Saturday, August 17, 2024

मित्र किडींचे रक्षण करावे... ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवादात शास्त्रज्ञांचा सल्ला

 शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे .... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद अतिशय महत्वपूर्ण असून यामध्ये दोन्ही बाजूने संवाद होतो आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती मिळते म्हणून कृषी क्षेत्रात हा कार्यक्रम लोकप्रिय होत आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवावा आणि शाश्वत शेती उद्योगास चालना द्यावी असे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि  यांनी केले, ते दिनांक १६ ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या सातव्या भागात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. माननीय  कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते आणि ती प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी येत्या २१ ते २५ ऑगस्ट दरम्यान परळी (बीड) येथे भव्य अशा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे तसेच विद्यापीठाने शेतकऱ्यासाठी अतिशय माफक दरात भाडेतत्त्वावर ड्रोन सुविधा उपलब्ध करून दिले असून या कार्यात महाराष्ट्रात हे एकमेव विद्यापीठ आहे. यावर्षी ड्रोन फवारणीसाठी विद्यापीठाने दहा हजार हेक्टरचे लक्ष निर्धारित केलेले आहे. याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. शेतकऱ्यांना जैव ऊर्जा हे एक वरदान असून या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने भारत सरकारच्या नवीन व नववीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि राष्ट्रीय डेअरी विकास यांच्या सहकार्याने कार्य सुरु केले आहे. जैव उर्जा उत्पादन आणि वापरामध्ये परभणी जिल्हा देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना अन्नदाता बरोबरच ऊर्जा दाता बनवण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे, असे नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले आणि परळी येथे होणाऱ्या कृषी महोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याची आवाहन केले. तांत्रिक सत्रात विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी शेती उत्पादनामध्ये मित्र किडींचे अनन्यसाधारण महत्त्व असून या मित्र किडींची ओळख, उपयुक्तता तसेच त्यांच्यामुळे शत्रू किडीवर होणारे परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच मित्र किडीच्या रक्षणासाठी शक्यतो रासायनिक कीटकनाशके वापरणे टाळावे असा सल्ला दिला. हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी पुढील पाच दिवसांमध्ये येणारा पावसाचा अंदाज सांगितला तसेच येणाऱ्या दोन दिवसात तापमान वाढ जाणवेल असे नमूद केले आणि मराठवाड्यामध्ये साधारणपणे पाच ते दहा मिली च्या दरम्यान पाऊस असेल असे सांगितले. तसेच डॉ. प्रल्हाद जायभाये यांनीही हवामानामध्ये थंडीत वाढ होणार असल्यामुळे झाडांच्या कायिक अवस्थेमध्ये बदल होतो व फळगळ होऊ शकते म्हणून याचा योग्य बंदोबस्त करावा असे नमूद केले.

सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक (केवडा) रोगाच्या नियंत्रणासाठी वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील यांनी हा रोग पांढऱ्या माशी मुळे पसरतो, याच्यासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण करावे, यामध्ये प्रामुख्याने हेक्टरी १५  ते २०  पिवळे चिकट सापळे लावावे तसेच ५ % निंबोळी अर्कची फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार रासायनिक औषधांचा वापर करावा असे नमूद केले. तर कृषी विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी येत्या काळात सोयाबीन वर पिवळा मोझॅक वाढण्याची अधिक शक्यता आहे असे सांगितले व त्याची कारणे आणि सध्या त्याच्या नियंत्रणासाठी विविध उपाय योजना सुचविल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञानी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री देशमुख यांनीही उत्तरे दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि बहुसंख्येने शेतकरी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.