Friday, August 16, 2024

वनामकृवित जैव उर्जेवर आधारित एक दिवशीय कार्यशाळा

 शेतकऱ्यांना अन्नदाता सह ऊर्जादाता बनविता येईल... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या  नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभाग, भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ऑगस्ट रोजी शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञासाठी एक दिवशीय जैव ऊर्जा आधारित कार्यशाळा विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सल्लागार डॉ. संगीता कस्तुरे या होत्या. 

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, जैव ऊर्जा शेतकरी आणि शेती विकासातील महत्त्वाचा घटक आहे. जैव ऊर्जेचे युनिट्स प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तसेच घरी उभारणे आवश्यक आहे. यासाठी भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ तसेच द एनर्जी रिसर्च युनिटच्या योजना असून यांच्याद्वारे अर्थसहाय्य देऊन जैव ऊर्जेचे युनिट्स उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. मराठवाड्यातील शेतकरी कुशल, मेहनती, कर्तबगार आणि विश्वसनीय असून यांचा विकास होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा विकास झाला तरच शास्त्रज्ञांचा होईल आणि शेतकऱ्यांसाठी कार्य कर्त्यांना मनस्वी आनंद होत असतो. या जैव उर्जेवरील घटकाद्वारे शेतकऱ्यांचे हित जपण्याचे कार्य होऊन शेतकऱ्यांना अन्नदाता सह ऊर्जादाता बनविता येईल, यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान विद्यापीठ पोहोचवेल. जैव ऊर्जा उत्पादनामध्ये परभणी जिल्हा हा देशात प्रथम यावा यासाठी कार्य करून परभणी जिल्ह्याचे आदर्श उदाहरण संपूर्ण देशापुढे ठेवता येईल. हा प्रकल्प राबवत असताना सेण हाताळणीसारख्या महत्त्वाच्या व इतर येणाऱ्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर द्यावा लागेल तसेच विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठीही जैव-उर्जेवर संशोधनाचे प्रकल्प हाती घेण्यात येतील तर शेतकऱ्यांसाठी जैव ऊर्जेचा वापर व उपयोगिता यावर भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने नियमित प्रशिक्षणे आयोजित केले जातील असे प्रतिपादन केले. 

भारत सरकारच्या जैव ऊर्जेच्या सल्लागार डॉ. संगीता कस्तुरे यांनी जैव ऊर्जेद्वारे आदर्श  (स्मार्ट) खेड्याची उभारणी करणे शक्य आहे असे नमूद केले व पुढे म्हणाल्या की, देशाने नवीकरणीय  योजनेद्वारे उल्लेखनीय यश संपादन केले असून भविष्यात या योजनेद्वारे जैव ऊर्जा विकासासाठी भव्य कार्य उभारण्यात येणार आहे. आपणास गावचा विकास साधून पुढे देशपातळीवर पोहोचावे लागेल.

नवी दिल्ली येथील नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एस आर मीना म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील विद्यापीठ आणि शेतकरी तसेच इतर विविध कार्यालयांचा समन्वय आहे, म्हणून परभणी जिल्हा ऊर्जा उत्पादनासाठी देशातील प्रमुख जिल्हा बनू शकतो आणि परभणी जिल्हा हे एक चांगले उदाहरण आपण देशापुढे देऊ शकतो. यासाठी आवश्यक असलेल्या शासनाचा विविध योजनांची त्यांनी माहिती दिली तसेच आपल्याकडे शेणाचा योग्य वापर होत नाही आणि जवळपास ९५ टक्के सेण प्रक्रिया न करता वापरले जाते. याचा जैव उर्जा निर्मितीसाठी वापर करावा असे नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी करताना जैव उर्जेच्या उपयुक्तता विशद केली. यावेळी जैव ऊर्जा उत्पादनामध्ये यशस्वी असलेले प्रगतशील शेतकरी श्री जनार्दन आवरगंड, श्री नामदेव कोकर आणि श्रीमती पार्वतीबाई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी आपल्या जैव ऊर्जा उत्पादनातील यशोगाथा मांडल्या. 

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. आर. बि. क्षीरसागर, द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे  डॉ. एस. एन. मिश्रा, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (म्रिदा) चे  मुख्य कार्यक्रम अधिकारी श्री. के. बी.प्रताप, नॅचरल शुगरचे श्री. बी. बी.ठोंबरे, कृषी विकास अधिकारी  श्री. सामाले, महाऊर्जाचे श्री. गायकवाड, किसान गॅसचे  श्री.धनंजय अभंग, ऊर्जा बायो सिस्टमचे श्री. अमर पाटील यांच्यासह  ५९ प्रशिक्षणार्थी आणि महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ मधुकर मोरे यांनी केले तर आभार डॉ. राहुल रामटेक यांनी मानले.