Monday, August 26, 2024

सहा दिवसीय परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा यशस्वी समारोप

 शेतकरी केंद्रीत विद्यापीठांचे संशोधन आणि विस्तार कार्य... कुलगुरू मा.डॉ. इन्द्र मणि

समारोपात शेतकऱ्यांचा उल्लेखनीय कार्याचा मान्यवरांचा शुभहस्ते यथोचित सन्मान


महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक ऑगस्ट ते २ऑगस्ट २०२४  या कालावधीत राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांच्‍या संकल्‍पनेतुन आणि मार्गदर्शनाखाली तसेच कृषी विभागाच्‍या पुढाकाराने  परळी वैजनाथ (बीड) येथे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४ यशस्वी संपन्न होवून समारोप दिनांक २६ ऑगस्ट रोजी झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. तर बीडचे जिल्हाधिकारी मा. श्री अविनाश पाठक (भाप्रसे), आत्माचे संचालक मा श्री. अशोक किरनळ्ळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीमती संगीतादेवी पाटील, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विभागीय कृषी सहसंचालक मा श्री साहेबराव दिवेकर (लातूर), डॉ तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री एस. डी. गरांडे, परळीचे तहसिलदार श्री. व्यंकटेश मुंडे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात लाडकी बहिण याजानेचे बीड जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष श्री वाल्मिकअण्णा कराड यांनी विशेष परिश्रम घेतले.  

कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा शुभहस्ते शेतीव्यवसायात उल्लेखनिय कार्य केलेल्या तसेच यशस्वी शेतकऱ्यांचे आणि प्रदर्शनातील मुख्यमंत्री लाडकी बहिण, जिवंत नमुने ठेवलेले याबरोबरच शिवाभोजन दालानाधारक, परळीचा शिक्षण विभाग तसेच महोत्सवात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला.    

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी देवो भव या भावनेने शेतकरी केंद्रीत संशोधन आणि विस्तार कार्य करीत असून भविष्यात विद्यापीठ राज्य शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, प्रगतशील शेतकरी, यांच्यात इतर राज्याहून उत्कृष्ठ असा समन्वय असल्याने शेती विकासासाठी विस्तार यंत्रणेचे उत्कृष्ट मॉडेल बनविण्यासाठी अधिक प्रयत्नशील असेल असे नमूद केले. तसेच राज्यातील चारही कृषि विद्यापीठे शेतकरी कल्याणासाठी समर्पित असून शेतकऱ्यांच्या समस्या निवारणासाठी सदैव तत्पर आहेत. याबरोबरच विद्यापीठाद्वारे महत्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले जाते. ते शेतकऱ्यांना प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक असून यासाठी विद्यापीठ विविध उपक्रम राबवीत आहे. यात विद्यापीठाने पारंपारिक विस्तार पद्धतीला जोड देत विविध सामाजिक माध्यमांचा उपयोग करून शेतकरी - शास्त्रज्ञ संवाद दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी सातत्याने आयोजित करत आहे. त्यामध्ये नाविन्यता ठेवून विविध विषयावर मार्गदर्शन आयोजित करून वृद्धिगत करण्यात येत असून यात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाचे मोठे योगदान आहे. या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवादात दोन्ही बाजूने संवाद होतो आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती मिळते म्हणून कृषी क्षेत्रात हा कार्यक्रम लोकप्रिय होत आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवावा आणि शाश्वत शेती उद्योगास चालना द्यावी. याबरोबरच परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४ यशस्वी संपन्न झाला आणि याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना झाला म्हणून असे कार्यक्रम नियमित आयोजित व्हावेत अशी अशा व्यक्त करून त्यांनी आयोजकांचे तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे आणि प्रदर्शनातील दालनधारकांचे अभिनंदन केले.

या कृषी महोत्सवाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात झाला असल्याने या विद्यापीठाचा विशेष सहभाग होता. यासाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि  यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी  संपूर्ण सहा दिवसाचे नियोजन केले आणि विद्यापीठाने या महोत्सवातील प्रदर्शनामध्ये तेरा दालने उभारली होती. या दालनासह इतर विद्यापीठांच्या दालनास माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी भेट देवून निरीक्षण केले. तसेच महोत्सवात दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचे आयोजनाद्वारे विविध विषयावर शास्त्रज्ञ व तज्ञ व्यक्ती यांचे शेतकऱ्यांशी यशस्वी सुसंवाद  विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी घडवून आणला यासाठी आयोजकांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमामध्ये आत्माचे संचालक मा श्री. अशोक किरनळ्ळी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक छत्रपती संभाजीनगरचे कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे यांनी केले.  बीडचे पोलीस अधीक्षक मा श्री अविनाश बारगळ (भापोसे) यांच्या नियंत्रणाखाली महोत्सवात सुरक्षततेच्या यशस्वी उपाययोजना केल्या होत्या. या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, इत्यादींची उत्पादित वस्तू , खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीत ४०० हून अधिक दालनात करण्यात आलेले होते. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम झालेले संशोधन यांची देखील माहिती महोत्सवात शेतकऱ्यांना देण्यातआले. तसेच रानभाजी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सुत्रांचालन मंडळ कृषि अधिकारी मंजुश्री कवडे यांनी तर आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे यांनी मानले. महोत्सवास राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच  नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि  शेतकरी बांधवांसाठी हा महोत्सव एक मोठा लाभदायक ठरला आणि या महोत्सवात त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.