योग्य फेरबदल करण्याची आवश्यकता तसेच उत्तम कृषि पद्धतींच्या (GAP) अवलंबाबाबत सविस्तर सादरीकरण केले.

शेतकरी अनुभव व प्रश्नोत्तर सत्र

तांत्रिक सत्राच्या शेवटी उपस्थित प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील प्रत्यक्ष अनुभव कथन करून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रामध्ये शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे तज्ज्ञांनी समाधानकारक निरसन केले.

कार्यक्रमाचा समारोप क्रॉपलाइफ इंडिया प्रतिनिधींच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यशाळेस उपस्थित शेतकरी, कृषि संशोधक आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.












महाराष्ट्रासाठी कृषि संशोधन व विकासाचा कृती आराखडा–२०४७ शासनास सादर

 विकसित कृषि संकल्प अभियानातून पुढे आलेल्या शेतकरी समस्यांवर आधारित संशोधनाला दिशा


विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ अंतर्गत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या समस्या व संशोधनयोग्य मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र राज्यासाठी ठोस, शेतकरीकेंद्रित आणि कृतीशील कृषि संशोधन व विकास कृती आराखडा–२०४७ तयार करण्यात आला आहे. हा आराखडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी शासनाचे कृषि सचिव माननीय श्री. परिमल सिंह यांना सादर केला. यावेळी विभागप्रमुख तथा नोडल अधिकारी डॉ. हरिहर कौसडीकर तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते.

भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली, महाराष्ट्र कृषि परिषद, पुणे तसेच राज्यातील चारही  कृषि विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (NBSS&LUP) येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ मधून पुढे आलेल्या शेतकरी समस्यांवर आणि संशोधनयोग्य मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या आधारे महाराष्ट्र राज्यासाठी संशोधन व विकासाचा कृती आराखडा तयार करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

देशभरात दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ राबविण्यात आले होते. या अभियानाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, शासनाच्या कृषि योजना व धोरणांचा प्रसार करणे, मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे पीक व खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे तसेच शेतकऱ्यांकडून थेट अभिप्राय संकलित करून भविष्यातील संशोधनासाठी नाविन्यपूर्ण दस्तऐवज तयार करणे हा होता.

या अभियानात राज्य व केंद्र शासनाच्या कृषि विद्यापीठांतील शास्त्रज्ञ, आयसीएआर संस्थांचे तज्ज्ञ, अटारी, कृषि विज्ञान केंद्रे, आत्मा, स्वयंसेवी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभियानादरम्यान शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीसमोरील विविध अडचणी, हवामान बदलाचे परिणाम, वाढता उत्पादन खर्च, मृदा व पाणी व्यवस्थापन, कीड व रोगांच्या समस्या तसेच बाजारपेठेतील अडथळ्यांबाबत सखोल माहिती संकलित केली.

या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळेत विकसित कृषि संकल्प अभियान (VKSA–2025) मधून समोर आलेल्या संशोधनयोग्य मुद्द्यांचे शास्त्रीय विश्लेषण करून त्यांचे प्रत्यक्ष संशोधन व विकास कृती आराखड्यात रूपांतर करण्यात आले आहे.

या कार्यशाळेस भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक तथा कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव माननीय डॉ. मांगी लाल जाट हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते, तर महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (कृषि) माननीय श्री. विकासचंद्र रस्तोगी (भा.प्र.से.) यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

यावेळी व्यासपीठावर पोकरा प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प संचालक माननीय श्री. परिमल सिंह (भा.प्र.से.), भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव तसेच राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरोचे संचालक डॉ. एन. जी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना डॉ. मांगी लाल जाट यांनी विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ मधून प्राप्त झालेल्या शेतकरी अभिप्रायाच्या आधारे संशोधनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अभियानादरम्यान शेतकऱ्यांकडून थेट प्राप्त झालेल्या अनुभवांच्या आधारे संशोधनाचे प्राधान्यक्रम निश्चित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानुसार कृषि विद्यापीठे आणि शासनासाठी हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी एकत्रित व कृतीशील संशोधन आराखडा तयार करण्यासाठी अकरा महत्त्वपूर्ण विषयांवर शास्त्रीय माहिती व संशोधन प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये पीक सुधारणा, हवामान-संवेदनशील शेती, मृदा आरोग्य व्यवस्थापन, कृषि यांत्रिकीकरण, कीड व रोग व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, फलोत्पादन, मूल्यवर्धन व बाजारपेठेशी संलग्नता, अचूक शेती, कृषि विस्तार संशोधन, पशुसंवर्धन तसेच पाणी व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील शेतीसमोरील प्रमुख आव्हाने म्हणजे कोरडवाहू शेतीचे प्राबल्य, हवामानातील अनिश्चितता, वारंवार पडणारे दुष्काळ, जमिनीच्या आरोग्यात होणारा ऱ्हास, पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च, तुकड्यात विभागलेली जमीनधारणा तसेच बाजारपेठेतील चढ-उतार यांचा या कृती आराखड्यात सखोल विचार करण्यात आला आहे.

संशोधनातून प्राप्त होणारे निष्कर्ष व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यावरही या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे. आजच्या शेतकऱ्यांना प्रदेशनिहाय, हवामान-सहिष्णु, आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि तंत्रज्ञानाधारित उपायांची नितांत गरज आहे. त्यासाठी संशोधन, कृषि विस्तार आणि धोरणनिर्मिती यांच्यात प्रभावी समन्वय साधण्याची दिशा या आराखड्यात निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील कृषि संशोधन, विस्तार कार्य आणि धोरणनिर्मिती यामध्ये प्रभावी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या गरजांनुसार भविष्यातील संशोधनाची दिशा निश्चित करण्यासाठी हा कृती आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत कृषि सचिव माननीय श्री. परिमल सिंह यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रासाठी एकसंध, शेतकरीकेंद्रित आणि परिणामकारक कृषि संशोधन व विकास कृती आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, विकसित महाराष्ट्र आणि विकसित कृषि क्षेत्राच्या उभारणीसाठी हा आराखडा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरणार आहे.

मशरूम उत्पादनातून शेतकऱ्यांना रोजगार व अतिरिक्त उत्पन्नाची नवी संधी

वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्रात दोन दिवसीय मशरूम उत्पादन प्रशिक्षण व १२६ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

शेतीमध्ये वाढता उत्पादन खर्च, मर्यादित उपलब्ध जमीन आणि बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे आवश्यक आहे. मशरूम (आळिंबी) उत्पादन हा कमी जागेत, शास्त्रीय पद्धतीने आणि योग्य नियोजनातून करता येणारा व्यवसाय असून, त्यातून शेतकरी, महिला व युवकांना रोजगार आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले.

कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या वतीने दि. १ व २ सप्टेंबर २०२६ रोजी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच १२६ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सूर्यकांत पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमामध्ये मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, यशस्वी मशरूम उत्पादकांची यशोगाथा, मशरूमचे आरोग्यदायी महत्त्व, मशरूमपासून तयार होणारे प्रक्रिया पदार्थ व प्रक्रिया उद्योग, मशरूम विपणन तसेच जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर या विषयांवर प्रशिक्षणार्थी व शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर होत्या. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती अश्विनी पठारे तसेच सावित्रीबाई फुले महिला समाज एकात्म मंडळाचे व्यवस्थापक श्री. कैलास राठोड यांची उपस्थिती होती.

तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप हिंगोले, यशस्वी मशरूम उत्पादक श्री. ज्ञानेश्वर यशवंत सांगळे (मु. पो. बाग पिंपळगाव, ता. गेवराई), विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजुला भावर आणि डॉ. अनिता जिंतूरकर यांचीही उपस्थिती होती.

प्रशिक्षणामध्ये डॉ. दिलीप हिंगोले यांनी मशरूम उत्पादनाचे शास्त्र व उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. मशरूम उत्पादनासाठी आवश्यक बाबी, उत्पादनाची शास्त्रीय पद्धत, योग्य वातावरणाची निर्मिती, स्वच्छता, उत्पादन व्यवस्थापन तसेच उत्पादन प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

मशरूम उत्पादनामध्ये केवळ उत्पादन घेणे महत्त्वाचे नसून गुणवत्तापूर्ण व सातत्यपूर्ण उत्पादनासह बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून मशरूम उत्पादनाकडे लघुउद्योग म्हणून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

यशस्वी मशरूम उत्पादक श्री. ज्ञानेश्वर यशवंत सांगळे यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून उभारलेल्या मशरूम उत्पादन व्यवसायाची यशोगाथा प्रशिक्षणार्थींना सांगितली. मशरूम उत्पादन व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी, उत्पादनातील अनुभव, व्यवस्थापन, बाजारपेठेचा शोध आणि उत्पादन विक्री याबाबत त्यांनी आपले अनुभव कथन केले.

मशरूम उत्पादन व्यवसायामध्ये शास्त्रीय ज्ञानासोबतच चिकाटी, योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी मशरूमचे आरोग्यासाठी असलेले फायदे, पौष्टिक मूल्य, मशरूमपासून तयार करता येणारे विविध प्रक्रिया पदार्थ तसेच प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. मशरूमची केवळ ताज्या स्वरूपात विक्री करण्याऐवजी त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार केल्यास उत्पादनाला अधिक बाजारमूल्य मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

महिला बचत गट, युवक आणि लघुउद्योजकांसाठी मशरूम प्रक्रिया हा स्वतंत्र व्यवसायाचा मार्ग ठरू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मशरूमच्या पौष्टिक गुणधर्मांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आणि त्याच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. बसवराज पिसुरे यांनी मशरूम उत्पादनातील महत्त्वाचा घटक असलेल्या विपणन व बाजारपेठ व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. उत्पादन घेण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करणे, ग्राहकांची मागणी जाणून घेणे, विक्रीसाठी उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे, थेट ग्राहकांशी संपर्क साधणे तसेच मूल्यवर्धित उत्पादनांच्या विक्रीचे नियोजन करणे याबाबत त्यांनी माहिती दिली.

तसेच जैविक निविष्ठांची ओळख, निर्मिती आणि वापर याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. शेती व पूरक व्यवसायांमध्ये उपलब्ध संसाधनांचा शाश्वत आणि योग्य पद्धतीने वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणादरम्यान मिळालेले शास्त्रीय ज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी मशरूम उत्पादकाचा प्रत्यक्ष अनुभव तसेच मशरूम प्रक्रिया व विपणनाबाबत मिळालेली माहिती अत्यंत उपयुक्त ठरल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले. या प्रशिक्षणामुळे मशरूम उत्पादनाकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची नवी दिशा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ. संजुला भावर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सतीश कदम, श्री. जयदेव सिंगल, श्री. जयदीप बनसोडे तसेच कृषि विज्ञान केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.