एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात
५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड अंतर्गत एनसीसी विभागाच्या वतीने नव्या कॅडेट्सची नोंदणी प्रक्रिया
दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या
मुख्यालयातील पाच महाविद्यालयांतील प्रथम वर्षातील २५० पेक्षा अधिक विद्यार्थी
उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी १६०० मीटर
धावणे, उंची, वजन आणि इतर शारीरिक
तंदुरुस्तीचे निकष तपासण्यात आले. सर्व चाचण्या काटेकोरपणे पार पडल्या असून
विद्यार्थ्यांनी त्यात उत्साहाने सहभाग नोंदविला.
या प्रक्रियेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एनसीसी कॅडेट म्हणून निवडले
गेले. एनसीसीमध्ये प्रवेश मिळवणे ही विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब असून शिस्त, देशभक्ती, नेतृत्त्वगुण तसेच आत्मविश्वास निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांशी सवांद
साधून त्यांचे मनोबल वाढविले व मार्गदर्शन करताना सांगितले की, एनसीसीमुळे
विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतोच, तसेच सामाजिक
जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्यही जोपासले जाते.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य,
कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री दिलीप रेड्डी, विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत
काळपांडे, प्रा. शाहू चव्हाण व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित
होते. सर्व मान्यवरांनी एनसीसीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एनसीसी विभाग प्रभारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, बटालियनचे नायब
सुभेदार अर्जुन राम कुमार, नायब सुभेदार राकेश कुमार,
हवालदार रामसेवक आणि इतर अधिकारी तसेच विद्यमान कॅडेट्स यांनी भरती
प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
महाविद्यालयातील एनसीसी युनिट अधिक सक्षम व उत्साही होणार असून
विद्यार्थ्यांना विविध शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उपक्रमांतून स्वतःला सिद्ध
करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कृषि महाविद्यालय, परभणीतील
हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.