Saturday, September 27, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्यात सामंजस्य करार

दोन विद्यापीठांमधील करारामुळे शैक्षणिक व संशोधन सहकार्याला नवी दिशा — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (जिल्हा रायगड) यांच्यात शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता विकासासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार परभणी येथे पार पडलेल्या "१७व्या राष्ट्रीय परिसंवाद" (17th National Symposium) या परिषदेदरम्यान दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्यासह शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके तसेच विद्यापीठांचे प्राध्यापक, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या करारामुळे दोन्ही विद्यापीठांमधील संशोधन व शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होईल तसेच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. त्यांनी असेही नमूद केले की, या सहकार्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल.

या सामंजस्य करारानुसार दोन्ही विद्यापीठे एकत्र येऊन संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता विकास, तसेच विद्यार्थी व शिक्षक आदानप्रदान कार्यक्रम राबविणार आहेत. कृषि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करारानुसार संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, तसेच दोन्ही विद्यापीठांतील विद्यार्थी व शिक्षकांना कोर्स डिझाइन, अध्यापन, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. याशिवाय प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि इतर सुविधांचा परस्पर वापर करण्यात येईल.

उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी ‘आयडिया टू बिझनेस’ (Idea to Business) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच अभियांत्रिकी, कृषि डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्र या क्षेत्रांमध्ये संयुक्त कार्यक्रम व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यासाठी दोन्ही विद्यापीठे परस्पर सहकार्य करतील.