Sunday, November 15, 2026

वनामकृवि व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात १२० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

चारा व पाण्याचे योग्य नियोजन आणि शास्त्रीय व्यवस्थापनातून दुष्काळात पशुधनाचे संरक्षण शक्य – डॉ. नितीन मार्कंडेय


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीच्या विस्तार शिक्षण संचालनालया अंतर्गत परभणी येथील विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेत बचाओ अभियान – २०२६ अंतर्गत १२४ वा ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता करण्यात येते. यामध्ये दर आठवड्याला एका महत्त्वपूर्ण विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करून शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले जाते.

या कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आणि विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

१२४ व्या कार्यक्रमात शिक्षण संचालक तथा पशुधन तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी पशुपालक शेतकऱ्यांना उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून नियोजन करण्याचे आवाहन केले. उपलब्ध चारा, त्याची गुणवत्ता आणि जनावरांची गरज लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन केल्यास प्रतिकूल परिस्थितीतही उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारे पशुधनाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य मार्गदर्शन करताना पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय यांनी दुष्काळसदृश परिस्थितीत चारा व पाण्याचे योग्य नियोजन, निकृष्ट चाऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया आणि जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास पशुधनाचे संरक्षण करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले. उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करून जनावरांना संतुलित आहार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांचे आरोग्य व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पुढे त्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे, चाऱ्याचा काटकसरीने व कार्यक्षम वापर करणे तसेच जनावरांना संतुलित आहार व आवश्यक पोषणमूल्ये मिळतील याची दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण, गोठा व्यवस्थापन, स्वच्छता आणि विविध आजारांपासून पशुधनाचे संरक्षण याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी निकृष्ट चाऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यावर विशेष भर दिला. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले सोयाबीनचे काड, उसाचे वाढे, गव्हाचे काड, तसेच शेतातील हिरवा चारा व विविध प्रकारचा पालापाचोळा यांचा योग्य पद्धतीने वापर करून चारा टंचाईवर मात करता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. उपलब्ध निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया केल्यास त्याचा दर्जा व पौष्टिकता वाढविता येते. यासाठी आवश्यकतेनुसार विविध विकरे (एन्झाइम्स), पूरक घटक आणि इतर शास्त्रीय प्रक्रिया तंत्रांचा वापर करून चारा अधिक पचनीय व पौष्टिक बनविता येतो. अशा प्रक्रियायुक्त चाऱ्याचा संतुलित पशुआहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास चाऱ्याची उपलब्धता कमी असतानाही जनावरांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धन करावे. अशा नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे दुष्काळसदृश परिस्थितीत चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासोबतच पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता टिकवून ठेवणे शक्य होईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्यातील हवामानाचा अंदाज सादर केला. आगामी काळातील हवामान परिस्थिती, पावसाची शक्यता तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी शेती आणि पशुधन व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी आठवड्यातील संभाव्य हवामान परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रास्ताविक डॉ. गजानन गडदे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सध्याच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण व योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आजच्या विषयाची निवड करण्यात आल्याचे सांगितले.

या ऑनलाइन कार्यक्रमाला १२० पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांनी पशुधनाचे आरोग्य, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, चारा उपलब्धता, निकृष्ट चाऱ्यावरील प्रक्रिया, पशुखाद्य व्यवस्थापन तसेच दुष्काळसदृश्य परिस्थितीत जनावरांची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. डॉ. नितीन मार्कंडेय यांनी प्रत्येक प्रश्नाला समर्पक व सविस्तर उत्तरे देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. शेतकऱ्यांनीही प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे हा कार्यक्रम पशुपालक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील डॉ. दिगंबर पटाईत, श्री. मधुकर मांडगे, डॉ. दिपाली सवंडकर, श्री. अनिल शिंदे, श्री. अमोल झाडे आणि श्री. नितीन मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.

दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित होणाऱ्या या शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाच्या पुढील भागातही शेतकऱ्यांसाठी एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..