विद्यापीठाचा माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत उपक्रम
मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन
पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा
प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही
शेतकऱ्यांना तर संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते. पिवळा मोझॅक हा रोग
मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणुंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक
वायरस या विषाणूमुळे होतो. या रोगाचे व्यवस्थापनासाठी तसेच कापूस या पिकासाठी
अन्नद्रव्य, सिंचन व्यवस्थापन तसेच सद्यस्थिती करावयाच्या उपयोजनाबाबत मार्गदर्शन
करण्यासाठी, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या
संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार गोखले यांच्या
निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यलयाद्वारे माझा एक
दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमा अंतर्गत दिनांक १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण
मराठवाड्यात विशेष
मोहीम राबविण्यात आली. विद्यापीठातील विविध
विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण १५ चमूमधिल ४६ शास्त्रज्ञांनी आणि सातव्या
सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेले
विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील १८ गावातील ७२५ शेतकऱ्यांना विविध विषयावर प्रक्षेत्र
भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे मार्गदर्शन केले.
माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी जालना जिल्ह्यातील रायगव्हाण येथील कापूस पिकाच्या प्रक्षेत्रास भेट देवून पाहणी केली. तसेच हिंगोली जिल्ह्यातील लिंगी येथे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी प्रक्षेत्र भेट देवून शेतीमध्ये शक्यतो कमी खर्चाच्या आणि घरच्या निविष्ठा वापरून शेतीचा उत्पादन खर्च कमी करावा तसेच हवामान बदलानुसार शेती उत्पादन घेण्याचा सल्ला दिला. याबरोबरच नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, आणि सोबतच्या शास्त्रज्ञाच्या चमूने कापूस, हळद, सोयाबीन आणि पपया या पिकावरील किडी व रोग नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे माजी कुलसचिव तथा सेवा निवृत्ती कृषि विद्यावेत्ता डॉ दिंगबर चव्हाण यांनी शेतकऱ्याच्या शेतावर जावून सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शन केले.
लिंगी येथील
कार्यक्रमात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी
विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. तसेच कृषि विद्यावेता डॉ. गजानन
गडदे यांनी कापूस, सोयाबीन आणि हळद
सद्यस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत आणि कापुस उत्पादन वाढीसाठी गळफांदी
कापणे तसेच झाडाची अतीरीक्त वाढ रोखण्यासाठी वाढ प्रतिबंधक रसायनाची फवारणी
याविषयी मार्गदर्शन केले आणि कीटक शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत कापूस, सोयाबीन आणि
हळद यावरील कीड आणि रोग नियंत्रण माहिती सांगितली तसेच कापुस व सोयाबिन पिकावरील
प्रमुख कीडींचे व विविध लेबलक्लेम कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापराबाबत तसेच
सोयाबीन मधील विषाणुजन्य यलो मोझॅकचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन
केले.