माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर येथील पोस्ट ग्रॅज्युएट
इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट (PGIABM) या संस्थेने आंतरराष्ट्रीय
स्तरावर ऐतिहासिक यश मिळवले आहे. वॉशिंग्टन येथे झालेल्या ऑनलाइन ॲग्रीहॅकाथॉन
२०२५ (AgriHackathon 2025) या जागतिक स्पर्धेत संस्थेच्या
टीम्सनी पहिले, दुसरे आणि तिसरे असे सर्व प्रमुख पारितोषिक
पटकावून इतिहास रचला.
विद्यापीठाच्या या संस्थेच्या यशामुळे विद्यापीठाचा मान जगभर उंचावला आहे.
हे यश कृषी क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य
यांना नवी दिशा देणार आहे. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि,
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सर्व
विजेत्यांचे अभिनंदन केले. संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अथक
परिश्रमांचे हे फळ असल्याचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले.
या स्पर्धेचे आयोजन क्लायमेट सोशल फोरम, वॉशिंग्टन यांनी त्यांच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. डॉमेनिको विटो यांच्या नेतृत्वाखाली केले होते. या
स्पर्धेत ब्रिटन, इटली, नायजेरिया,
मॉस्को, आफ्रिका, केनिया
आणि भारत यांसह एकूण ९३ सहभागी देशांतील संघांनी भाग घेतला. PGIABM च्या टीम्सनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना परीक्षकांकडून विशेष
दाद मिळाली. परीक्षक मंडळात जॉन केर (इटली), मनोज कुमार
(भारत), खुशी गंगवार (जर्मनी) व टिगिस्ट एन्दाशॉ (केनिया) यांचा
समावेश होता.
या स्पर्धेतील विजेते प्रकल्प आणि संघ हे पुढील प्रमाणे आहेत. जेएसए सोलर सोयाबीन कृषी मित्र (JSA Solar
Soya Krishi Mitra) यामध्ये डॉ. ज्योती झिरमिरे, डॉ. संतोष कांबळे आणि श्री. अभिषेक राठोड तर जॅकप्लास्ट (JackPlast) यामध्ये संस्कृती महाजन, प्रतिक्षा दवरे, ओंकार कानडे व कृष्णकुमार कुलकर्णी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फसल सहाय्यक मॉडेल मध्ये श्रीपाद दिवेकर यांनी यश संपादन केले.
या सर्व प्रकल्पांचा उद्देश शाश्वत शेतीस चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि हवामान बदलाच्या संकटाला उत्तर शोधणे हा
आहे. JSA सोलार हे लहान शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणारे
सोयाबीन काढणी यंत्र आहे. JackPlast प्रकल्प प्लास्टिक
कचऱ्याचे व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक उपाय सुचवतो. तर AI आधारित
फसल सहाय्यक मॉडेल शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत तात्काळ सल्ला देण्यास मदत
करणार आहे.