वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत
राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) तसेच प्रगत माती व पर्ण
परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना या प्रकल्पांतर्गत कृषि महाविद्यालय, बदनापूर (जि. जालना), कृषि संशोधन केंद्र, बदनापूर आणि कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या
संयुक्त विद्यमाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मौजे शेकटा, छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. सिकंदर जाधव यांच्या
शेतात ड्रोन फवारणी सेवा शुभारंभ कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात
संपन्न झाला. राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रकल्पांतर्गत तूर पिकाच्या ‘गोदावरी’
वाणासाठी आवश्यक कृषि निविष्ठांचा वापर करून ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक
आयोजित करण्यात आले.
यावेळी कृषि
महाविद्यालय, परभणीचे अधिष्ठाता
डॉ. प्रवीण वैद्य, कृषि महाविद्यालय, बदनापूरचे
अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, मृद विज्ञान विभागप्रमुख डॉ.
हरिहर कौसडीकर, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.
गजेंद्र जगताप तसेच कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे प्रमुख
शास्त्रज्ञ डॉ. सचिन सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
दुष्काळसदृश परिस्थितीत तूर पिकाचे योग्य व्यवस्थापन आणि सुधारित वाणाची निवड
यांचा उत्कृष्ट समन्वय साधून पीक चांगल्या प्रकारे जोपासल्याबद्दल शेतकरी श्री.
सिकंदर जाधव यांचे कौतुक केले. तसेच ‘गोदावरी’ तूर वाण विकसित करणारे डॉ. दीपक
पाटील, प्रमुख शास्त्रज्ञ,
कृषि संशोधन केंद्र, बदनापूर तथा अधिष्ठाता,
कृषि महाविद्यालय, बदनापूर यांचेही त्यांनी
अभिनंदन केले. दुष्काळी परिस्थितीत विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
शेतीमध्ये
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे,
कृषि निविष्ठांचा कार्यक्षम वापर करणे तसेच शेतकऱ्यांना आधुनिक कृषि
तंत्रज्ञानाच्या सेवा उपलब्ध करून देणे या दृष्टीने ड्रोन सेवा महत्त्वपूर्ण ठरणार
आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीक संरक्षणासाठी फवारणीची कार्यक्षमता
वाढण्यास, वेळ व श्रमाची बचत होण्यास तसेच शेती व्यवस्थापन
अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यास मदत होणार आहे.
यावेळी
उपस्थित मान्यवरांनी कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित संशोधन, विस्तार कार्य आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञान
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यापीठाच्या माध्यमातून
अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ
होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपस्थित
शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना विविध कृषि विषयांवर मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या
प्रश्नांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे
संचलन व प्रास्ताविक राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ.
महेश वाघमारे यांनी केले, तर डॉ. नितीन देशमुख,
सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय,
बदनापूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. महेश वाघमारे, डॉ. एस. एस. माने, सहयोगी प्राध्यापक तथा सह-मुख्य अन्वेषक, डॉ. गणेश गायकवाड, सहयोगी प्राध्यापक तथा सह-मुख्य अन्वेषक, डॉ. पगार, कृषि संशोधन केंद्र, बदनापूर तसेच कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष पुढाकार घेऊन केले.




