Tuesday, August 13, 2024

वनामकृवित अँटि रॅगिंग दिन साजरा

 विद्यार्थ्यांनी चांगल्या अभ्यासात स्वतःला गुंतवून घ्यावे... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाद्वारा विद्यार्थ्यांना समुपदेशन आणि संवेदनशीलतेसाठी अँटि रॅगिंग दिन दिनांक १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाईन होते तर प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक मा. श्री रवींद्रसिंह परदेशी (आयपीएस), अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. श्री यशवंत काळे, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भाग्यश्री कांबळे हे होते आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चांगल्या कामात आणि अभ्यासात स्वतःला गुंतवून घ्यावे रॅगिंग तसेच भांडणापासून दूर राहावे यासाठी या कार्यक्रमाद्वारे आपणामध्ये जागरूकता आणि समुपदेशन करण्याचे कार्य सुरू आहे. महाविद्यालयातील सर्व सीनियर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांना मदतीची भावना ठेवावी, आपण केलेल्या मदत स्मरणात राहते. तसेच रॅगिंग बाबत विद्यापीठ अतिशय कठोर कारवाई करते, म्हणून रॅगिंगचे कृत्य करू नये. विद्यापीठ आणि पोलीस प्रशासन मिळून विद्यापीठाचे वातावरण चांगले ठेवण्याचे कार्य करत आहे आणि विद्यार्थ्यांनीही विद्यापीठ परिसर रॅगिंगमुक्त ठेवावा. याद्वारे विद्यापीठाचे नाव उज्वल ठेवण्यात येईल असे नमूद केले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. श्री यशवंत काळे यांनी विद्यार्थ्यांना अँटि रॅगिंग बाबत जागरूक करताना नमूद केले की, कोणत्याही शासकीय सेवेत भरती व्हायचे असेल तर प्रथमतः उमेदवाराचे चारित्र्य पडताळणी केली जाते आणि जर उमेदवार रॅगिंग किंवा इतर काही गुन्ह्यांमध्ये असेल तर त्या नोकरीमध्ये कायम केले जात नाही तो नोकरीस मुकतो. तसेच महाराष्ट्र शासनाने महाविद्यालय आणि महाविद्यालय परिसर रॅगिंग मुक्त राहण्यासाठी किंवा रॅगिंगचा कोणताही प्रकार होऊ नये म्हणून१९९९ साली अँटी रॅगिंग कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा गुन्हा केला असेल तर त्याची शहानिशा करून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो आणि गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याच्यावर दंडात्मक तसेच कारावासाची देखील कार्यवाही केली जाते, असे प्रतिपादन केले.

शिक्षण संचालक डॉ उदय खोडके म्हणाले की, विद्यापीठात रॅगिंगला प्रतिबंध होण्यासाठी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सीनियर विद्यार्थ्यांद्वारे स्वागत समारंभ आणि पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ आयोजित केले जातात. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये एकजूट ठेवण्यासाठीही मदत मदत होते आणि एकमेकाविषयी आदर निर्माण केला जातो. याबरोबरच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याबरोबरच विद्यार्थी पालकांचे अँटी रॅगिंगचे शपथपत्र घेतले जाते. याद्वारे विद्यापीठात रॅगिंग सारख्या प्रकारस आळा बसलेला आहे आणि भविष्यातही याबाबत दक्षता घेऊन रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासन डक  कारवाई करेल, असे नमूद केले.

पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भाग्यश्री कांबळे यांनी रॅगिंग मध्ये येणाऱ्या गैर कृत्याचे प्रकार सांगितले व पुढे म्हणाल्या की, रॅगिंग मुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होतो विद्यार्थ्यास शारीरिक इजा देखील पोहोचते. यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल ढासळते आणि तो विपरीत पाऊल उचलतो असे प्रकार करणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जातो. याला निर्बंध घालण्यासाठी शासनाने विविध नियम, कायदे बनवले असून त्याद्वारे गुन्हा सिद्ध झाल्यास अतिशय कठोर कार्यवाहीबाबत विद्यार्थ्याना अवगत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता पवार आणि डॉ. स्वाती झाडे यांनी केले तर आभार डॉ. जयकुमार देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. याकार्य्रामाचे विद्यापीठाच्या युटूबद्वारे प्रसारण करण्यात आले होते.