Friday, September 19, 2025

वनामकृवित ‘नॅनो खते – संशोधन व पुढील दिशा’ या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

 नॅनो खतांसाठी संशोधन आणि शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन महत्त्वाचे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि इंडियन फॉर्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅनो खते – संशोधन व पुढील दिशा’ या विषयावरील दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनातील सिम्पोजियम हॉल (क्र.१८) येथे झाले.

या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील माजी उपमहानिदेशक (AE) तसेच देहरादून येथील दून विद्यापीठाचे संस्थापक माननीय कुलगुरू डॉ. गजेन्द्र सिंह उपस्थित होते. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून कोयंबतूर येथील इंडियन फॉर्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे (IFFCO NVPL), व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. लक्ष्मणन आणि नवी दिल्ली येथील इफकोचे मुख्य कृषि अधिकारी डॉ. तरुनेंदु सिंह हे उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, इफको नेटवर्क प्रकल्पचे प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, इफको महाराष्ट्रचे राज्य विपणन व्यवस्थापक डॉ. एम. एस. पोवार आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या रासायनिक खतांच्या वापर होत असल्याचे सांगितले. रासायनिक खतांचा कमीतकमी वापर करून सेंद्रिय घटकांचा वापर वाढवण्यासाठी नीती आयोगाने दोन वर्षांपूर्वी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यानंतर भारत सरकारने ‘पीएम प्रणाम’ ही योजना सुरू केली असल्याचे सांगून या योजनेची सविस्तर माहिती दिली. पुढे त्यांनी नॅनो खतांच्या वापराला चालना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित येऊन संशोधन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेतून नॅनो खतांची निर्मिती व वापर यावर अधिकाधिक चर्चा होऊन उत्कृष्ट शिफारशी समोर येतील, आणि या शिफारशी पिकांच्या नियोजनासाठी, निरीक्षणासाठी, उत्पादन व्यवस्थापनासाठी किंवा माहिती संग्रहित करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान (लिस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी) ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या तंत्रज्ञानाच्या अवलंबनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच शेतातील काडी कचरा विघटन करणारे सूक्ष्मजीव (वेस्ट डी-कंपोजर) याच्या वापराला चालना देण्यासाठी चर्चा करावी तसेच खतांच्या योग्य वापरासाठी पीकनिहाय मापदंड/मानके तयार करावीत, असेही त्यांनी सुचवले.  त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांचा आत्मविश्वासाशिवाय कोणतेही तंत्रज्ञान उपयुक्त ठरत नाही. शेतकऱ्यांचे समाधान हेच खरे यश असून विद्यापीठ याच भूमिकेतून कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माननीय कुलगुरू डॉ. गजेन्द्र सिंह म्हणाले की, सध्या रासायनिक खतांचा वापर वाढलेला असून ही खते प्रामुख्याने मोठ्या बॅगमधून वापरली जातात. शाश्वत शेतीसाठी पिकांना योग्य प्रमाणात व अचूक ठिकाणी खत पडणे आवश्यक आहे. यावरचा उत्कृष्ट उपाय म्हणजे नॅनो खते. नॅनो खतांच्या वापरामुळे अचूक शेती साधता येते. शेतीमध्ये खतावर मोठा खर्च होतो, परंतु नॅनो खतांच्या वापरामुळे बचत होऊन आर्थिक नफा वाढतो. याबरोबरच पिकांची खत उपयोगात आणण्याची क्षमता सुधारण होते. मात्र, नॅनो खतांचा प्रभावी वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती वाढवणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नॅनो खताचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, शाश्वत शेतीसाठी याचा अचूक वापर आवश्यक असून त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असून, अधिक परिणामकारक पद्धती विकसित करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. नॅनो खतांचा योग्य प्रमाणात व नियोजित वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढेल, उत्पादनक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. लक्ष्मणन यांनी नॅनो खतांमागील विज्ञान स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, खतांच्या कणांना अतिशय सूक्ष्म (नॅनो आकारमानाचे) केले जाते, ज्यामुळे ते पिकांच्या पानांद्वारे किंवा मुळांद्वारे जलद आणि प्रभावीरीत्या शोषले जातात. यामुळे कमी मात्रेत अधिक परिणाम मिळतो, पोषक द्रव्यांचा अपव्यय टाळला जातो, मातीचे आरोग्य सुधारते तसेच पर्यावरणावरील नकारात्मक परिणामही कमी होतो. परिणामी पिकांची उत्पादकता वाढते, असे त्यांनी नमूद केले.

इफकोचे मुख्य कृषि अधिकारी डॉ. तरुनेंदु सिंह यांनी नॅनो खतांवरील वैज्ञानिक चाचण्यांबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, पीक उत्पादन वाढ, खतांचा अचूक वापर, खर्चात बचत तसेच माती व पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी संशोधनात्मक प्रयोग आवश्यक आहेत. त्यांनी पुढे युरिया व डीएपी यांच्या वाढत्या किमतींबाबत माहिती देत सांगितले की, यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढतो. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून नॅनो खतांचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नॅनो खतांचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. तरुनेंदु सिंह म्हणाले की, वातावरणातील नत्र जमिनीत स्थिर करून अधिक उत्पादनक्षम विकास साधण्यासाठी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे. तसेच, नॅनो खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी करताना विद्यापीठाद्वारे कार्यान्वित इफको नेटवर्क प्रकल्पाची प्रगती मांडली. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री. प्रताप काळे (जि. परभणी), श्री. सुरेंद्र रोडगे (जि. परभणी), श्री. सुरशिंगराव पवार (जि. अहिल्यानगर) आणि श्री. योगेश टेळे (जि. नाशिक) यांनी नॅनो खतांच्या वापराबाबतचे अनुभव सांगितले.

उद्घाटन समारंभास सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. व्ही.एस. खंदारे, तसेच विविध विभागांचे प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रगतशील शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता पवार यांनी केले, तर आभार डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मानले.