Friday, August 16, 2024

शाश्वत योगिक शेतीसाठी वनामकृवि आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

 वनस्पतींच्या आरोग्यावर प्राण्यांचे आणि मानवाचे आरोग्य अवलंबून.... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

देशात आज वन नेशन - वन हेल्थ ही संकल्पना अवलंबली जात आहे. यामध्ये माती-पाणी-पर्ण-प्राणी-मनुष्य यांचा आरोग्याचा समावेश होतो. या सर्वांचे आरोग्य एकमेकाशी निगडित आहे, मातीचे आरोग्य बिघडले तर वनस्पतीचे आरोग्य बिघडते आणि वनस्पतींच्या आरोग्यावर प्राण्यांचे आणि मानवाचे आरोग्य अवलंबून आहे. अनेकदा यांचा समतोल बिघडतो. याचे प्रमुख कारण म्हणजे शेती उत्पादनामध्ये बहुतांश वेळेस रासायनिक घटकांचा शिफारशी पेक्षाही अधिक वापर केला जातो. या रासायनिक घटकांचा मातीच्या आरोग्यावर सुरुवातीस परिणाम होतो आणि परिणामी पुढे मानवावर परिणाम जाणवतो. असे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कृषी व ग्रामीण विकास राजयोग शिक्षण आणि संशोधन विभाग यांच्यामध्ये शास्त्रोक्त संशोधनातून शाश्वत योगिक शेतीसाठी दि १५ ऑगस्ट रोजी सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी अधक्षस्थावरून बोलत होते.  माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, रासायनिक घटकांच्या वापरामुळे परिणाम किंवा बदल तात्काळ जाणवत नसून तो हळूहळू होतो व शेवटी अनेक मोठ्या रोगामध्ये परावर्तित होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वन नेशन-वन हेल्थ यास प्रोत्साहीन देण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. याद्वारे योगिक शेतीवर संशोधन करण्यास चालना मिळेल आणि रासायनिक घटकांना पर्याय शोधण्याच्या संशोधनाचे कार्य करण्यात येईल. याचा शाश्वत योगिक शेतीसाठी लाभ होईल. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये विनयशीलता आणि चांगला विद्यार्थी बनवण्यासाठी ही अध्यात्माचा उपयोग होतो यासाठी नियमित शिक्षणासह अध्यात्माचे विशेष शिक्षण देण्यासाठीही या संशोधनाचा लाभ घेता येईल, त्या दृष्टीने हा करार महत्वपूर्ण आहे.

प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कृषी व ग्रामीण विकास राजयोग शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अध्यक्षा राजयोगिनी बी के सरला दीदीजीं या म्हणाल्या की, विज्ञान आणि अध्यात्माची समन्वयातून संशोधन करून उत्कृष्ट दर्जाचे वाण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि प्रजापित ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे कार्य करेल. याचा निसर्गाचा समतोल आणि मानवाचे आरोग्य सांभाळण्यासाठी लाभ होईल व यातून दोन्ही संस्थेचे नाव उज्वल होवून देशातील उत्कृष्ट उदाहरण ठरेल अशी आशा व्यक्त केली. तसेच राजयोगी श्री बी के राजूभाईजी यांनी, शेती उत्पादने विषमुक्त करून मानवास सकस उत्पादन मिळणे आवश्यक आहे. यासाठी सेंद्रिय शेती सोबतच आध्यात्मिक शेतीची जोड यांची महत्वाची भूमिका आहे असे मत व्यक्त केले.

या सामंजस करारावर विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तर प्रजापित ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने राजयोगिनी बिके सरला दीदीजी आणि राजयोगी श्री बीके राजूभाईजी यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, विद्यापीठास देशभरातून भेटीसाठी आलेले मान्यवर पाहुणे, विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, डॉ. मदन पेंडके, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. पपीता गोरखडे, वॉव गो ग्रीनचे डॉ. शंकर गोयंका प्रजापिता ब्रह्माकुमारीजचे अर्चना दीदीजी, सीमा दीदीजी, बीके तांदळेभाईजी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता दीदीजी यांनी केले तर आभार डॉ. बीएम रोडगे भाईजी यांनी मानले.