शाश्वत शेतीसाठी पर्यावरणपूरक व वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या
संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातर्फे ‘पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण व
सल्ला प्रकल्प’ (क्रॉपसॅप) सन २०२५-२६ अंतर्गत दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी
छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी,
कृषि विज्ञान केंद्रातील विषयविशेषज्ञ (पिक संरक्षण) तसेच जिल्हा
क्रॉपसॅप समन्वयक यांच्यासाठी एकदिवसीय कीड-रोग सर्वेक्षण विभागीय कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार,
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एच. वैघ,
विभागीय कृषि सहसंचालक (छ. संभाजीनगर) श्री. प्रकाश देशमुख, विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल
घंटे, क्रॉपसॅप समन्वयक अधिकारी डॉ. अनंत लाड, रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी (परभणी) श्री. स्वप्नील जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. या
कार्यशाळेत कृषि विभागातील १५० हून अधिक अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठ हे “शेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करीत
असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, आपण
शेतकऱ्यांमुळे आहोत, शेतकरी आपल्यामुळे नाहीत. यावर्षी
झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की,
नैसर्गिक संकटे टाळता येत नसली तरी अशा परिस्थितीत पिकांचे रक्षण
करून शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी करण्यासाठी विद्यापीठ व कृषि विभागाने
संयुक्तरीत्या कार्य करणे आवश्यक आहे. शाश्वत शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी
पर्यावरणपूरक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून कीड व्यवस्थापनाचे महत्त्व ओळखणे गरजेचे
असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, कृषि
विद्यापीठ हे केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता संशोधन कार्याचा विस्तार
शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने करत आहे. विद्यापीठ व कृषि विभागाची यंत्रणा
एकत्रितपणे कार्यरत असल्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकरी आणि विस्तार
अधिकारी यांच्यातील दुवा अधिक बळकट होईल, असा विश्वासही
त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना रबी हंगामाची तयारी करण्याचे आवाहन
केले व शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील
अधिकारी यांनी शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावे, असे निर्देश दिले. याशिवाय त्यांनी प्रार्थना केली की, अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यास शेतकऱ्यांना बळ मिळो.
यानंतर विभागीय कृषि
सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख यांनी कृषि अधिकाऱ्यांना क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत
कीड-रोग सर्वेक्षण वेळेवर व अचूक करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना
योग्य सल्ला मिळू शकेल.
तांत्रिक सत्रात
शास्त्रज्ञांनी विविध पिकांवरील कीड-रोग ओळख, सर्वेक्षण व व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. बी.व्ही. भेदे यांनी
कापूस, केळी, डाळिंब व टोमॅटोतील कीड
व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. डॉ. अनंत लाड यांनी कीड उद्रेक, सर्वेक्षण व संत्रा-मोसंबीतील उपाय सांगितले. डॉ. पुरुषोत्तम नेहरकर व डॉ.
आर.एस. जाधव यांनी सोयाबीन व गोगलगाय व्यवस्थापन स्पष्ट केले. डॉ. दिगंबर पटाईत
(ऊस, मका, ज्वारी), डॉ. प्रफुल्ल घंटे (रोग व्यवस्थापन), डॉ. कैलास
डाखोरे (हवामान-पीक व्यवस्थापन), डॉ. रणजित चव्हाण (प्रकल्प
विश्लेषण), डॉ. प्रविण कापसे (महाविस्तार ॲप व सामाजिक
प्रभाव), डॉ. हरिहर कौसडीकर (अन्नद्रव्य महत्त्व), डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश मात्रे (सर्वेक्षण पद्धती) यांनी
मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक
डॉ. अनंत लाड, सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे व
आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. आयोजनात डॉ. खंदारे, डॉ. म्हात्रे, श्री. बालाजी कोकणे व श्री. दिपक लाड
यांचे योगदान लाभले.