राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण समिती आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणचे आयोजन दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, मार्शल आर्ट आणि तायकांदो प्रशिक्षक श्रीमती अयोध्या आणि श्रीमती दिपाली मुदगलकर यांनी मार्शल आर्ट आणि तायकांदोचे विविध आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थीनींनी कठीण प्रसंगी स्वत:चे रक्षण कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. याबरोबरच स्वत:च्या आत्मसंरक्षणासाठी व्यायाम, खेळ, आहार अशा बाबतीत दक्षता घेऊन स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी महिलांवर व मुलीवर होणारे अत्याचार टाळण्याकरिता तसेच स्वरक्षणासाठी त्यांनी आत्मनिर्भर व अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. आगामी काळात यासाठी विद्यापीठातंर्गत विविध जाणीव-जागृती कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणिसर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी या प्रसंगी जाहीर केले.
या प्रशिक्षणासाठी वर्षा मुलींचे वसतिगृह येथे विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, अन्न तंत्र महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय येथील वास्तव्यास असणाऱ्या सर्व विद्यार्थीनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुनीता काळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर तसेच अन्न व पोषण विभाग प्रमुख डॉ. विजया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तसेच सुत्रसंचालन सहयोगी प्राध्यापक व वर्षा मुलींच्या वासतिगृहाच्या अधिक्षिका डॉ. नीता गायकवाड यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. अश्विनी बेद्रे, प्रसाद देशमुख, सौ. रेखा लाड व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमास विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.