सहयोगातूनच समृद्धी आणि विकास साध्य... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भवः’ या
नाविन्यपूर्ण ऑनलाईन मालिकेत दिनांक २ सप्टेंबर
रोजी विद्यापीठाच्या स्टुडिओत माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कृषि अर्थशास्त्र
तज्ज्ञ डॉ. रणजीत चव्हाण आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांची प्रमुख
उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि
शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या भागात पेडगांव (ता. जि.
परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांनी ‘सेंद्रीय शेतमालाचे
विक्री व्यवस्थापन व आर्थिक उन्नती’ या विषयावर मार्गदर्शन करून आपली प्रेरणादायी
यशोगाथा मांडली.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी बोलताना सांगितले की, संपूर्ण देशभर सेंद्रिय शेती उत्पादनांना अधिक भाव मिळावा यासाठी चर्चा
सुरू आहे. यासाठी विक्री व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे
आवश्यक आहे आणि त्याबाबतची माहिती शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून यायला हवी,
असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्कृष्ट पद्धतीचा समन्वय असून कार्यापेक्षा
समन्वय अधिक महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांमध्ये सांघिक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे,
कारण एकमेकांच्या सहयोगातूनच समृद्धी आणि विकास साध्य होतो, यावर त्यांनी भर दिला. परभणी जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक गटांतील शेतकरी
साधे राहणीमान व उच्च विचारांचे उदाहरण आहेत. त्यांच्या कार्यातील चांगल्या
बाबींचा स्वीकार करून विद्यापीठाने संशोधन कार्य अधिक बळकट करावे, असेही माननीय कुलगुरूंनी सुचवले. याबरोबरच, पदव्युत्तर
आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना या संशोधनात सहभागी करून घेण्याच्या सूचना
अर्थशास्त्र व कृषी विस्तार शिक्षण विभागास दिल्या. तसेच,
या संशोधनातून उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन तयार करण्याचेही निर्देश
दिले. शेवटी, या प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना
विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी शेतकऱ्यांच्या भेटी आयोजित
कराव्यात, अशी सूचनाही माननीय कुलगुरूंनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि अर्थशास्त्र तज्ज्ञ डॉ. रणजीत चव्हाण यांनी
करत प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान श्री.
जंगले यांनी सांगितले की, खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेती
फायदेशीर ठरली आहे. यासाठी त्यांनी बायोगॅसचा वापर करून
उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवले. त्यांनी स्पष्ट केले की, सेंद्रिय शेतीच्या पहिल्या वर्षी उत्पन्न
तुलनेने कमी मिळते, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या वर्षापासून उत्पादनात
भरीव वाढ होते आणि शेती फायदेशीर ठरते. यामुळे पोषक आहार मिळतो, तसेच निसर्गाचे संतुलन राखले जाते आणि मानवी आरोग्य उत्तम राहते, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय त्यांनी भाजीपाला उत्पादक गटाच्या माध्यमातून करटुले लागवडसारखे अनेक
उपक्रम राबविले आहेत. त्यांनी विद्यापीठात तयार होणाऱ्या बायोमिक्स आणि ट्रायकोडर्मा
सारख्या तंत्रज्ञानाचा वापरही अत्यंत उपयुक्त ठरतो, असे सांगितले. तसेच
विद्यापीठाचा सल्ला अनमोल आहे, म्हणून शेतकऱ्यांनी विद्यापीठाला
किमान एक दिवस भेट देऊन माहिती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक उन्नती साधली असून, त्यासाठी त्यांना भाजीपाला उत्पादक गटांचा विशेष लाभ झाला. यावेळी त्यांनी
भाजीपाला उत्पादक गटाचे श्री. पंडितराव थोरात यांचा वारंवार उल्लेख करून त्यांचे मार्गदर्शन
महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. उत्पादने विक्रीसाठी त्यांनी ग्राहकांपर्यंत थेट विक्री व्यवस्थापनाची पद्धत
अवलंबली, ज्यामुळे अधिक नफा मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह अमरावती आणि सोलापूर येथून शेतकऱ्यांनी
उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांना सेंद्रिय
शेतीसंबंधी विविध प्रश्न विचारले, ज्यांची त्यांनी समाधानकारक उत्तरे
दिली. या मुलाखतीबाबत सहभागी शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.