Wednesday, September 17, 2025

वनामकृवि येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

 मराठवाडा मुक्ती दिन हा अस्मिता, स्वातंत्र्य व गर्वाचा दिवस – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाडा मुक्ती करिता शहीद वीरांना विनम्र अभिवादन करून मराठवाडा मुक्ती दिन हा केवळ एक तारीख किंवा दिवस नसून मराठवाड्याची अस्मिता, स्वातंत्र्य, गौरव आणि गर्व यांच्याशी जोडलेला दिवस आहे असे नमूद केले. यावेळी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास सांगितला. या संग्रामात मराठवाड्यातील थोर शूरवीरांनी देश स्वतंत्र आहे तर मराठवाडाही स्वतंत्र भारताचा भाग झाला पाहिजे ही ठाम भूमिका घेतली. यासाठी अनेक शूरवीरांनी लोकसहभागातून गावोगावी लढा दिला, आपल्या प्राणांची आहुती दिली आणि मोठा संघर्ष केला. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून मराठवाडा स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग झाला.

आपण या थोर शूरवीरांचे वंशज आहोत, त्यामुळे आपले कर्तव्य आहे की, आपण सुदृढ आणि सशक्त मराठवाडा निर्माण केला पाहिजे. मराठवाडा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे आणि या क्षेत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सध्या अमृतकाळातून पुढे वाटचाल करत असून २०४७ मध्ये पूर्णतः विकसित राष्ट्र म्हणून उदयास येणार आहे, याची आपण तयारी करत आहोत.

मराठवाडा आपल्या समृद्ध सांस्कृतिक, संत परंपरा आणि साहित्यिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. ही भूमी संत, समाजसुधारक आणि साहित्यिकांची आहे, ज्याचा प्रभाव मराठवाड्यासह संपूर्ण भारतावर पडलेला आहे. त्यामुळे येथील राजकारणी, अधिकारी आणि सर्वसामान्यांमध्ये प्रेमभाव जपला जात आहे.

ते पुढे म्हणाले की, भारत कृषीप्रधान देश आहे. देशाने शेतीमध्ये मोठी क्रांती केली आहे, तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याने अनेक शेती विकास प्रकल्प देशासाठी दिशादर्शक ठरवले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या महाविस्तार प्रणालीची भूमिका उल्लेखनीय आहे. या प्रक्रियेत विद्यापीठांच्या सर्व शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

शेती विकासासाठी शासन, संशोधन, शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्र यांचे योगदान मोलाचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात मोठे योगदान देत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. हे विद्यापीठ ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळालेले असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. येत्या २५-२६ सप्टेंबर रोजी देशातील ७४ कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे, ज्यामुळे परभणी राष्ट्रीय पातळीवर अधिक ठळकपणे पोहोचत आहे.

यावेळी त्यांनी विद्यापीठातील सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी, महिला अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. तसेच मराठवाड्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ हवामान- अनुकूल तंत्रज्ञान विकसित व प्रसारित करण्यावर भर देत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्व शास्त्रज्ञांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

अडचणी असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. विद्यापीठाने शेतकरी देवो भव:” या भावनेतून रात्रंदिवस शेतकऱ्यांना दर्जेदार तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आहे.

शेवटी, त्यांनी सर्वांनी एकजुटीने आणि आत्मविश्वासाने कार्य करावे असे आवाहन केले आणि विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रीय छात्र सैनिकांनी माननीय कुलगुरू यांना छात्र अधिकारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने गायक श्री उदय वाईकर यांनी केले.