माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केल्या शोकभावना; विद्यापीठाच्या वतीने शोकसभेचे आयोजन
कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तथा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील माजी
कुलगुरू डॉ. व्यंकट मनोहर मायंदे यांच्या निधनाने कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना
अभिवादन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी
विद्यापीठाच्या र प्रशासकीय इमारतीतील सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात
आले होते.
डॉ. मायंदे यांचे १७ नोव्हेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल
शोक व्यक्त करताना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
त्यांच्याशी असलेल्या प्रदीर्घ स्नेहसंबंधांना उजाळा दिला. जी. बी. पंत कृषि व
तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर येथे बी.टेक.च्या शिक्षणादरम्यान डॉ. मायांदे यांच्याशी त्यांचा
परिचय झाला होता. त्यानंतर अनेक दशकांपासून ते एक विश्वासू मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत म्हणून सोबत राहिले, अशी
भावना माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.
डॉ. मायंदे यांनी आपल्या गुणवत्तेच्या, समर्पणाच्या आणि विनम्र स्वभावाच्या
बळावर कृषि क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविली. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख
कृषि विद्यापीठ, अकोला येथे सन २००७ ते २०१२ या कालावधीत
कुलगुरू म्हणून कार्य केले. तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,
नागपूर येथे प्रभारी कुलगुरू आणि इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल
इंजिनिअर्स (ISAE) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय
योगदान दिले. कृषि विज्ञान केंद्रांचे विभागीय समन्वयक तसेच आयसीएआरच्या
झोन-व्हीमधील विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.
इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअर्सच्या माध्यमातून माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना डॉ. मायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची
संधी मिळाली. अकोला येथे संस्थेच्या वार्षिक अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनातही
त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. वनामकृवि, परभणी येथे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांना कुलगुरू म्हणून कार्यरत असताना विद्यापीठातील प्राध्यापक व
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संधी व व्यासपीठ उपलब्ध
करून देण्याबाबत डॉ. मायंदे यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांनी
महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वाबरोबरच त्यांचा प्रेमळ स्वभाव, साधेपणा, विनम्रता आणि आपुलकी कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने वैयक्तिक
स्तरावर मोठी हानी झाली असून कृषि आणि शैक्षणिक क्षेत्राने एक अनुभवी मार्गदर्शक
गमावला आहे, अशा शब्दांत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि
शोकाकुल कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी
प्रार्थना त्यांनी केली.
या शोकसभेस विद्यापीठाचे सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ
व कर्मचारी उपस्थित राहून दिवंगत डॉ. व्यंकट मनोहर मायांदे यांना भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण केली.
