वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ व पालक मेळावा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि
महाविद्यालयात दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ नवप्रवेशित
विद्यार्थ्यांचा 'दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळाव्याचे'
आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची उपस्थिती लाभली. यावेळी शिक्षण संचालक डॉ.भगवान
आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपिठावर अंबाजोगाई येथील सहाय्यक पोलीस
अधीक्षक माननीय श्री ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक श्री शरद
जोगदंड, मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले
यांची विशेष उपस्थिती होती.
उद्घाटनीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ
शिक्षणच नव्हे तर संस्कारही अंगीकारले पाहिजेत. ज्ञानाबरोबरच चारित्र्य ही खरी ताकद
आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्षाचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे,
कारण संघर्षाशिवाय खऱ्या यशाची प्राप्ती होत नाही. आपण जे ज्ञान आणि
कौशल्य विद्यापीठातून घेतो त्याचा उपयोग फक्त वैयक्तिक प्रगतीसाठी न करता सेवाभावी
वृत्तीने शेतकरी, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी करणे हीच
खरी शिक्षणाची सार्थकता आहे. विद्यार्थी हे उद्याचे शिल्पकार आहेत; म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा
आणि समाजाभिमुख दृष्टिकोन दिसला पाहिजे. शिक्षणाचे अंतिम ध्येय फक्त पदवी नव्हे,
तर जबाबदार नागरिक घडवणे हे असले पाहिजे.
संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन
करताना आपल्या विचारांमध्ये सांगितले की, शेती हा केवळ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील
महत्त्वाचा घटक नसून तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जीवनशैलीचाही
आधारस्तंभ आहे. शेतकरी व शेती यांचा विकास म्हणजेच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होय.
त्यांनी असेही नमूद केले की, कृषि क्षेत्रातील सुधारणा व नवकल्पना
अंगीकारल्याशिवाय प्रगत भारताची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. आजच्या पिढीने आधुनिक विज्ञान,
संशोधन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीला एक उद्योग म्हणून पुढे न्यायला
हवे. शेतकऱ्यांचा सन्मान आणि त्यांच्या घामाचे मोल हेच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे
बळ आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःच्या करिअरसाठीच
नव्हे तर समाज आणि शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी करणे हीच खरी देशसेवा असल्याचे ते
म्हणाले.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे यांनी तंत्रज्ञान विषयक
मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अत्यंत डोळसपणे केला
पाहिजे. समाजामध्ये हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे
आपण व आपले कुटुंबीय अडचणीत येऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तसेच
विद्यार्थ्यांनी व्यसनापासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे.
पोलीस निरीक्षक श्री शरद जोगदंड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थी हा घटक
केंद्रीभूत ठेवून महाविद्यालयांनी आपली भूमिका निभावली पाहिजे. ज्ञानसंपन्न आणि
संस्कारक्षम विद्यार्थी घडले तर देशही घडत असतो. तेव्हा विद्यार्थ्यांनीही अभ्यासू
आणि चिंतनशील वृत्ती अंगीकारली पाहिजे.
डॉ. राजेश इंगोले यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि चिकाटी या
त्रिसुत्रीच्या बळावर यशाचं शिखर गाठता येते. संघर्ष हाच यशाचा खरा पाया आहे असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण
केले.
प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड यांनी केले. सूत्रसंचालन
श्री राजेश रेवले यांनी केले तर आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी अभिलाषा खोडके यांनी
मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्यांनी प्रक्षेत्रावरील विविध पिकांची पाहणी केली. यावेळी पिकांची उत्तम स्थिती पाहून समाधान व्यक्त केले महाविद्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले.
.jpeg)
