Wednesday, August 28, 2024

कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांचे जवाहर नवोदय विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरातील पीएम श्री शाळा जवाहर नवोदय विद्यालय येथे दिनांक २७ ऑगस्ट रोजी विज्ञान ज्योती कार्यक्रमांतर्गत प्रेरणादायक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू मा. डॉ  इन्द्र मणि हे होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी उत्तम शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. शालेय शिक्षण हे आपले व्यक्तिमत्व घडविण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. आपला देश कृषि प्रधान असल्याने आपण भविष्यात कृषि आणि सलग्न शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रम घेवून शेतीविकासास चालना देवू शकतो. तसेच शालेय शिक्षणासोबतच अनुभवातून मिळणारे शिक्षणदेखील दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असते त्याचेही आपण आत्मसात करणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आदर्श नागरिक बनून राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करू शकणार आहोत, असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. व्ही. बोभाटे, वरिष्ठ अध्यापक श्री. डी. के. जुमडे श्री. व्ही. ए. पोघे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्रीनिवास करखेलिकर, वामन कनगरकर, रमेश मटकमवाड, प्रबोध मडावी, प्रियंका कैरी व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.जी. भोरगे यांनी केले.