Wednesday, November 18, 2026

मौजे शेकटा येथे तूर वाण ‘गोदावरी’च्या आद्यरेषीय प्रात्यक्षिकाला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; ‘शेतीमध्ये सर्व काही आहे’ हा समाधानाचा उद्गार शेतकऱ्यांच्या तोंडून निघावा, अशी इच्छा व्यक्त केली

सुधारित तूर वाण ‘गोदावरी’ची उत्कृष्ट पीक वाढ व शेंगा धारणेची क्षमता; ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकही आयोजित

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे शेकटा येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री. सिकंदर जाधव यांच्या शेतावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सुधारित तूर वाण ‘गोदावरी’च्या आद्यरेषीय प्रात्यक्षिकास (Frontline Demonstration) विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. या भेटीदरम्यान कृषी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ (तूर) तथा कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, कृषि महाविद्यालय, परभणीचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप तसेच कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सचिन सोमवंशी, कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञ तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

या प्रसंगी तूर पिकावर ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. श्री. सिकंदर जाधव यांनी ठिबक सिंचनाखाली सुधारित ‘गोदावरी’ आणि स्थानिक ‘चारू’ या तूर वाणांची जोड ओळ व एकेरी ओळ पद्धतीने लागवड केली आहे.

प्रात्यक्षिकातील ‘गोदावरी’ वाणाने स्थानिक ‘चारू’ वाणाच्या तुलनेत पीक वाढ, फांद्यांची संख्या आणि शेंगा धारणेच्या बाबतीत अधिक उत्कृष्ट कामगिरी दर्शविल्याचे निरीक्षण करण्यात आले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पीक परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून सुधारित वाण, शिफारशीत कृषि पद्धती आणि सूक्ष्मजीव समूह (Microbial Consortia) यांच्या एकात्मिक वापरातून उत्पादनवाढीच्या संभाव्यतेचा आढावा घेतला.

शेतकऱ्यांच्या तोंडून ‘शेतीमध्ये सर्व काही आहे’ असे समाधानाचे उद्गार निघावेत, अशी इच्छा व्यक्त  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने विकसित केलेल्या तूर वाण ‘गोदावरी’च्या माध्यमातून या वर्षीच्या दुष्काळी स्थितीमध्ये देखील कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री. सिकंदर जाधव हे एकरी १५ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन घेण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशाचे श्रेय श्री. जाधव यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाला जाते, असे प्रतिपादन माननीय कुलगुरूंनी केले.

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘कृषिभूषण’ पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी श्री. सिकंदर जाधव यांनी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे माननीय कुलगुरूंनी विशेष कौतुक केले. तसेच, उच्च उत्पादनक्षम आणि रोगप्रतिकारक तूर वाण विकसित करण्यासाठी व आद्यरेषीय प्रात्यक्षिके तसेच शेतकरी-केंद्रित विस्तार उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा प्रसार करण्यासाठी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याचेही त्यांनी अभिनंदन केले.

कृषि संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अंमलबजावणी यांमधील दरी कमी करण्यासाठी संशोधन संस्थांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्याचा व्यापक स्वीकार होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे माननीय कुलगुरूंनी यावेळी अधोरेखित केले.

या आद्यरेषीय प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश सुधारित तूर वाण ‘गोदावरी’, सूक्ष्मजीव समूहाद्वारे बीजप्रक्रिया, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि शिफारशीत पीक संरक्षण उपाययोजना यांसारख्या एकात्मिक पीक उत्पादन तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. या एकात्मिक तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे तूर उत्पादनात वाढ, मृदा आरोग्य सुधारणा, उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि शाश्वत कृषि उत्पादनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

या भेटीमुळे शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली असून सुधारित तूर वाण ‘गोदावरी’ आणि त्याच्या शिफारशीत उत्पादन तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. अशा आद्यरेषीय प्रात्यक्षिकांमुळे तूर उत्पादनवाढ, शेतीची आर्थिक लाभदायकता, शाश्वत कृषि विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.