Thursday, August 1, 2024

अमेरिकेतील शास्त्रज्ञ मा. डॉ. राज खोसला यांचे शेतीच्या शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर वनामकृवित मार्गदर्शन

 कृत्रिम बुद्धिमत्ता ही अचूक शेतीचा कणा



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठातील भारतीय कृषि विद्या संस्थेच्या परभणी चॅप्टरद्वारा कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात शेतीच्या शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर विचारप्रवर्तक मार्गदर्शन दिनांक १ ऑगस्ट रोजी आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे आणि मुख्य मार्गदर्शक अमेरिकेतील कन्सस स्टेट युनिव्हर्सिटीच्या कृषि विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राज खोसला हे होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके,  संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. डब्ल्यू एन वानखेडे आदींची उपस्थिती होती.

शेतीच्या शाश्वतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. राज खोसला म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे अचूक शेतीचा कणा आहे. भविष्यामध्ये अनेक बदलास शेती उद्योगास सामोरे जावे लागणार आहे, यासाठी भूतकाळाचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे असे नमूद करुन  जीपीएस प्रणालीचा प्रभावी वापर करून आवश्यक त्या ठिकाणची अचूक माहिती मिळवून पिकासाठी आणि जमिनीसाठी योग्य उपचार पद्धतीचा अवलंब करण्याबाबतची सविस्तर माहिती दिली. एका जागेवरचा नमुना सर्व पीकास उपचार देण्यासाठी उपयोगाचा नाही आणि पिकांतील सर्व ठिकाणचा नमुना घेणे हे मनुष्यबळास शक्य नाही. म्हणून यासाठी संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेतील मशीन लर्निंगचा उपयोग करावा लागणार आहे. मशीन लर्निगद्वारे मिळालेली माहिती ही ९७ टक्के अचूक असते तर मनुष्यबळातून ८७ टक्के अचूक माहिती मिळते. याशिवाय दिवसेंदिवस कामासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असून त्यावर खर्चही वाढत आहे. मशीन काय करू शकेल यासाठी मानवाने आपल्या विचारांना मर्यादा घालू नयेत, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेतील मशीन लर्निंग समजून घेतले पाहिजे. मशीन लर्निंगमध्ये अनेक सेन्सरचा वापर केला जातो, एक सेन्सर तयार करण्यासाठी एक डॉलर पेक्षाही कमी खर्च लागतो. या सेन्सरद्वारे पिकासाठी अन्नद्रव्य, खत, पाणी, हवा यांच्या कमतरतेसह कीड रोग यांच्या प्रादुर्भावाची अचूक आणि आपल्याला पाहिजे त्या वेळेच्या अंतराने माहिती मिळते. यामाहितीद्वारे उपाययोजना करणे शक्य होते. शेतीचे उज्वल भविष्यासाठी अशाप्रकारच्या विपुलप्रमाणातील माहितीची आणि त्याच्या प्रथ:करणाची नितांत गरज आहे. याद्वारे अचूक शेती करून शाश्वत उत्पन्न मिळवता येते. ह्या सर्व बाबी एकटा शेतकरी करू शकणार नाही म्हणून यासाठी शासकीय तसेच खाजगी संस्थेने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, शेतीसाठी सर्व शास्त्रांची आणि कलेची गरज आहे. शेती म्हणजे शास्त्र आणि कला यांचा समन्वय आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करण्यासाठी दोन्ही बाबींची गरज असून याद्वारे हवामान, जमीन, पीक यांच्याबाबत विपुल प्रमाणात माहिती मिळवून तालुका तसेच ग्राम पातळीवरील आवश्यक त्या ठिकाणी माहिती देऊन शेतकऱ्यांशी थेट संपर्क ठेवता येईल आणि त्याद्वारे शेतीचे तसेच शेतकऱ्यांचे उज्वल भवितव्य साधता येईल. यासाठी नवीन शैक्षणिक धोरण देखील लाभदायक ठरणार आहे. डॉ. राज खोसला यांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यापीठाने अमेरिकेतील कन्सस स्टेट युनिव्हर्सिटी सोबतच्या सामंजस्य कराराचा तसेच विद्यापीठाने पाच शास्त्रज्ञ अमेरिका येथे पाठविले होते त्यांच्या अभ्यासातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा मराठवाड्यातील शेतीविकासाठी फायदा होईल तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे भविष्यात एक शास्त्रज्ञ सर्व शास्त्रांचा अभ्यास करेल व माहिती देईल असे नमूद केले.

मुख्य मार्गदर्शक मा. डॉ. राज खोसला यांचा अल्पपरिचय डॉ. प्रीतम भुतडा यांनी करून दिला तर सूत्रसंचालन डॉ. सुनिता पवार यांनी केले आणि आभार डॉ. अनिल गोरे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि बहुसंखेने विद्यार्थी सभागृहात तसेच आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते.