Sunday, August 25, 2024

तंत्रज्ञान प्रसारात शेतकरी - शास्त्रज्ञ संवादाची महत्त्वाची भूमिका ... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

 ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा  आठवा भाग संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या संकल्पनेतून झाली असून दिनांक २३ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचा आठवा भाग संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवात केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान आणि राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांनी शेती निविष्ठा आणि मजुरीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने ड्रोन तसेच नॅनो खतांचा वापरावर भर देण्याचे आवश्यक असल्याचे सुचित केले होते. या बाबीवर विद्यापीठ पूर्वीपासूनच कार्यरत असून या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर ड्रोनच्या प्रभावी वापरासाठी आणि त्या संदर्भात प्रमाणित मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी मुख्य भूमिका बजावत आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळणे आवश्यक असून शेतीतील नुकसानीसाठी शासनाची मदत मिळते परंतु यातून शासनास मिळणारे शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांनी वापरलेल्या निविष्ठा, त्यांनी घेतलेली मेहनत वाया जाते, असे दुहेरी नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रभावीपणे विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान पोहोचणे आवश्यक असून यासाठी हा शेतकरी - शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा कार्यक्रम मागील दोन महिन्यापूर्वी सुरू झाला आणि त्यामध्ये नाविन्यता ठेवून विविध विषयावर मार्गदर्शन आयोजित करून वृद्धिगत करण्यात येऊन दर शुक्रवारी सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. यात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाचे मोठे योगदान आहे. भविष्यात विद्यापीठ राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे,  अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांच्यात समन्वय ठेवून शेती विकासासाठी विस्तार यंत्रणेचे उत्कृष्ट मॉडेल बनविण्यात येईल असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर यांनी केले. तांत्रिक सत्रात डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा सल्ला दिला तसेच कापूस पिकातील येणारी गुलाबी बोंड ळीची समस्या त्याचे व्यवस्थापन याविषयी कीटक शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी तर कपाशीवरील मर आणि अकस्मित मर रोग यांच्यामधील फरक त्याचे व्यवस्थापन याबाबत वनस्पती रोशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्यासह चंद्रपूर, वाशिम, जळगाव जिल्ह्यातून बहुसंख्येने शेतकरी आणि विस्तार कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि त्यांनी विविध शेती विषयक प्रश्न विचारले, त्यास विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेरकर, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे. डॉ. गजानन गडदे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. अनंत लाड यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच पुढील कार्यक्रमांमध्ये आद्रक पिकांची कंदकुज. मोसंबी फळ, टरबूज लागवड, नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन आयोजित करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून करून त्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.