शेतीचा विकास हा सर्वांगीण विकासाचा पाया – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने “रबी पीक परिसंवाद” दिनांक १७ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या परिसंवादाच्या उद्घाटक माननीय राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमास माजी खासदार तथा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत, माजी खासदार श्री सुरेश जाधव, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री. भागवत देवसरकर, प्रगतशील शेतकरी श्री विकास शिंदे, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक, डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. दीपक पाटील, डॉ. प्रविण वैद्य, परभणी जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, सैनिक फेडरेशनचे सचिव श्री डी एम निंबाळकर आणि हिंगोली येथील श्री देवीप्रसाद ढोबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आज भारत
विविध शेती उत्पादनांमध्ये जगात प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर असून ट्रॅक्टर उत्पादनात
प्रथम क्रमांकावर आहे, हे भारताच्या प्रगतीची क्षमता दर्शवते. ‘शेतीचा विकास झाला नाही तर कोणताही
विकास होऊ शकत नाही, असे सांगताना त्यांनी भारतरत्न डॉ. एम.एस.
स्वामीनाथन यांचे विचार उद्धृत केले. तसेच भारताच्या कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय
स्तरावर डळमळीत करण्याचा प्रयत्न होत असला तरी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी
यांच्या नेतृत्वाखाली देश कृषी विकासासह सर्वच क्षेत्रात मोठी झेप घेत आहे,
असे ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाच्या वतीने त्यांनी माननीय पंतप्रधानांना
वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या.
विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी “शेतकरी देव भव:” हा नारा दिला आहे. महिन्यातून
“माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत” हा अभिनव उपक्रम राबवून कुलगुरूपासून सर्व शास्त्रज्ञ
प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर उपस्थित राहतात. संशोधन व शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने
मोठी प्रगती साधली असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे.
अनेक राष्ट्रीय क्रमवारीत विद्यापीठ वरच्या स्थानावर पोहोचले असून हे सर्व यश त्यांनी
शेतकऱ्यांना समर्पित केले.
शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे मिळावे यासाठी अनेक वर्षे पडीत
असलेली जवळपास ४००० एकर जमीन वहितीखाली आणून बीजोत्पादनात मोठी वाढ करण्यात आली आहे.
यासोबतच सेंद्रिय व नैसर्गिक शेती तसेच हवामान-आनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यावरही
भर दिला जात आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात व प्रत्यक्ष भेटण्यात समाधान मिळते, असे सांगून त्यांनी
नमूद केले की, दर मंगळवारी आणि शुक्रवारी “ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद” या माध्यमातून प्रभावी विस्तार कार्य राबवले
जाते.
पुढे ते म्हणाले की, आपल्याला मिळालेली जबाबदारी ही एक संधी आहे. त्या संधीचे सोने करणे आपले कर्तव्य
आहे. त्यांनी सांगितले की, कुलगुरूपद स्वीकारण्यापूर्वी ते परभणी
विद्यापीठात एकदाही आले नव्हते. मात्र आज समर्पणभावनेने कार्य करताना शेतकरी आपुलकीने
त्यांची वाट पाहतात, यातच खऱ्या अर्थाने समाधान लाभते. प्रत्येकाने
आपली क्षमता ओळखून कार्य केले पाहिजे. आज सर्वत्र पाऊस पडत असतानाही या परिसंवादात
एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती हीच विद्यापीठाची खरी ताकद व क्षमता
दर्शवते. शेवटी, त्यांनी सर्व शेतकऱ्यांचा मनस्वी गौरव करून त्यांना
शुभेच्छा दिल्या.
माननीय ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास
सविस्तरपणे मांडला. त्यांनी देशाने शेतीमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना प्रख्यात
कृषीशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच
आंतरराष्ट्रीय स्तरावर शेती क्षेत्रात होत असलेले बदल, कर प्रणाली व त्याचे
परिणाम यांचा ऊहापोह करताना हा एक वेगळ्या स्वरूपाचा नवीन लढा असल्याचे नमूद केले.
प्रत्येक देश आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि भारत या स्पर्धेत
निश्चितच अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्याचा गौरव करत
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून शेतकऱ्यांच्या
सेवेसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. विद्यापीठ सेंद्रिय व नैसर्गिक
शेतीला चालना देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व
पटवून दिले. त्यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या काळात शेतीसाठी
आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असली तरी पारंपरिक तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून त्याचा योग्य
अवलंब करणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीस चालना द्यावी, असे आवाहनही
त्यांनी केले.
कार्यकारी परिषद सदस्य श्री. भागवत
देवसरकर यांनी विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या यशस्वी कार्याचे अभिनंदन करून
हे कार्य पुढेही यशस्वीपणे सुरू राहावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार श्री. सुरेश जाधव यांनी नमूद केले की, देशात पंजाब राज्य
आणि महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हे धान्याचे कोठार समजले जाते. येथील शेतकरी रात्रंदिवस
कष्ट करण्यास सदैव तत्पर असतो. या शेतकऱ्यांना आधुनिक व हवामान-अनुकूल तंत्रज्ञान उपलब्ध
करून देण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चढउतारांमध्ये शेतकरी सक्षमपणे
टिकून राहावा यासाठी त्यांना अर्थसहाय्य, सिंचन सुविधा आणि शुद्ध
बियाणे मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रस्तावनेत विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, ‘शेतकरी देवो भव:’
या भावनेतून माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत विस्तारकार्य सुरू आहे असे
सांगून त्यांनी विद्यापीठाच्या संशोधन व विस्तारकार्याचा आढावा मांडला.
कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने करण्यात आली. कार्यक्रमात
मान्यवरांच्या हस्ते विद्यापिठाच्या प्रकाशाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. वीणा
भालेराव यांनी केले. दरम्यान कृषिभूषण श्री. सोमेश्वर गिराम यांनी सेंद्रिय पद्धतीने
पिकवलेली सीताफळे मान्यवरांना भेट दिली.
तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची
सद्यपरीस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रबी तेलबिया, रबी ज्वार, गहू,
रबी भाजीपाला या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे
महत्त्व, सद्य:स्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन आदी
विषयावर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. के. पाटील, डॉ. जी. के. लोंढे, डॉ.
व्ही. एस. खंदारे, डॉ. एस. जे. शिंदे, डॉ.
के. टी. जाधव, डॉ. एल. एन. जावळे, डॉ. जी.
डी. गडदे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी,
डॉ. एस. एम. उमाटे, डॉ. आर. एस. जाधव, डॉ. ए. जी. लाड, डॉ. दिगंबर पटाईत, यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी
मार्गदर्शन केले. शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शेतीविषयक प्रश्नांना
विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमामध्ये सर्व विभाग
प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी यांच्यासह १३०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उस्फुर्त
प्रतिसाद दिला.
