Tuesday, August 6, 2024

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे स्तनपान जागरुकता सप्ताह साजरा


जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्तनपान जागरुकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बेडे यांची उपस्थिती लाभली. सध्या इन-प्लांट प्रशिक्षणासाठी जिल्हा रुग्णालयात अभ्यास करत असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दिव्या भगत, श्रेया तोमरपाटील, पल्लवी शिंदे, अंजली सरोदे, कीर्ती मुसळे, सभा मोहम्मद फजल, सुमा बनकर, नोहिता दुना, शिवानी ठोंबरे यांनी नाटिका सादर करून स्तनपानाचे महत्त्व स्तनदा मातांना पटवून दिले. स्तनपानामुळे बाळाला आवश्यक पोषण मिळाल्याने त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासाला चालना मिळते याबरोबरच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वृद्धिंगत होऊन त्यांचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते. तसेच स्तनपानामुळे आईच्या आरोग्याला फायदा होतो, विशेषत: स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग आणि हाडांची कमजोरी यासारख्या आजारांचा धोका कमी होतो आणि  स्तनपानामुळे आई आणि बाळातील मानसिक बांधिलकी वाढते त्यामुळे दोघांचेही मानसिक स्वास्थ्य सुधारते यासारख्या महत्वाच्या बाबी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पटवून देण्यात आल्या.

यावर्षी सन २०२४ मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहाची थीम ‘आई आणि बाळा मधले अंतर कमी करूया आणि स्तनपानाला समर्थन देऊया अशी असल्याने. या थीमद्वारे बाळाला व मातेला असणारे स्तनपानाचे फायदे आणि महत्व यावर प्रकाश टाकण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ. शंकर पुरी आणि प्रा. मानसी बाभूळगावकर यांनी या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमादरम्यान आहार तज्ञ छाया चट्टे यांनीही स्तनदामातांना मार्गदर्शन दिले आणि स्तनपानाचे फायदे सांगितले.