Saturday, August 10, 2024

संत्रा मोसंबी फळगळ आणि सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

 ऑनलाईन संवादाचा शेतकऱ्यांना लाभ .... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाची शासन स्तरावर दखल घेतलेली असून हा उपक्रम इतर विद्यापीठानेही राबवावा असे सुचविले. या कार्यक्रमाद्वारे दोन्ही बाजूने संभाषण ठेवण्यात येत असल्यामुळे शेतकरी आपल्या शेती विषयक गरजेनुसार प्रश्न विचारतात आणि त्यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देतात म्हणून हा ऑनलाइन उपक्रम विद्यापीठ दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता राबवत आहे असे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि  यांनी केले, ते दिनांक ९  ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या सहाव्या भागात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. यावेळी  विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील, प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर (लातूर), डॉ. तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर), विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बाऱ्हाटे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची ऑनलाईन उपस्थिती होती.

माननीय  कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, मागील वर्षीही असाच गोगलगायीच्या नियंत्रणासाठी ऑनलाईन उपक्रम राबविण्यात आला होता, त्यातून शेतकऱ्यांना लाभ झाला. शेतकरी कल्याणाकरिता म्हणून विद्यापीठ अशा उपक्रमामध्ये सातत्य ठेवून आहे. यामध्ये अधिकाधीक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे तसेच  शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेतच माहिती द्यावी आणि शेतकऱ्यांनीही या कार्यक्रमांमध्ये जर काही बदल हवा असेल तर सूचित करावे असे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज सांगताना १० ते १३  तारखेचा दरम्यान मराठवाड्यामध्ये हलका आणि तुरळक पर्जन्यमान असणार आहे, यामुळे अंतर मशागतीची कामे करणे सोपे जाईल तर पुढील आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान असेल असे नमूद केले.

माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील यांनी मोसंबी आणि संत्रा पिकातील फळगळ ही सध्याच्या वातावरणामुळे झाडांना अन्नद्रव्य उपलब्ध होत नसल्यामुळे होते, यामुळे बागेची स्वच्छता ठेवावी याबरोबरच अन्नद्रव्यांच्या पुरवठा विभागून करावा. तसेच मोसंबी आणि संत्रा पिकामध्ये फायटोप्थेरा या रोगाचा प्रादुर्भाव अशा वातावरणात वाढतो, फळांना हा रोग माती चिटकल्यामुळे होतो आणि तो खालून वर पर्यंत वाढत जातो यासाठी मेटालेक्सिल ४ टक्के  अधिक मॅन्कोझेब ६४ टक्के या औषधाची फवारणी तसेच बागेमध्ये धुरीकरण करावे असे नमूद केले.

प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी मधील फळगळ याविषयी मार्गदर्शन करताना केवळ एक ते दोन टक्केच फळे आपणास मिळतात असे सांगितले. सुरुवातीच्या अवस्थेतील फळगळ नुकसान कारक नसून, शेवटी काढणीपूर्वी होणारी फळगळीची काळजी करणे आवश्यक आहे. सर्वात जास्त फळगळ आंबेबहार मध्ये होते तसेच  रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण अशा वातावरणातील बदलामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, याबरोबरच झाडांना अन्नद्रव्याची कमतरता भासते व झाडांची उपासमार होते, यामुळे फळगळ होते. यासाठी वर्षातून एकच बहार घ्यावा असे नमूद केले आणि झाडांना शिफारस केलेली खते योग्य प्रमाणात वापरून आणि विभागून देऊन झाडाची प्रतिकारक्षमता वाढवावी असे नमूद केले. 

वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी सोयाबीन वरील पिवळा मोझॅक या रोगाची कारणे आणि त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय सुचविले. शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. संजय पाटील, डॉ. मोहन पाटील, डॉ. एस पी. मेहत्रे, डॉ.  वसंत सूर्यवंशी, डॉ. गजानन गडदे, डॉ. अनंत लाड यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. संतोष  फुलारी, श्री.   डि. व्ही.  इंगळे, श्री. योगेश मात्रे आणि श्री खंदारे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.