संवर्धनशील शेती (Conservation
Agriculture) आणि पुनरुज्जीवनशील शेती (Regenerative
Agriculture) या विषयावरील १४ व्या प्रगत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
कार्यक्रमाचा २१ दिवसीय अभ्यासक्रम ICAR–केंद्रीय क्षारयुक्त
मृदा संशोधन संस्था (CSSRI), कर्नाल येथे उत्साहपूर्ण
वातावरणात संपन्न झाला.
या आंतरराष्ट्रीय
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भारतासह विविध देशांतील शास्त्रज्ञ व संशोधकांनी सहभाग
घेतला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शिफारशीनुसार, विद्यापीठांतर्गत
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथील
सहयोगी संशोधन संचालक तथा कृषिशास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार आणि सहायक प्राध्यापक
(कृषिशास्त्र) डॉ. सुरेखा कदम यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण
केला.
प्रशिक्षणादरम्यान
संवर्धनशील शेतीची मूलभूत तत्त्वे, जमिनीचे आरोग्य, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, पीक अवशेष व्यवस्थापन,
आधुनिक कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदल,
हरितगृह वायू उत्सर्जन, कार्बन साठवणूक,
कार्बन क्रेडिट, ड्रोन तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती आणि पीक प्रारूपण (Crop Modelling) यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे
वैशिष्ट्य म्हणजे विविध विषयांवरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश होता.
यामध्ये जमिनीच्या भौतिक गुणधर्मांचे मापन, हरितगृह वायू उत्सर्जनाचे
मूल्यमापन, तणनाशक फवारणी आणि कृषी यंत्रांचे कॅलिब्रेशन,
हॅपी सीडर, सुपर हॅपी सीडर व न्यूमॅटिक
प्लांटर यांसारख्या आधुनिक कृषी यंत्रांची माहिती, लेझर लँड
लेव्हलिंग, जमिनीखालील ठिबक सिंचन (Subsurface Drip
Irrigation) तसेच उभ्या मक्याच्या पिकामध्ये हॅपी सीडरच्या
साहाय्याने गव्हाची पेरणी यांचा समावेश होता. याशिवाय, शून्य
मशागतीवर बटाटा लागवड आणि जिरायती व बागायती शेतीसाठी विकसित करण्यात आलेल्या
एकात्मिक शेती मॉडेल्सबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
समारोप कार्यक्रमात
प्रशिक्षणार्थींनी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षणादरम्यान प्राप्त केलेले ज्ञान व
अनुभव मांडले. ICAR-CSSRI
चे संचालक डॉ. सतीश कुमार सनवाल यांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन
केले. CIMMYT-India चे भारतातील प्रमुख डॉ. महेश कुमार गथाला
यांनी मार्गदर्शन केले, तर ICAR-CSSRI चे
माजी संचालक डॉ. पी. सी. शर्मा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त केले. CIMMYT
Academy च्या झीनत शाना यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. वरिष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. कैलाश प्रजापत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन
केले. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
मराठवाड्यातील भारी
काळ्या जमिनी,
अनियमित पर्जन्यमान आणि वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती
लक्षात घेता, संवर्धनशील शेतीची तंत्रे स्थानिक
परिस्थितीनुसार विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सोयाबीन–गहू,
मका–हरभरा आणि कापूस आधारित पीक पद्धतींमध्ये संवर्धनशील शेती
तंत्रज्ञानाचे मूल्यमापन, पीक अवशेष व्यवस्थापन, योग्य कृषी यंत्रांची निवड, जमिनीचे आरोग्य आणि
हरितगृह वायू उत्सर्जन यांसंदर्भातील संशोधनासाठी प्रशिक्षणातून प्राप्त झालेले
ज्ञान उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले.
या प्रशिक्षणामुळे
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांशी ज्ञानाची देवाणघेवाण, आधुनिक कृषी
तंत्रज्ञानाची माहिती तसेच भविष्यात संयुक्त संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी
नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रशिक्षणातून प्राप्त ज्ञानाचा उपयोग
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अनुकूल, संसाधन
कार्यक्षम आणि शाश्वत शेती पद्धती विकसित करण्यासाठी होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दोन्ही शास्त्रज्ञांना नामनिर्देशित करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आधुनिक कृषी संशोधन, संवर्धनशील शेती तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या अनुभवांचा लाभ घेण्याची संधी मिळाली. या संधीबद्दल डॉ. एस. बी. पवार आणि डॉ. सुरेखा कदम यांनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांचे विशेष आभार व्यक्त केले.


