Saturday, September 27, 2025

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि संशोधन व नवोपक्रमात पुढाकार घ्या – कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विद्यार्थ्यांना संदेश

 वनामकृवित विद्यार्थ्यांसाठी डॉ. सय्यद इस्माईल यांचे विशेष व्याख्यान : संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेवर भर


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित १७ व्या भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्या राष्ट्रीय परिसंवाद निमित्त दिनांक २७  सप्टेंबर २०२५ रोजी विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मुंबई येथील रेडियंट ॲम्बेडेड सोल्युशन्सचे संचालक डॉ. सय्यद इस्माईल यांचे विशेष मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. विशेष अतिथी म्हणून बंगलोर येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ शिवरामू आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून संशोधन व नवोपक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, कृषि उत्पादनक्षमता वाढवावी आणि देशाच्या कृषि समृद्धीत मोलाची भर घालावी, असा प्रभावी संदेश दिला.

डॉ. सय्यद इस्माईल यांनी विद्यार्थ्यांना कृषि विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला दिला. कृषि विद्यापीठातील विविध विद्या शाखा—कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि विद्या व उद्यानविद्या—यांनी एकत्रितपणे काम करून शेतकरी बांधवांच्या विविध समस्यांचे निराकरण करावे, असे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन आणि रोबोटिक्स यांचे मूलभूत सिद्धांत आत्मसात करून विद्यार्थ्यांनी कृषि विषयक समस्यांचे समाधान शोधले पाहिजे. त्यांनी शून्य मशागत, कृषि वानिकी, एकात्मिक कीड व्यवस्थापन, बांबू लागवड अशा नवनवीन व शाश्वत तंत्रज्ञानांचा सविस्तर उहापोह केला. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले कृषि तज्ज्ञासह कृषि उद्योजक होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी केले. या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रवीण वैद्य व विभाग प्रमुख डॉ. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल रामटेके, डॉ. रणजित चव्हाण व डॉ. सचिन मोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. संदिपान पायाळ, डॉ. गजानन वसु, डॉ. अनिकेत वाईकर तसेच श्री. प्रमोद राठोड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.